esakal | साता-याची चौपाटी अजूनही लॉक! 500 व्यावसायिकांना फटका
sakal

बोलून बातमी शोधा

साता-याची चौपाटी अजूनही लॉक! 500 व्यावसायिकांना फटका

देशव्यापी लॉकडाउननंतर अर्थव्यवस्थेला गती देण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने "अनलॉक'चे टप्पे जाहीर केले आहेत. सध्या "अनलॉक'चा सहावा टप्पा सुरू असून, त्यात नियम आणि अटींना अधिन राहून सर्वच व्यवसाय सुरू झाले आहेत. इतर व्यवसाय सुरू होत असले तरी साताऱ्यातील चौपाटी मात्र लालफितीत आणि मनमानी धोरणामुळे अजूनही लॉकडाउनच आहे. सात महिन्यांहून अधिक काळ लॉकडाउन असल्याने साताऱ्यातील चौपाटीवर अवलंबून असणारे व्यावसायिक, कामगार आर्थिक अडचणीत आले आहेत.

साता-याची चौपाटी अजूनही लॉक! 500 व्यावसायिकांना फटका

sakal_logo
By
गिरीश चव्हाण

सातारा : कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याचे नाव घेत नसल्याने ढासळलेली अर्थव्यवस्था सावरण्यासाठी लॉकडाउन टप्प्याटप्प्याने शिथिल करत शासनाने विविध व्यवसायांना गती देण्याचे काम सुरू केले आहे. अनलॉकचे सहा टप्पे पूर्ण झाले असले तरी सुमारे सात महिन्यांपूर्वी लॉकडाउन केलेली साताऱ्यातील गांधी मैदानावरील चौपाटी अद्यापही तशीच आहे. त्यामुळे सुमारे 500 व्यावसायिकांच्या रोटीचा प्रश्‍न निर्माण झाला आहे.
 
याबाबत चौपाटीवरील व्यावसायिकांनी स्थानिक तसेच जिल्हा प्रशासनाला साकडे घातले असून अद्यापही त्यांच्याकडून चौपाटी अनलॉक करण्यासाठीचा कौल मिळालेला नाही. सातारा शहराचा मानबिंदू असणाऱ्या राजवाड्यासमोरील मोकळ्या पटांगणात (गांधी मैदान) गेली अनेक वर्षे दररोज चौपाटी भरते. जिभेचे चोचले पुरविणारे हरतऱ्हेचे खाद्यपदार्थ याठिकाणी मिळत असल्याने खवय्यांची गर्दी असते. चौपाटी नेमकी कधी सुरू झाली, याचा स्पष्ट उल्लेख नसला तरी ती सुरू करण्यात शर्मा, खरबू यांच्या पावभाजी, पाणीपुरीचा तसेच धावडे, जगताप यांच्या कोल्हापुरी भेळीचा मोठा हात आहे. हॉटेलात खाणे ही कृती चैनीच्या प्रकारात मोडत होती. त्या काळात चौपाटी विस्तारली. चौपाटीसमोरील राजवाड्यात यापूर्वी न्यायालय, ट्रेझरी व इतर शासकीय कार्यालये भरत होती. या कार्यालयांत कामासाठी जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो नागरिक दररोज येत असत. नागरिकांची गरज आणि निकडीपोटीच नंतरच्या काळात चौपाटीवर भजी, वडापाव, मेवाड आईस्क्रिमच्या गाड्यांची गर्दी झाली. नंतर या चौपाटीवर "चंद्रगुप्त' या नावाने पहिले फिरते उपहारगृह दाखल झाले.

साताऱ्यात भाजपचा आक्रमक पवित्रा; राज्य सरकारचं परिपत्रक फाडलं!

या उपहारगृहामुळे चौपाटीचा कायापालट सुरू झाला. चौपाटीचा विस्तार चायनीज पदार्थ, तंदुर, शोरमा, पिझ्या, हॉट बर्गर, थालीपीठ, मिल्कशेकच्या पुढे गेला आहे. दिवसेंदिवस वाढणारी गर्दी आणि त्यातून होणाऱ्या आर्थिक उलाढालीमुळे याठिकाणच्या खाद्यपदार्थांमध्ये दरवेळी विविधता येऊ लागली. आज या चौपाटीवर शंभरहून अधिक गाडे खवय्यांना खाद्यसेवा पुरवतात. हे गाडामालक, त्यांचे कुटुंब आणि त्यावरील कामगार असे सुमारे 500 जणांचा उदरनिर्वाह या चौपाटीवर अवलंबून आहे.

मायबाप सरकार आम्हाला मल्हारवारी द्या!

देशव्यापी लॉकडाउन होण्यापूर्वी परिसर देखभालीच्या नावाखाली 15 दिवस चौपाटी बंद करण्यात आली. कामे संपली आणि मार्चच्या अखेरीस चौपाटी पुन्हा बंद झाली. आज, उद्या सुरू होईल, या आशेवर या ठिकाणचे व्यावसायिक हातावर हात ठेवून बसले होते. तीन महिन्यांच्या सार्वत्रिक लॉकडाउनचा कालावधी संपला आणि टप्प्याटप्प्याने अनलॉकची प्रक्रिया सुरू झाली. इतर व्यवसाय सुरू झाले तरी साताऱ्याची चौपाटी अजूनही लॉकच आहे. त्यामुळे या ठिकाणच्या व्यावसायिक, कामगारांच्या रोटीचा प्रश्‍न निर्माण झाला असून त्याकडे दोन्ही लोकप्रतिनिधींनी सहानुभूतीपूर्वक पाहणे गरजेचे आहे. 

पावभाजीचे "प्राईस वॉर' राज्यभर गाजले
 
चौपाटीवर वाढणाऱ्या खाद्यपदार्थांच्या गाड्यांमुळे याठिकाणी येणाऱ्यांना आपल्याकडे खेचण्याची स्पर्धा येथे नेहमीच सुरू होते. याच चौपाटीवर पावभाजीचे काही मोजकेच गाडे होते. त्यात नंतर काही गाड्यांची भर पडली. त्यातून पावभाजीच्या दराची स्पर्धा चौपाटीवर सुरू झाली. ग्राहकांना खेचण्यासाठी या ठिकाणच्या एका व्यावसायिकाने पावभाजीची किंमत पाच रुपये जाहीर केली. त्याचा फटका इतरांना बसण्यास सुरुवात झाली. त्यामुळे इतर पावभाजी गाड्यावाल्यांनीही पावभाजीची किंमत पाच रुपये करत किंमत युध्दात उडी ठोकली. साताऱ्याच्या चौपाटीवर सुरू झालेल्या पावभाजीच्या प्राईस वॉरची चर्चा त्यावेळी राज्यभर झाली होती.

Edited By : Siddharth Latkar

loading image
go to top