हात धुवायचे की पाणी प्यायचे?, कोरोना प्रतिबंधित वरोशीत पाणीटंचाई

Satara
Satara

केळघर (जि. सातारा) : कोरोना विषाणू प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर झालेल्या वरोशी (ता. जावळी) येथे सार्वजनिक पाणीपुरवठा योजनेच्या नळांना चार दिवसांतून पाणी येत असल्यामुळे ग्रामस्थ व महिलांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी सतत हात धुवायचे, की पाणी प्यायचे? असा प्रश्‍न ग्रामस्थांसमोर उभा ठाकलेला आहे. 

वरोशी येथे कोरोनाबाधित दोन रुग्ण सापडल्याने गावास प्रशासनाने प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर केले आहे. लॉकडाउन असल्यामुळे ग्रामस्थांना घराबाहेर पडणे अशक्‍य झाले आहे. त्यातच पाण्याची टंचाई प्रचंड वाढू लागल्यामुळे ग्रामस्थांच्या अडचणीत भर पडली आहे. वरोशीतील सार्वजनिक विहिरीतून नळाद्वारे पाणीपुरवठा केला जातो. मात्र, सार्वजनिक विहिरीतील पाण्याची पातळी कमालीची खालावली असल्यामुळे पाणीपुरवठ्यासाठी मर्यादा येत आहे. त्यामुळे अगदी चार दिवसांतून एकदा नळाला पाणी येत आहे. 

कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे मुंबई, पुणे आदी भागांतून अनेक जण आपल्या मूळ गावाला आलेले आहेत. पर्यायाने पाण्याचा वापरही वाढला आहे. सार्वजनिक नळातून येणारे पाणीही पुरेसे नसल्याने ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी माता-भगिनींना पायपीट करावी लागत आहे. प्रशासनाने टॅंकर 
सुरू केला असला तरी पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने टॅंकरच्या फेऱ्या वाढवाव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून व्यक्त होत आहे. 

वरोशीसह परिसरात अनेक गावांत पाणीटंचाई जाणवत असल्याने याचा त्रास प्रामुख्याने महिलांना होत असून, परिसरातील पाणीटंचाईवर शाश्वत तोडगा काढण्यासाठी मेढा, केळघर विभागातील 54 गावांसाठी महत्त्वपूर्ण असलेल्या बोंडारवाडी धरणाचा प्रश्न शासनाने त्वरित मार्गी लावणे आवश्‍यक असून, तरच पाणीटंचाई कमी होईल, अन्यथा वर्षानुवर्षे पाणीटंचाई तशीच राहील. यासाठी या धरणाविषयी सकारात्मक तोडगा काढण्यासाठी शासन व प्रशासनाने प्रयत्न करावेत, अशी मागणी जावळी पंचायत समितीच्या माजी उपसभापती निर्मला कासुर्डे यांनी केली आहे. 

""वरोशीत पाणीटंचाईमुळे नागरिकांचे हाल होत आहेत. त्यामुळे तहसीलदार शरद पाटील यांच्याशी संपर्क साधून तेथे प्रशासनाच्या वतीने तत्काळ टॅंकर सुरू केला असून, टॅंकर नियमितपणे पाठवून पाणीटंचाई कमी करण्यासाठी प्रयत्न करत आहे.'' 

- सतीश बुद्धे, गटविकास अधिकारी, जावळी 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com