कारच्या धडकेत महिला ठार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Manshing shinde

कारच्या धडकेत महिला ठार

कऱ्हाड/उंब्रज - कऱ्हाड तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या अपघातांत क्रीडा शिक्षकासह वृद्धा ठार झाली. रस्त्याकडेलाच लागून असलेल्या अंगणात कपडे धुताना तारुखमध्ये वृद्ध महिलेसह पुतणीला कारने धडक दिली. त्यात वृद्धा ठार झाली असून, पुतणी गंभीर जखमी झाली. दुसऱ्या अपघातात मसूर फाट्यानजीक मोटारसायकल व टेंपोमध्ये झालेल्या धडकेत मोटारसायकलस्वार क्रीडा शिक्षकाचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला.

कऱ्हाड : रस्त्याकडेलाच लागून असलेल्या अंगणात कपडे धुताना वृद्ध महिलेसह पुतणीला कारने धडक दिली. त्यात वृद्धा ठार झाली असून, पुतणी गंभीर जखमी झाली. ही घटना आज दुपारी सव्वाबाराच्या सुमारास तारुख (ता. कऱ्हाड) येथे घडली. कांताबाई जगन्नाथ भिंगारदिवे (वय ६७) असे मृताचे नाव असून, आरोही लक्ष्मण साठे (वय ८) ही चिमुकली गंभीर जखमी झाली आहे. या अपघातप्रकरणी अरविंद दत्तात्रय पाटील (रा. विद्यानगर, ता. कऱ्हाड) असे गुन्हा दाखल झालेल्या कार चालकाचे नाव आहे. तालुका पोलिसांची माहिती अशी ः कऱ्हाड- ढेबेवाडी रस्त्यालगत तारुख गावातील घरासमोरील अंगणात कांताबाई भिंगारदेवे या कपडे धूत होत्या. त्यांच्याजवळच आठ वर्षांची चिमुकली आरोही खेळत होती. कऱ्हाड-ढेबेवाडी रस्त्याने जाताना अरविंदने भरधाव वेगात कार चालवून कांताबाई व आरोही यांना जोरदार धडक दिली. दोघींना नातेवाइकांनी कऱ्हाडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. उपचारापूर्वीच कांताबाई यांचा मृत्यू झाला होता. आरोहीवर उपचार सुरू आहेत. शिवाजी उमाजी साठे (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. सहायक पोलिस निरीक्षक सखाराम बिराजदार तपास करत आहेत.

मसूर फाट्यानजीक क्रीडा शिक्षक ठार

उंब्रज : पुणे- बंगळूर महामार्गावर शिवडे (ता. कऱ्हाड) गावच्या हद्दीत मसूर फाट्यानजीक मोटारसायकल व टेंपोमध्ये झालेल्या धडकेत मोटारसायकलस्वार क्रीडा शिक्षकाचा उपचारादरम्यान आज पहाटे मृत्यू झाला. मानसिंग आनंदा शिंदे (वय ५४, रा. हनुमानवाडी, ता. कऱ्हाड) असे मृताचे नाव आहे. हा काल (ता. २४) दुपारी ४ वाजण्याच्या सुमारास घडला होता. पोलिसांची माहिती अशी, हनुमानवाडी येथील क्रीडा शिक्षक मानसिंग शिंदे हे काल सायंकाळी मोटारसायकलवरून (एमएच ५० एस ५३३३) कऱ्हाडहून हनुमानवाडीकडे जात होते. शिवडे गावच्या हद्दीत मसूर फाटा येथे मोटारसायकल व टेंपोची (केए १३ डी १८९९) धडक झाली. या धडकेत मानसिंग शिंदे हे जखमी झाले. त्यांना उपचारासाठी कऱ्हाड येथे कृष्णा रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. उंब्रज पोलिसांनी टेंपो चालकाला ताब्यात घेतले आहे. शिंदे हे यशवंतराव चव्हाण विद्यालयात (यशवंतनगर) क्रीडा शिक्षक म्हणून कार्यरत होते. कऱ्हाड- पाटण तालुका माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे संचालक, पुणे माध्यमिक शिक्षक पतसंस्थेचे अध्यक्षचे आदी पदांवर कार्यरत होते.

Web Title: Woman Killed In Car Crash In Karad

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top