
सातारा येथील राजवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या शिल्पसृष्टीस वंचित बहुजन आघाडीने विरोध दर्शवला आहे.
सातारा : येथील राजवाडा बसस्थानकात उभारण्यात आलेल्या शिल्पसृष्टीस वंचित बहुजन आघाडीने विरोध दर्शवला आहे. याचे निवेदन वंचितच्या वतीने आज जिल्हाधिकारी कार्यालयास देण्यात आले आहे. यात सदर शिल्प न हटविल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.
सातारा येथील राजवाडा परिसरत असणाऱ्या बसस्थानकाच्या दुरुस्तीचे आणि सुशोभिकरणाचे काम सुरु आहे. या कामादरम्यान त्याठिकाणी छोटेखानी शिल्पसृष्टी उभारण्यात आली आहे. यात छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांच्या भेटीवर एका शिल्पाचा समावेश आहे. सदर शिल्पास आक्षेप घेत ती हटविण्याची मागणी वंचितने केली आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि समर्थ रामदास स्वामी यांची भेट झाल्याचा कोणताही ऐतिहासिक पुरावा उपलब्ध नसतानाही हे शिल्प उभारत इतिहासाचे विद्रुपीकरण करण्यात आल्याचा आरोप वंचितने निवेदनात केला आहे.
बहुजनांच्या आरक्षणाला धक्का न लावता, मराठा समाजाला आरक्षण द्या; खंडाळ्यात बुधवारी मोर्चा
सदर शिल्प कोणाच्या परवानगीने उभारण्यात आले, याची चौकशी करण्याची मागणीही करण्यात आली आहे. सदर शिल्प तात्काळ त्याठिकाणाहून हटवावे, अन्यथा तीव्र स्वरुपाचे आंदोलन छेडण्याचा इशाराही निवेदनात देण्यात आला आहे. या निवेदनावर चंद्रकांत खंडाईत, गणेश भिसे, बाळकृष्ण देसाई, गणेश कारंडे आदींच्या सह्या आहेत.
संपादन : बाळकृष्ण मधाळे