ग्राहकांतून नाराजीचा सूर उमटताच टपाल कार्यालयाचा कारभार पूर्वपदावर

यशवंतदत्त बेंद्रे
Thursday, 26 November 2020

तारळे विभागात एकमेव टपाल कार्यालय आहे. विभागातील 16 डाक शाखांचा व्यवहारही येथूनच चालतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथील व्यवहार असुविधांच्या गर्तेत अडकला होता. लोकांना वेळेवर पैसे न मिळणे, नवीन खाते काढणे व बंद करणे, आरडी खात्यावरील पैसे न मिळणे असे व्यवहार ठप्प झाले होते.

तारळे (जि. सातारा) : येथील व्यवहाराचे केंद्र असलेल्या टपाल कार्यालयात गत दोन महिन्यांत कामाची अनियमितता सुरू होती. कामांच्या खोळंब्याबरोबर पैसेही वेळेत मिळत नसल्याने ग्राहक वर्गातून नाराजीचा सूर उमटत होता. मोठी उलाढाल असलेल्या या कार्यालयाचे दुखणे कायमचे घालविण्यासाठी वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे आहे. अशा आशयाचे वृत्त प्रसिद्ध केल्यावर तातडीने रिक्तपदी कर्मचारी हजर झाला असून, कारभार पूर्वपदावर आला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त होत आहे. 

येथे विभागातील एकमेव टपाल कार्यालय आहे. विभागातील 16 डाक शाखांचा व्यवहारही येथूनच चालतो. मात्र, गेल्या काही महिन्यांपासून येथील व्यवहार असुविधांच्या गर्तेत अडकला होता. लोकांना वेळेवर पैसे न मिळणे, नवीन खाते काढणे व बंद करणे, आरडी खात्यावरील पैसे न मिळणे असे व्यवहार ठप्प झाले होते. ग्रामीण विभागात टपाल खात्यावर लोकांचा प्रचंड विश्वास असतो. त्यामुळे लाखो रुपये गुंतवणूक पोस्टात केली जाते. मात्र, वरील अनुभव येऊ लागल्याने ग्राहक संतापले होते. 

ठाकरे सरकारविरोधात साताऱ्यात मनसे आक्रमक; ऊर्जामंत्र्यांना 'झटका' देणार?

याबाबत कार्यालयात माहिती घेतली असता, येथे एक पद रिक्त असल्याने दोन माणसांवर कारभार सुरू होता. यातील कारकुनाला लॉगिन आयडी मिळालेला नाही, शिवाय त्यांचे कोरोनामुळे प्रशिक्षण न होता, हजर झाले. दिवसातून अनेकदा इंटरनेट गायब होत असते आदी कारणांमुळे लोकांची गैरसोय होत असल्याची माहिती मिळाली. याबाबत दैनिक "सकाळ'ने सविस्तर वृत्त प्रकाशित केले होते. याची वरिष्ठांनी दखल घेत येथील हक्काचा कर्मचारी पाठविला. 15 दिवसांपूर्वी कर्मचारी रूजू झाला असून, कारभार पूर्वपदावर आला आहे. त्यामुळे ग्राहकांकडून समाधान व्यक्त होत असून, "सकाळ'ला धन्यवाद दिले जात आहेत. 

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Work On The Post Office At Tarle Resumed Satara News