माणमधील सहा गावांतील पारंपरिक यात्रा रद्द

सल्लाउद्दीन चोपदार, रुपेश कदम
Thursday, 22 October 2020

माण तालुक्‍यातील जांभुळणी, वळई, विरळी येथील भोजलिंग, वडजाईदेवी, म्हस्कोबा, सिदोबा या देवतांच्या यात्रा सालाबादप्रमाणे पारंपरिकतेने विजयादशमीदिवशी होणार होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार ता. 14 ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत सर्व सार्वजनिक धार्मिक सण, उत्सव, यात्रा साजरी न करण्याचा आदेश असल्याने श्री. भावीकट्टी यांनी जांभुळणी येथे श्री भोजलिंग मंदिरात मानकरी, पुजारी व विविध गावचे आजी-माजी सरपंचांची बैठक घेतली.

म्हसवड (जि. सातारा) : माण तालुक्‍यातील भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या विरळीतील भोजलिंग, वडजलची वडजाईदेवी, शेनवडीचा म्हस्कोबा, पुकळेवाडीचा सिदोबा, टाकेवाडीच्या सतोबा व पांगरीच्या बिरोबा या यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती म्हसवड पोलिस ठाण्याचे प्रभारी सहायक पोलिस निरीक्षक महेश भावीकट्टी यांनी दिली.

माण तालुक्‍यातील जांभुळणी, वळई, विरळी येथील भोजलिंग, वडजाईदेवी, म्हस्कोबा, सिदोबा या देवतांच्या यात्रा सालाबादप्रमाणे पारंपरिकतेने विजयादशमीदिवशी होणार होत्या. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकारी शेखर सिंह यांच्या आदेशानुसार ता. 14 ते 31 ऑक्‍टोबर या कालावधीत सर्व सार्वजनिक धार्मिक सण, उत्सव, यात्रा साजरी न करण्याचा आदेश असल्याने श्री. भावीकट्टी यांनी जांभुळणी येथे श्री भोजलिंग मंदिरात मानकरी, पुजारी व विविध गावचे आजी-माजी सरपंचांची बैठक घेतली. या वर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी यात्रा न करण्याचे आदेश असल्याची माहिती देण्यात आली. 

शेतकऱ्यांना सरसकट मदत द्या; सरकारविरोधात दरेकर, शिवेंद्रसिंहराजे आक्रमक

यावेळी सर्व मानकरी व पुजाऱ्यांच्या उपस्थितीत ता. 25 व 26 ऑक्‍टोबर रोजी होणारी यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी श्री भोजलिंग देवस्थान मंदिराचे पुजारी भारत काळेल, बाबा काळेल, ऍड. सिध्दार्थ काळेल, पोलिस कर्मचारी अभिजित भादुले, पोलिस नाईक किरण चव्हाण, जांभुळणीचे पोलिस पाटील सुभाषराव काळेल, वळईचे पोलिस पाटील दादा आटपाडकर, घुटुकडे सरपंच प्रशांत गोरड, बबन काळेल उपस्थित होते. या चार गावांच्या यात्रा रद्द करण्यात आल्या असून भाविकांनी या वर्षी यात्रेसाठी उपस्थित राहू नये, असे आवाहन यात्रा समित्यांच्या वतीने करण्यात आले आहे. 

उदयनराजे उद्या सातारकरांशी साधणार संवाद

सतोबा-बिरोबाच्या यात्राही रद्द

दहिवडी : धनगर समाजाचे दैवत असलेल्या टाकेवाडी (ता. माण) येथील श्री सतोबा देवाची ता. 26 ऑक्‍टोबर रोजी होणारी यात्रा रद्द करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे सचिव दादा बाबा दडस यांनी दिली. यासंबंधी दहिवडी पोलिस ठाण्यात झालेल्या बैठकीत टाकेवाडीच्या सतोबा व पांगरीच्या बिरोबाच्या यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला. टाकेवाडीचे श्री सतोबा देवाची यात्रा घटस्थापना ते विजयादशमीदरम्यान असते. पोलिस उपअधीक्षक डॉ. नीलेश देशमुख यांच्या उपस्थितीत दहिवडी पोलिस ठाण्यात श्री सतोबा तसेच श्री बिरोबा देवस्थानच्या विश्वस्तांची बैठक झाली. यावेळी सहायक पोलिस निरीक्षक राजकुमार भुजबळ यांनी मार्गदर्शन केले. त्यानंतर यात्रा रद्द करण्याचा निर्णय घेतला.

संपादन : बाळकृष्ण मधाळे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Yatra Festivals In Six Villages In Maan Canceled Satara News