ऊसदर प्रश्नी ऐन दिवाळीत रस्त्यावर उतरू; शेतकरी संघटनांचा इशारा

ऊसदर बैठक निष्फळ ठरल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला.
sugarcane
sugarcanesakal

सातारा : कारखानदारांनी ऊसदर जाहीर करावा, एफआरपीचे तुकडे न करता एकरकमी शेतकऱ्यांना पैसे मिळावेत, यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयात कारखानदार व शेतकरी संघटनांच्या पदाधिकाऱ्यांत बैठक झाली. दरम्यान, बैठकीत कारखानदारांनी आडमुठेपणाची भूमिका घेतल्याने ऊसदर बैठक निष्फळ ठरल्याचा आरोप शेतकरी संघटनांनी केला. बैठकीत ठोस निर्णय न झाल्याने ऐन दिवाळीत सर्व शेतकऱ्यांना बरोबर घेऊन एकजुटीने रस्त्यावर उतरून तीव्र लढा देण्याचा निर्णय शेतकरी संघटनांनी घेतला.

जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या अध्यक्षतेखाली कारखानदार व शेतकरी संघटनांच्या पदाधिकारी यांच्यात बैठक आयोजिली होती. या वेळी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके, बळीराजा संघटनेचे पंजाबराव पाटील, साजिद मुल्ला, रयत संघटनेचे सोनू साबळे, मधुकर जाधव, अर्जुन साळुंखे, धनंजय महामुलकर, दादासाहेब यादव, ॲड. विजय चव्हाण, रमेश पिसाळ, शरद जोशी शेतकरी संघटना व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

मागील देय रक्कम व एकरकमी एफआरपी देण्यास कारखानदारांनी नकार देऊन शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. पुढील काळात शेतकरी संघटना कारखान्यांचे गाळप बंद करणार आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत कारखानदार व प्रशासन शेतकऱ्यांना न्याय देतील, अशी अपेक्षा होती. मात्र, प्रशासनानेही हात वर करून शेतकऱ्यांना उघड्यावर टाकले. मात्र, जिल्ह्यातील जे कारखानदार एकरकमी ऊसदर देणार नाहीत अथवा जाहीर करणार नाहीत, अशा कारखान्यांविरोधात सर्व शेतकरी संघटना रस्त्यावर उतरून लढा देणार असल्याचा इशारा संघटनांनी दिला आहे.

सहकारमंत्र्यांच्या दारात आंदोलन

जिल्ह्यातील बहुतांश कारखान्यांनी मागील हंगामातील संपूर्ण ऊस बिलांची रक्कम शेतकऱ्यांना दिली नसल्याने शेतकऱ्यांची आर्थिक फसवणूक केली आहे. आजच्या बैठकीत जिल्ह्यातील रयत व न्यू फलटण शुगर वर्कस हे दोन कारखाने वगळता इतरांनी एकरकमी एफआरपी देण्यास विरोध केला. त्यामुळे ऐन दिवाळीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, सर्व कारखानदार व संचालकांच्या दारात बसून आंदोलन करणार असल्याचा इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राजू शेळके यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com