बनावट नोटाप्रकरणी नगर जिल्ह्यातून दोघांना अटक; सातारा एलसीबीची कारवाई

सचिन शिंदे | Thursday, 19 November 2020

कऱ्हाड तालुक्‍यातील कोळेवाडी परिसरात सातारा एलसीबीने छापा टाकून सुमारे 95 हजारांच्या बनावट नोटा व पिस्तूल जप्त केली. बाबासाहेब जाधव व रितेश जाधव यांना त्यांच्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्‍यातील आरडगाव येथून अटक केली आहे.

कऱ्हाड (जि. सातारा) : बनावट नोटाप्रकरणी नगर जिल्ह्यातील आणखी दोघांना अटक झाली आहे. त्यांच्याकडून बनावट नोटा तयार करण्यासाठी वापरण्यात येणारा स्कॅनर व प्रिंटरही जप्त करण्यात आला आहे. बाबासाहेब गुलाब जाधव (वय 42) व रितेश बाबासाहेब जाधव (23, दोघेही रा. आरडगाव, ता. राहुरी, जि. नगर) अशी त्यांची नावे आहेत. त्यांना 23 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. 

तालुक्‍यातील कोळेवाडी परिसरात सातारा एलसीबीने पोलिसांनी छापा टाकून सुमारे 95 हजारांच्या बनावट नोटा व पिस्तूल जप्त केली होती. मागील गुरुवारी ही कारवाई झाली होती. पोलिसांनी सांगितले, की सातारा एलसीबीने कोळेवाडी परिसरात छापा टाकून संशयितांना ताब्यात घेतले होते. त्यानंतर बनावट नोटांचा तपास तालुका पोलिस करत आहेत. कौशल्यपूर्ण तपास करून यापूर्वी चौघांना अटक केली. ते सध्या कोठडीत आहेत. त्यानंतरही काल पोलिसांनी आरडगाव येथून दोघांना ताब्यात घेतले. 

भाजपला धक्का देत 'पवार' पुन्हा राष्ट्रवादीत, खटाव तालुक्‍यात 'पावर' वाढणार!

बाबासाहेब जाधव व रितेश जाधव यांना त्यांच्या नगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्‍यातील आरडगाव येथून अटक केली आहे. त्यांच्याकडून पोलिसांनी बनावट नोटा छापण्यासाठी वापरण्यात येणारे प्रिंटर व स्कॅनर जप्त केले आहे. पोलिस उपअधीक्षक डॉ. रणजित पाटील, पोलिस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या नेतृत्वाखाली फौजदार अशोक भापकर, फौजदार राजू डांगे, हवालदार सपकाळ, अमोल पवार, आशिष पाटील यांनी कारवाईत सहभाग घेतला. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे