esakal | साहेब, माझं बाळ कुठे आहे?; अपघातग्रस्त आईच्या हंबरड्याने अनेकांना अश्रू अनावर
sakal

बोलून बातमी शोधा

साहेब, माझं बाळ कुठे आहे?; अपघातग्रस्त आईच्या हंबरड्याने अनेकांना अश्रू अनावर

अपघातग्रस्त बसमधील एक जखमी महिला जिवाच्या आकांताने आक्रोश करत होती. "माझे बाळं कुठ आहे", असे विचारत होती. तीचा आक्रोश पाहून तेथे मदत कार्य करणा-यांचे मन हेलावत होते. त्या महिलेस उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील डाॅ. कुलकर्णी यांना ती वारंवार विचारत होती. 'साहेब, माझे बाळ कोठे आहे, तिचा तो आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता.

साहेब, माझं बाळ कुठे आहे?; अपघातग्रस्त आईच्या हंबरड्याने अनेकांना अश्रू अनावर

sakal_logo
By
संतोष चव्हाण

उंब्रज (जि. सातारा) : वाशी (नवी मुंबई) येथील नायर कुटुंबात गेल्या सात दिवसांपासून दिवाळीच्या सुट्टीत बाहेर फिरायला जाण्याचा बेत आखला जात होता. त्यांनी गोवा येथे सुट्टी एन्जाॅय करण्याचे ठरवले. यासाठी त्यांनी एक खासगी मिनी बस बुक केली. दोन कुटुंबातील १२ जण सुट्टी एन्जाॅय करण्यासाठी दिनांक १३ रोजी रात्री ९ वाजता प्रवासास जाण्यासाठी नायर कुटुंबीय खासगी टूरिस्ट ट्रॅव्हल्सच्या मिनीबस क्रमांक (एमएच ०१ सीआर ९५६५ ) मधून निघाले होते. यात सात महिला, चार पुरुष आणि एक तीन वर्षांचे बालक व यासह चालक असे तेरा जण प्रवास करीत होते. हे सर्वजण काल रात्री ९ वाजण्याच्या सुमारास वाशी ( नवी मुंबई) येथून निघाले होते. 

तद्नंतर त्यांनी प्रवासात काल रात्री ११ वाजण्याच्या सुमारास खोपोली येथे जेवण केले व पुढील प्रवासास सुरूवात केली होती. यानंतर गाडीतच गप्पा मारत रात्री दोन वाजेपर्यंत बसमधील सर्व प्रवासी जागे होते. सर्वजण साखर झोपेत असताना आज पहाटे पाच वाजण्याच्या सुमारास उंब्रज गावच्या हद्दीत तारळी पुलानजीक मिनीबस आली. बस चालकाचा झोपेत बसवरील ताबा सुटला व बस महामार्गाच्या दुभाजकावर चढून सुमारे तीस फूट जाऊन दोन्ही पुलाच्या संरक्षक कठडा तोडून बस सुमारे ४० फूट खोल तारळी नदीपात्रात कोसळली. बस कोसळली त्यावेळी अंधार होता, तसेच महामार्गावर वाहनांची रहदारी कमी होती. त्यामुळे बस खाली कोसळ्याचे कोणीच पाहिले नसल्याने पहाटेच्या सुमारास अंधारात कोणालाच काही समजले नाही. 

#Breaking News पुणे- बंगळूर महामार्गावर वाशी- गोवा बसला अपघात; पाच ठार

परंतु बसमधील एक जखमी महिला कशीबशी बाहेर आली. यावेळी त्यांनी शंभर नंबरवर डायल करून अपघाताची माहिती व घटनेचे गुगल लोकेशन पोलिसांना कळविले. सदर अपघाताची माहिती उंब्रज पोलिसांना समजताच उंब्रज पोलीस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अजय गोरड व पोलिस कर्मचारी यांनी घटनास्थळी धाव घेतली. बस पुलाखालीच झाडे झुडपात असलेल्या ठिकाणी पडली होती. या रस्त्यातील झाडे काढण्यासाठी स्थानिक युवकांनी तातडीने ती झाडे झुडपे तोडली व बसच्या काचा फोडून जखमींना बसमधून बाहेर काढले.   दरम्यान, १०८ या रुग्णवाहिकेसह अन्य दोन खासगी रुग्णवाहिकेने जखमींना बाहेर काढून रूग्णवाहिकेतून सातारा येथे खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात येत होते. 

शेंद्रेत वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; चालकावर गुन्हा
    
दरम्यान, अपघातग्रस्त बसमधील एक जखमी महिला जिवाच्या आकांताने आक्रोश करत होती. "माझे बाळं कुठ आहे " असे विचारत होती. तीचा आक्रोश पाहून तेथे मदत कार्य करणा-यांचे मन हेलावत होते. त्या महिलेस उपचारासाठी नेत असताना रुग्णवाहिकेतील डाॅ. कुलकर्णी यांना ती वारंवार विचारत होती. साहेब माझे बाळ कोठे आहे, तिचा तो आक्रोश ह्रदय पिळवटून टाकणारा होता. डाॅ. कुलकर्णी यांना त्या महिलेस काय सांगायचे हा प्रश्न पडला होता. कारण, तीचे ते तीन वर्षांचे बाळ (मुलगा) या अपघातात ठार झाला होता. डाॅ. कुलकर्णी यांनी प्रसंगावधान साधत तिला बाळ सुखरुप असल्याचे सांगून सांत्वन केले. परंतु या घटनेने तेथे असणा-या पोलीस अधिका-यांसह मदत कार्य करणारांचे मन सुन्न झाले होते.  दीपावलीच्या पहिल्या दिवशी सगळीकडे धामधूम सुरू असताना पहाटेच्या सुमारास झालेल्या या भीषण अपघाताने काळजाचा थरकाप उडाला होता.

संपादन : बाळकृष्ण मधाळे

loading image
go to top