
मृत्यमुखी पडलेल्या दोन्ही बैलांपैकी एक बैल त्रिपुटी (ता. कोरेगाव) आणि दुसरा बैल मालगाव (ता. सातारा) येथील असल्याचे समजले.
Satara : उदयनराजेंच्या वाढदिनी आयोजित केलेल्या शर्यतीत 'विघ्न'; कृष्णा नदीत पडून बैलजोडीचा गुदमरून मृत्यू
कोरेगाव (सातारा) : श्रीक्षेत्र तांदूळवाडी (ता. कोरेगाव) इथं आज झालेल्या बैलगाडी शर्यतीमधील (Bullock Cart Race) एक धावती बैलगाडी उधळत आपला ट्रॅक सोडून लगत असलेल्या कृष्णी नदीपात्रात जाऊन पडल्यामुळं दोन बैल मृत्युमुखी पडले. मात्र, चालकानं प्रसंगावधान राखत उडी मारल्यानं तो बचावला.
या दुर्दैवी घटनेनंतर शर्यती रद्द करण्यात आल्या. श्रीक्षेत्र कोल्हेश्वर देवस्थान आणि उदयनराजे मित्र समूहाच्या वतीनं खासदार उदयनराजे भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त (Udayanraje Bhosale Birthday) आज बैलगाडी शर्यतींचं आयोजन करण्यात आलं होतं.
आज सकाळपासून या शर्यतींसाठी पंचक्रोशीसह लांबलांबहून बैलगाड्यांची नोंदणी चांगली झालेली होती. अखेर सकाळी 11 च्या सुमारास शर्यती सुरू झाल्या. कृष्णा नदीपात्रापासून सुमारे 600 ते 700 फूट अंतरावर उत्तर - दक्षिण (कोल्हेश्वर मंदिर) असे शर्यतीचे सात ट्रॅक टाकले होते. दुपारी दोनच्या सुमारास शर्यतीचे सात फेरे पूर्ण झाल्यावर आठव्या फेरीसाठी सात बैलगाड्या उत्तर दिशेकडे गेलेल्या होत्या. त्यानंतर झेंडा पडताच बैलगाड्या सुसाट धावू लागल्या.
बैलगाडी दोन्ही बैलांसह नदीत 75 फूट खोल कोसळली
सीमारेषेपासून सुमारे 800 फूट अंतरावर गाड्या आलेल्या असताना शेवटच्या एका ट्रॅकमधील एक बैलगाडी आपला ट्रॅक सोडत उधळली व ती पूर्वेला असलेल्या कृष्णा नदीपात्राकडं सुसाट धावू लागली. चालकानं संयम राखत बैलगाडी थांबवून दक्षिण व उत्तरे दिशेस वळवण्याचा प्रयत्न केला. त्यात यश येत नसल्याचं दिसताच त्यानं नदीपात्राच्या कडेला गाडीतून उडी घेतली आणि दुसऱ्या क्षणी सदर बैलगाडी दोन्ही बैलांसह नदीत सुमारे 75 फूट खोल कोसळली.
त्यात दोन्ही बैल गाडीला जुंपलेले असल्यामुळे बुडाले. तोवर मदत मिळेपर्यंत दोन्ही बैल मृत्युमुखी पडले. अखेर बैलांचे मृतदेह बाहेर काढून त्या त्या बैल मालकांनी ते पिकअप वाहनातून घरी नेल्याचे समजले. मृत्यमुखी पडलेल्या दोन्ही बैलांपैकी एक बैल त्रिपुटी (ता. कोरेगाव) आणि दुसरा बैल मालगाव (ता. सातारा) येथील असल्याचे समजले. प्रत्यक्षात या घटनेची नोंद येथील पोलिसात रात्री उशिरापर्यंत झालेली नव्हती.
एक हजार नोंदणी, ७७ हजार बक्षीस...
दरम्यान, बैलगाडी शर्यतीच्या नोंदणीसाठी एक हजार रुपये शुल्क ठेवण्यात आले होते, तर शर्यतीमधील विजेत्या बैलगाड्यांना 77 हजार 777 ते तीन हजार 333 रुपये रोख अशी बक्षिसे व चषक बक्षीस म्हणून ठेवण्यात आले होते.