म्हसवडला 'उभ्या' नवरात्राचे व्रत सुरू; गावची वेस ओलांडण्यास मज्जाव

सल्लाउद्दीन चोपदार
Monday, 23 November 2020

सध्या कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असल्याने शासन नियमांच्या अधीन राहूनच सर्व कार्यक्रम देवस्थान मंदिर ट्रस्टी सुरक्षितपणे पार पाडत आहेत.

म्हसवड (जि. सातारा) : येथील श्री सिद्धनाथ, देवी जोगेश्वरी देवस्थानच्या शाही मंगल विवाह सोहळा उत्सवानिमित्त दीपावली पाडवा ते तुलसी विवाह दरम्यानच्या 12 दिवसांच्या पारंपरिक "उभ्या' नवरात्राचे व्रत सध्या सिद्धनाथ मंदिरात सुरू झाले आहे. 

सध्या कोरोनाच्या साथीच्या पार्श्वभूमीवर शासनाने सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द केले असल्याने शासन नियमांच्या अधीन राहूनच सर्व कार्यक्रम देवस्थान मंदिर ट्रस्टी सुरक्षितपणे पार पाडत आहेत. दीपावली पाडवा ते देव दीपावलीदरम्यानच्या एक महिन्याच्या कालावधीच्या या शाही विवाह सोहळ्यातील सर्वात महत्त्वाचे उपवासाच्या व्रताचे 12 दिवस महत्त्वाचे असतात. 12 दिवसांनंतर तुलसी विवाहादिवशी पहाटे साडेपाच वाजता हे घट उठविले जातात. त्या वेळी नवरात्राची समाप्ती होते म्हणजेच उपवास सोडले जातात. हे नवरात्राचे उपवास करणाऱ्यांना या सलग 12 दिवसात दररोज पहाटे चार वाजता कार्तिकस्नान करून नगरप्रदक्षिणा घालावी लागते. या नगर प्रदक्षिणेची सुरुवात "श्रीं'च्या मंदिरापासून होते.

कोपर्डे हवेलीत सिद्धनाथांचा शेतकरी अवतार; भाविकांचे वेधले लक्ष 

उभे नवरात्र करणाऱ्यांना धोतर नेसून, खांद्यावर उपरणे घेऊन, हातात तांब्याच्या कलशात शुद्ध उदक घेऊन अनवाणी ही नगरप्रदक्षिणा घालावी लागते. गावाची वेस ओलांडून परगावी जायचे नसते. अहोरात्र 12 दिवस उभे राहावे लागते. गुरुवार (ता. 26) तुलसी विवाह रोजी पहाटे साडेपाच वाजता हे 12 दिवसांचे घट उठणार असून, "श्रीं'चे नवरात्राचे उपवास सुटणार आहेत. त्याच दिवशी रात्री 12 वाजता "श्रीं'चा शाही मंगल विवाह सोहळा पारंपरिक व धार्मिक विधीपूर्वक पार पडणार आहे. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Wedding Ceremony Of Siddhanath And Goddess Jogeshwari At Mhaswad Satara News