अधिकाऱ्यांनी प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा : विनय गौडा

प्रशांत घाडगे
Friday, 30 October 2020

ग्रामपंचायत स्तरावरील आराखडा लोकसहभागातूनच बनला पाहिजे. तसेच जलजीवन मिशन योजनेचा समावेश करून मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये 100 टक्के नळजोडणी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा, असे आवाहन मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी केले.

सातारा : ग्रामविकास आराखडे बनविताना विस्तार अधिकाऱ्यांची भूमिका महत्त्वाची आहे. त्यांनी गणस्तरावर ग्रामसेवक व सरपंचांना प्रशिक्षण देताना गावातील गरजांचा विचार करूनच आराखडे बनवण्याचे प्रशिक्षण द्यावे. 15 व्या वित्त आयोगातून ग्रामपंचायत विकास आराखडे तयार करताना मानव विकास निदर्शकांचा विचार, विविध योजनांचे अभिसरण करून गावातील प्रत्येक व्यक्तीच्या गरजांची पूर्तता झाली पाहिजे, असे मत जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांनी व्यक्त केले. 

वर्ये (ता. सातारा) येथील पंचायतराज प्रशिक्षण केंद्रात जिल्हा परिषदेच्या वतीने राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियानांतर्गत "आमचं गाव, आमचा विकास' कार्यक्रमांतर्गत विस्तार अधिकाऱ्यांना ग्रामपंचायत विकास आराखड्यासंबंधी आयोजित प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्‌घाटनाप्रसंगी ते बोलत होते. उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, साताऱ्याच्या गटविकास अधिकारी सुवर्णा चव्हाण, विस्तार अधिकारी संदीप दीक्षित उपस्थित होते. श्री. गौडा म्हणाले, "ग्रामपंचायत स्तरावरील आराखडा लोकसहभागातूनच बनला पाहिजे. तसेच जलजीवन मिशन योजनेचा समावेश करून मोठ्या ग्रामपंचायतींमध्ये 100 टक्के नळजोडणी पूर्ण होण्यासाठी प्रयत्न करावा.''

खटावातील आरोग्य केंद्रांना श्वास; सभापती घार्गेंचा पुढाकार 

श्री. फडतरे म्हणाले, "ग्रामपंचायत विकास आराखड्यातील बंधित व अबंधित निधीचा अभ्यास करून लोकसहभागातून जलपुनर्भरण, स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन उपक्रम राबविण्यात येणार आहेत. विविध योजनांचे अभिसरण करून प्रत्येक घटकाला न्याय देण्याचा प्रयत्न करावा.'' ग्रामविकास अधिकारी संजय जाधव यांनी सूत्रसंचालन केले. प्रदीप पाटणकर, किरण कदम, विनोद भागवत, स्वप्नील शिंदे यांनी विस्तार अधिकाऱ्यांना प्रशिक्षण दिले. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Training Workshop For Extension Officers In Varye Satara News