विराेधकांचे चार नगरसेवक फोडत नगराध्यक्षांनी पुन्हा उपाध्यक्षपद खेचून आणले

रविकांत बेलोशे | Sunday, 20 September 2020

निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांनी काम पाहिले. या वेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर उपस्थित होते.

भिलार (जि. सातारा) : पाचगणी नगरपालिकेच्या उपाध्यक्ष निवडीत नगराध्यक्षा लक्ष्मी कऱ्हाडकर यांनी बहुमतात गेलेल्या विरोधकांना धोबी पछाड करीत नऊ - नऊ अशा समसमान स्थितीत असताना विनोद वसंतराव बिरामणे यांच्या पारड्यात कास्टिंग व्होट टाकत दुसऱ्यांदा उपाध्यक्षपद बहाल केले. पालिका कार्यालयात ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे विशेष सभा नुकतीच घेण्यात आली.
 
सहा जुलै रोजी उपाध्यक्ष अनिल वन्ने यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्याने ही जागा रिक्त झाली होती. त्यानंतर कोरोना संकट उद्‌भवल्याने या निवडी रेंगाळल्या होत्या. त्यामुळे नव्या उपाध्यक्ष निवडीसाठी ही सभा नुकतीच बोलावली होती. नामनिर्देशन पत्र दाखल करण्याच्या वेळेत विनोद बिरामणे यांचे दोन, तर अर्पणा मिलिंद कासुर्डे यांचा एक अर्ज दाखल झाला. दोन अर्ज दाखल झाल्याने निवडणूक मतदानावर आली. या वेळी ऑनलाइन व्हिडिओ कॉन्फरन्सिंग पद्धतीने हात वर करून मतदान झाले. यामध्ये विनोद बिरामणे यांना नऊ मते पडली. अर्पणा कासुर्डे यांना  नऊ मते पडली. समसमान मते पडल्याने शेवटी नगराध्यक्षांना कास्टिंग व्होटचा अधिकार असल्याने नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांनी बिरामणे यांच्या बाजूने हात वर केल्याने या निवडणुकीत बिरामणे एका मताने विजयी झाले. दुसऱ्यांदा उपाध्यक्षपदाच्या खुर्चीत विराजमान झाले. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून नगराध्यक्षा कऱ्हाडकर यांनी काम पाहिले. या वेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर उपस्थित होते.

उमेद अभियान मातोश्रीवर धडकणार; मुख्यमंत्र्यांना चार लाख महिलांचे साकडे
 
यापूर्वी नगराध्यक्ष गटाकडे चार नगरसेवक होते आणि विरोधात 13 नगरसेवक होते. त्यामुळे या वेळीही उपाध्यक्षपद हे अध्यक्षांच्या विरोधातील गटाकडे जाणार ही चिन्हे होती; परंतु कऱ्हाडकर यांनी या वेळीही विरोधी गटाला धोबी पछड करीत त्यांचे चार नगरसेवक फोडत पुन्हा एकदा उपाध्यक्षपद आपल्याकडेच राखले.

Edited By : Siddharth Latkar