विसापूर (जि. सातारा) : पुसेगाव येथील "माळ' नावाच्या शिवारातून सुमारे एक एकरातील कांद्याच्या रोप चोरट्यांनी लंपास केले. या रोपाची बाजारात किंमत सुमारे 50 ते 55 हजार रुपये आहे. हे रोप बनवण्यासाठी बी, मजूरी, खत, औषधांसाठी सरासरी 30 हजार रुपये खर्च आला होता.
पुसेगाव (ता. खटाव) येथील रामचंद्र कुंडलिक जाधव यांच्या मालकीच्या माळ नावाच्या शिवारातील गट नंबर 749 या क्षेत्रात रब्बी कांद्याचे रोप तयार केले होते. हे रोप लागवडी योग्य झाल्याने शेताची मशागत करून सोमवारपासून कांदा लागवड करण्यात येणार होती. त्यात एक दीड एकर कांदा लागवड झाली असती. परंतु; या कांदा रोपावर चोरट्यांची वक्रदृष्टी पडली. शुक्रवारी (ता. 13) रात्री सुमारे सात किलो बियाण्याचे लागवडीयोग्य रोप चोरट्यांनी लंपास केले.
यंदा, पुसेगावसह परिसरात अति पावसाने कांदा रोपे करपली असून अनेक शेतकऱ्यांचे बियाणे उगवण झालेली नाही. त्यामुळे तयार कांदा रोपाला प्रचंड मागणी असून त्याच्या किंमतीही वाढल्या आहेत. परिसरात रोप चोरीला जाण्याची ही दुसरी घटना असल्याने येथील शेतकरी भयभीत झाले आहेत. रात्रीच्या वेळी अज्ञात चोरटे शेतात येऊन रोप उपटून नेत असल्याने या रोपांच्या राखणीसाठी रात्रीचा दिवस करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. याबाबत पुसेगाव पोलिसांनी अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
आता कांदा लागवड कशी करायची?
सध्या, परिसरात कांदा रोपांचा प्रचंड तुटवडा असून सततच्या पावसामुळे अनेक शेतकऱ्यांची कांदा रोपे खराब झाली आहेत. त्यामुळे कांदा रोपाला सोन्यासारखा भाव असूनही ते मिळणे कठीण झाले असताना असा प्रकार घडल्याने 50 हजार रुपयांचे नुकसान तर झालेच पण भविष्यातील कांदा उत्पादनचा नफाही गेला आहे. आता कांदा लागवड करायची कशी? ही नवीनच समस्या माझ्यापुढे निर्माण झाली आहे, अशी प्रतिक्रीया रामचंद्र जाधव यांनी व्यक्त केली.
संपादन : बाळकृष्ण मधाळे
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.