
Satara News : ‘सातारा विकास’ सर्वसामान्य नागरिकांची आघाडी; उदयनराजे भोसले
सातारा : शाहूपुरीसह परिसरातील नागरिकांनी आमच्या नेतृत्वाखालील कार्यकर्त्यावर नेहमीच विश्वास दाखला असून, तो विश्वास आम्ही सार्थ ठरवला आहे. शाहूपुरीसह परिसरासाठी स्वतंत्र पाणी योजना कार्यान्वित झाली असून, सातारकर माझे कुटुंब सदस्य असून, आमची आघाडी ही सर्वसामान्य नागरिकांची आघाडी असल्याचे मत खासदार उदयनराजे भोसले यांनी गुरुवारी व्यक्त केले.
त्यांच्या हस्ते शाहूपुरीतील समाधीचा माळ, महादरे भाग, विलासपूर, करंजे, म्हसवे रोड, रानमळा, दौलतनगर, तामजाईनगर, विसावा नाका, पिरवाडी, ठक्कर सिटी, बाँबे रेस्टॉरंट चौकसह विस्तारित भागातील विकासकामांची सुरुवात झाली.
या वेळी माजी उपाध्यक्ष मनोज शेंडे, माजी नगरसेवक वसंत लेवे, संजय पाटील, महेश पवार, राजेंद्र गिरी, अमित कुलकर्णी, विनीत जाधव व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. येथील रस्त्यांसाठी ६ कोटी ७२ लाख, रांगोळे कॉलनी येथील बागेसाठी १ कोटी ६० लाख रुपये,
गटार कामांसाठी ३ कोटी ७१ लाख रुपये, समाधीचा माळ, भैरोबा पायथा, महादरे, मोरे कॉलनी, जानकर कॉलनी, केसरकर कॉलनी परिसरासाठी ३ कोटी २७ लाख रुपये, शिवाजी कॉलनी येथे १८ लाखांची तरतूद बगिचासाठी करण्यात आली आहे.
संग्राम बर्गेंच्या मागणीनुसार साडेचार कोटी
विलासपूर, शाहूनगर येथील विकासकामांसाठी संग्राम बर्गे यांच्या मागणीनुसार ४ कोटी ५० लाखांचा निधी देण्यात आला असून, यातून अनेक विकासकामे मार्गी लागत असल्याचे वक्तव्य खासदार उदयनराजे यांनी येथील विकासकामांच्या सुरुवात प्रसंगी केले.
या वेळी संग्राम बर्गे, श्रीरंग खराडे, सुरेश निरे, राजेंद्र पाटील, सुधाकर पवार, किरण बाबर, प्रदीप सूर्यवंशी, विठ्ठल जाधव, आशा जाधव, दीपक पवार, विजय पवार व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
करंजे परिसराचे सौंदर्य वाढणार
करंजे नाका, दौलतनगर-म्हसवे-कॅनॉल रोड, रानमळा या परिसरातील विकासकामांसाठी सातारा विकास आघाडीने ४ कोटी ७० लाखांचा निधी दिला आहे. यातून रस्ते दुरुस्ती, कालव्या रस्ते, १५० पथदिवे उभारण्यात येणार असून, याच निधीतून वाढे फाटा उड्डाणपुलाचा भाग सुशोभित करण्यात येत आहे.
या कामांमुळे या परिसराचे सौंदर्य वाढीला लागेल, असा विश्वास खासदार उदयनराजे भोसले यांनी कामाच्या सुरुवात प्रसंगी व्यक्त करत मनोज शेंडे यांच्या कामाविषयी आनंद व्यक्त केला. या वेळी शंकरकाका किर्दत, माजी उपाध्यक्ष मनोज शेंडे, बबनराव इंदलकर, तुषार पाटील, ॲड. विनीत पाटील, गणेश आरडे यांच्यासह नागरिक उपस्थित होते. तामजाईनगर परिसरातील कामांसाठी २ कोटी ४२ लाखांचा निधी उपलब्ध झाला आहे.
विसावा नाका, पिरवाडीला निधी
विसावा नाका, पिरवाडी, ठक्कर सिटी, (कै.) श्रीमंत छत्रपती दादामहाराज चौक परिसरातील कामांसाठी ३ कोटी २० लाख रुपयांचा निधी मिळाला असून, यातून विविध कामे होत आहेत. हद्दवाढ भागाच्या विकासाकरिता आम्ही कुठेही कमी पडणार नाही,
असे खासदार उदयनराजे भोसले यांनी या वेळी सांगितले. या वेळी अरुण राजेभोसले, किरण राजेभोसले, सर्वेश राजेभोसले, जय राजेभोसले, ऋतुराज राजेभोसलेंसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.