जिल्हा रुग्णालयातील सुरक्षा रामभरोसे

शस्त्रक्रियागृहातून घसा तपासणी मशिनची चोरी; सीसीटीव्ही यंत्रणा बंद
satara civil hospital
satara civil hospitalsakal

सातारा - जिल्हा रुग्णालयातील शस्त्रक्रियागृहातून घसा तपासणीचे मशिन चोरीला गेल्याने रुग्णालयातील एकंदर सुरक्षेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे. त्यामुळे रुग्णालयातील गेल्या अनेक दिवसांपासून बंद असलेली सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्याची गरज पुन्हा अधोरेखित झाली आहे. जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्य सुविधेसाठी जिल्हा रुग्णालय हे सर्वांत महत्त्‍वाचा आधार आहे. जिल्ह्यातील विविध भागांतून नागरिक विविध आजारांच्या उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात येत असतात. आजारांबरोबरच अपघातातील जखमी, गळफास, विषारी औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केलेले लोकही उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल केले जातात. अशा परिस्‍थितीत रुग्णांच्या उपचारावरून जिल्हा रुग्णालयात अनेकदा वादावादीचे प्रसंग निर्माण होत असतात. यापूर्वीही रुग्णालयातील कर्मचारी व वैद्यकीय अधिकाऱ्यांबरोबर वादाचे तसेच मारहाणीचे प्रकार झाल्याची उदाहरणे आहेत. रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांनी अगदी वॉर्डमध्येही गोंधळ घातल्याची उदाहरणे आहेत. या सर्व प्रकारांवर अंकुश बसविण्यासाठी त्याचबरोबर वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी आपल्या नेमलेल्या जागेवर उपस्थित आहेत की नाहीत, रुग्णालय व परिसरातील साहित्याच्या सुरक्षिततेचा एकत्रीत विचार करून जिल्हा रुग्णालयात सीसीटीव्ही बसविण्याचा निर्णय झाला होता. त्यानंतर रुग्णालयाचा परिसर, वॉर्ड व विविध विभागात सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. त्यामुळे रुग्णालयातील गोंधळाचे प्रमाण कमी झाले होते. तसेच जिल्हा शल्यचिकित्सकांना एका ठिकाणाहून रुग्णालयातील सर्व विभागातील कारभारावर लक्ष ठेवता येत होते.

गेल्या दीड वर्षांपासून जिल्हा रुग्णालयातील सीसीटीव्ही यंत्रणा ठप्प आहे. त्यामुळे रुग्णालयाची सुरक्षा पुन्हा रामभरोसे झाली आहे. याच कालावधीत रुग्णालयाच्या आवारातून अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. रुग्णालयातील केसपपेर विभागातून पैशाची चोरी झाली, रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यामुळे रुग्णालयात सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधूनही जोर धरत आहे. परंतु, रुग्णालय प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही. त्यातच आता रुग्णालयाच्या शस्त्रक्रियागृहातून घसा तपासणीचे सुमारे दोन लाख रुपये किमतीचे यंत्र चोरीला गेले आहे. ते कधी पुन्हा मिळेल, हे सांगता येत नाही. त्याचा रुग्णालयातील घश्याच्या शस्त्रक्रियांवर नक्कीच परिणाम होईल. सीसीटीव्ही यंत्रणा कार्यान्‍वित असती तर हा प्रकार करणाऱ्याचा चेहरा उघडा पडला असता. रुग्णालयातील या घटना रोखण्यासाठी सीसीटीव्ही यंत्रणा सुरू करण्याबाबत जिल्हा शल्यचिकित्सकांनी तातडीने प्रयत्न करणे आवश्यक आहे.

रुग्णालय व परिसरात अनेकदा चोऱ्या

रुग्णालयाच्या आवारातून अनेक दुचाकी चोरीला गेल्या आहेत. रुग्णालयातील केसपपेर विभागातून पैशाची चोरी झाली, रुग्णालयात गोंधळ घालणाऱ्यांवर वचक राहिला नाही. त्यामुळे रुग्णालयात सीसीटीव्ही पुन्हा सुरू करण्याची मागणी कर्मचाऱ्यांमधूनही जोर धरत आहे. परंतु, रुग्णालय प्रशासनाने त्याकडे गांभीर्याने लक्ष दिले नाही.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com