Weather Update : कऱ्हाड, पाटणला विजांच्या कडकडाटांसह पावसाचा तडाखा; वीज पुरवठा खंडित, मोठं नुकसान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Heavy rain in Karad Patan

कऱ्हाड-पाटण तालुक्यात पंधरा दिवसांपासून हवेतील उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. काल दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात वादळी पावसाने हजेरी लावली.

Weather Update : कऱ्हाड, पाटणला विजांच्या कडकडाटांसह पावसाचा तडाखा; वीज पुरवठा खंडित, मोठं नुकसान

कऱ्हाड/पाटण : वळवाच्या दमदार पावसाने (Heavy Rain) काल कऱ्हाड-पाटण तालुक्यात हजेरी लावली. अनेक दिवसांपासून हुलकावणी देणारा पाऊस कोसळल्याने हवेत गारवा निर्माण झाला. चचेगाव येथे नारळाच्या झाडावर वीज पडून नुकसान झाले.

तर उत्तर कोपर्डे ग्रामपंचायतीसमोर कऱ्हाड-मसूर मुख्य रस्त्यावर झाड कोसळून (Karad Patan Rain) वाहतूक काहीकाळ ठप्प झाली. नडशी कॉलनी येथील काही घरांवरील पत्रे उडाले. काही ठिकाणी शेडवर झाडे पडून नुकसान झाले. पाटण तालुक्यात काही ठिकाणी गारांचा पाऊस झाला.

कऱ्हाड-पाटण तालुक्यात पंधरा दिवसांपासून हवेतील उष्मा मोठ्या प्रमाणात वाढला होता. त्यामुळे अंगाची लाहीलाही होत होती. काल दुपारी विजांचा कडकडाट आणि ढगांच्या गडगडाटात वादळी पावसाने हजेरी लावली. आकाशात विजा चमकत असल्याने आणि सोसाट्याचा वारा सुटल्याने वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. प्रचंड उष्म्याने हैराण झालेल्या जनतेला पावसामुळे दिलासा मिळाला आहे. चार दिवसांपासून प्रचंड उकाडा जाणवत होता.

दिवसभर रखरखते ऊन आणि रात्री उष्मा यामुळे नागरिक हैराण झाले होते. आज दुपारनंतर आकाशात ढग जमा झाले. सर्वत्र आभाळ भरून येऊन विजांच्या कडकडाटांसह वादळी पाऊस सुरू झाला. पावसाचा जोर फारसा नव्हता; पण वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित करण्यात आला होता. या पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या जनतेला दिलासा मिळाला. हवेत गारवा निर्माण झाला होता. या पावसामुळे शहरातील भाजी मंडईत शेतकरी, व्यापाऱ्यांची त्रेधातिरपीट उडाली.

मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित

पाटण : परिसरात सायंकाळी साडेपाच वाजण्याच्या सुमारास विजांचा गडगडाट आणि वादळी वाऱ्यासह वळवाच्या पावसाने नवारस्ता, मरळी, मल्हारपेठ व मारूल हवेली परिसराला झोडपले. अर्धा तास पडलेला पाऊस जिरवणीचा होता. काही ठिकाणी गारा पडल्या. मुसळधार पावसामुळे वीज पुरवठा खंडित झाला होता.

मुसळधार पडलेल्या पावसामुळे शेतकऱ्यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. नाडे, नाडोली, सांगवड, पापर्डे, मारूल हवेली, गारवडे, मल्हारपेठ व परिसरातील वाड्यावस्त्या याठिकाणी पाऊस पडला. काही गावांमध्ये तुरळक प्रमाणात गारा पडल्या. वादळी वाऱ्यामुळे वीज पुरवठा खंडित झाला. पडलेल्या पावसामुळे खरीप पूर्व मशागतीची कामे वेग घेणार आहेत.

कऱ्हाड-मसूर मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक बंद

शिरवडे : नडशी, उत्तर कोपर्डे, शिरवडे परिसरात सायंकाळच्या सुमारास अवकाळी वादळी वारा व गारपिटीसह पावसाने जोरदार हजेरी लावली. तासवडे-शिरवडे पुलालगत झाड पडल्याने महामार्गाकडून येणारी वाहतूक रखडली. उत्तर कोपर्डे ग्रामपंचायतीसमोर कऱ्हाड-मसूर मुख्य रस्त्यावर झाड कोसळल्याने वाहतूक बंद पडली.

तसेच अचानक आलेल्या सोसाट्याच्या वाऱ्यामुळे शेतकऱ्यांची तारांबळ उडाली. सुदैवाने जीवितहानी झाली नसल्याचे समजते. दिवसभर उन्हाची तीव्रता वाढल्यामुळे सायंकाळी तुफान वारे, वीज व गारपिटीसह पावसाने हजेरी लावली. जोरदार वाऱ्यामुळे परिसरात ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडली. गारपिटीमुळे आंबा पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. अचानक आलेल्या पावसाने उन्हाळी कामात व्यस्त शेतकरी वर्गाची पुरती तारांबळ उडाली.

कऱ्हाड ते मसूर रस्त्यावर ठिकठिकाणी झाडे उन्मळून पडल्याने बराच काळ वाहतूक विस्कळित झाली. उत्तर कोपर्डे ग्रामपंचायत शेतीपंप वीजवाहिनीवर झाड पडले. त्यामुळे तूर्तास पाणीपुरवठा खंडित राहणार आहे. माणिकराव थोरात यांचे किराणा दुकान वाऱ्यामुळे उलटले, नडशी कॉलनी येथे अधिकराव थोरात, राजेंद्र गुजर, माणिक जावीर यांच्या शेड व घरावरील पत्रे उडून पडले. राजेंद्र कुंभार, संजय कुंभार, संभाजी थोरात यांच्या घरासमोरील झाडे जनावरांचे शेड व घरावर पडून शेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. वीज खांबावर झाड पडल्याने वीज पुरवठा खंडित झाला.