शेतक-याने दिला जून्या परंपरेला उजाळा; वाणवसासह लाडक्या लेकीची पाठवणी केली बैलगाडीतून

विकास जाधव
Friday, 22 January 2021

आधुनिक युगातही पांरपारिक पद्धतीने मुलीला बैलगाडीतून सासरी पाठविल्याने ग्रामस्थांमध्ये जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याची चर्चा हाेती.

काशीळ (जि. सातारा) : सजवलेले बैल, घूंगराची रंगीत गाडी आणि आपल्या लाडक्या मुलीला ऐटीत सासरी वंसा (वेगवेगळ्या पदार्थांनी भरलेल्या करंड्या) पोचवायला निघालेला पिता, असे दृष्य वेगाच्या युगात दुर्मिळ होत चालले आहे. परंतु काशीळ (ता. सातारा) येथील माने कुटुंबियांनी आपल्या मुलीला बैलगाडीतून सासरी पोचवत जुन्या आठवणीना उजाळा दिला.

हिंदू धर्मात लग्नानंतर पहिल्या संक्रातीस सांसरहून माहेरला वंसा नेला जातो. व सक्रांत झाल्यानंतर मुलीच्या माहेरातून ववसा घेऊन सासरी सोडण्याची पद्धत आहे. काळाबरोबर या पद्धतीत बदल होत गेला आहे. सध्या युगात चारचाकी गाड्यातून वंसा आणला नेला जातो. मात्र या पद्धतीला माने कुटुंबियांनी फाटा दिला आहे. येथील तुकाराम गोविंद माने यांच्या पाच भावांचे कुटुंब आहे. हे सर्व भाऊ शेतकरी आहेत. बागायत भागात बैलाचे संगोपन हाताच्या बोटावर मोजण्याइतके शेतकरी करत असलेतरी या कुटुंबाचा मुख्य आधार शेती असल्याने घरी बैलजोडी संगोपन केले जाते. या कुटुंबातील तुकाराम माने यांची पुतणी व सुनिल माने यांची मुलगी शिवानी हिला अतित या सासरहून प्रथेपरंपरे प्रमाणे संक्रातीसाठी आणले होते.

उदयनराजेंसह 11 कार्यकर्ते निर्दाेष; वाई न्यायालयाचा निर्वाळा

सक्रांत झाल्यावर मुली सासरी पाठवण्यासाठी त्यांनी नव्या पद्धतीत बदल करत पारंपरिक पद्धतीचा अवलंब केला आहे. घरची बैलांची जोडीस बेंदूर सणाप्रमाणे घुगरू, रंगरंगोटी व सजावट केली. तुकाराम माने यांनीही फेटा बांधून हा वंसा व आपल्या मुलीला बैलगाडीतून घेऊन गेले. हा अतितचा पाच किलोमीटर प्रवास त्यांनी मुलीला घेऊन केला आहे. पुर्वी ग्रामीण भागात चार चाकी वाहन पहायला देखील मिळत नसतं. सर्व प्रवास पायी किंवा बैलगाडीतून करावा लागत असे. लग्नाचे व-हाड असाे अथवा मुलीला सासरी पाठविणे असाे बैलगाडी शिवाय पर्याय नव्हता. परंतु आता सामान्यांनाही
चार चाकी वाहने सहज उपलब्ध हाेतात. त्यामुळे बैलगाडीतून प्रवास इतिहासजमा झाला आहे. आधुनिक युगातही पांरपारिक पद्धतीने मुलीला सासरी पाठविल्याने जुन्या आठवणींना उजाळा दिला आहे.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Viral Video Of Bullock Cart From Kashil Father Daughter Satara Marathi News