शेंद्रेत वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार; चालकावर गुन्हा

गिरीश चव्हाण | Saturday, 14 November 2020

सातारा वनक्षेत्रपाल शितल राठोड या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृत बिबट्या सातारा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणला.

सातारा : शेंद्रे (ता. सातारा) येथे अज्ञात वाहनाने शुक्रवारी रात्री अकराच्या सुमारास ठोकरल्याने अडीच वर्षे वयाचा बिबट्या ठार झाला. याप्रकरणी अज्ञात वाहनाच्या चालकावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया वनविभागाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. 

शेंद्रे (ता. सातारा) येथे महामार्गावर शुक्रवारी रात्री अज्ञात वाहनाने ठोकरल्याने एक बिबट्या मृतावस्थेत पडला होता. रात्र पाळीतील काम संपल्यानंतर अजिंक्‍यतारा सहकारी साखर कारखान्याचे काही कर्मचारी घराकडे परतत होते. यापैकी काही कामगारांना रस्त्याच्या मध्ये बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे दिसला. त्यांनी याची माहिती पोलिसांना तसेच वनविभागास दिली. माहिती मिळाल्यानंतर सातारा वनक्षेत्रपाल शितल राठोड या कर्मचाऱ्यांसमवेत घटनास्थळी दाखल झाल्या. त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करत मृत बिबट्या सातारा येथील वनविभागाच्या कार्यालयात आणला. शनिवारी सकाळी सहाय्यक वनसंरक्षक किरण कांबळे यांच्या उपस्थितीत बिबट्याच्या मृतदेहाचा पंचनामा करण्यात आला. 

पुणे-बंगळूर महामार्गावर ट्रकची रिक्षास ठाेकर; वडोली भिकेश्वरवर दुखाची छाया

पंचनाम्यादरम्यान बिबट्याच्या नख्या, दात तसेच इतर अवयव सुस्थितीत असल्याचे आढळले. पंचनामा व इतर शासकीय प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतर मृत बिबट्याला दहन करण्यात आले. याप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया वनविभागाच्या वतीने सुरु करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात महामार्ग ओलांडत असताना तीन बिबट्यांचा मृत्यू झाला आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे