येरळा नदीपात्र अतिक्रमणाच्या विळख्यात; शेतीचे नुकसान

येरळा नदीपात्र अतिक्रमणाच्या विळख्यात; शेतीचे नुकसान

विसापूर (जि. सातारा) : खटाव तालुक्‍यातील लोकांची जीवनदायिनी असलेल्या येरळा नदीचे पात्र अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले आहे. या नदीवर बहुतांश ठिकाणच्या पात्रात अतिक्रमण झाल्याने काही ठिकाणी पात्र उथळ व अरुंद झाल्याचे चित्र आहे. परिणामी, मागील आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसाने पाणी पातळी वाढून नदीकाठच्या लोकांना पुराची झळ पोचली. नदीकाठच्या अनेक शेतकऱ्यांची जमीन खचली असून, पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. 

या नुकसानीस नदीपात्रातील अतिक्रमणे कारणीभूत ठरली असून, शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांसोबत नदीकाठच्या काही विहिरी, पाइपलाइन, ठिबक सिंचन व्यवस्था, तसेच अन्य काही शेती साधनेदेखील वाहून गेल्याचे चित्र अनेक ठिकाणी दिसून आले. खटाव तालुक्‍यातील मांजरवाडी येथे येरळा नदीचा उगम झालेला आहे. डोंगरात उगम पावलेली ही नदी सातारा आणि सांगली जिल्ह्यांतील कायमस्वरूपी दुष्काळी तालुके खटाव, खानापूर, तासगाव तालुक्‍यांतील लोकांची जीवनदायिनी आहे. येरळा नदी ही सहामाही वाहिनी असून, साधारण नदी दक्षिणेकडे वाहत जाऊन सांगली जिल्ह्यातील ब्रह्मनाळ जवळ कृष्णा नदीस मिळते. खरतर नदीचे पात्र हे नदीचे हक्काचे घर आहे. त्या घरामध्ये इतरांनी अतिक्रमण करू नये, हीच अपेक्षा असते. मात्र, येरळा नदी सहामाही असल्यामुळे डिसेंबर-जानेवारीतच पाण्याच्या उपशामुळे पात्र कोरडे असते. कोरड्या पात्रामुळे आजूबाजूच्या लोकांना अतिक्रमण करण्यास वाव मिळतो. 

दरम्यान, येरळा नदीपात्रात अनेक ठिकाणी राडारोडा, दगड-माती मुरूम टाकून मोठाले भराव तयार करण्यात आले आहेत, तसेच वाहतुकीसाठी कच्चे रस्ते तयार केले गेले आहेत. नदीकाठच्या गावातील स्मशानभूमी, दशक्रिया विधीचे घाट, त्याचे निवारा शेड, रस्ते, पूल अशा अनेक अतिक्रमणांचे विकृत येरळा नदीपात्रात बहुतांश ठिकाणी आपणाला पाहावयास मिळते. मात्र, या अतिक्रमणांमुळे नदीकाठच्या शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत असून, शेतीच्या सुरक्षिततेचे प्रश्न निर्माण होत आहेत. सद्यःस्थितीत येरळा नदीलगत अतिक्रमण करणाऱ्यांना कोणत्याही कारवाईचा धाक राहिलेला नाही. येरळा काठच्या शेतीचे नुकसान टाळण्यासाठी महत्तम पूरपातळीच्या आतील सर्व अतिक्रमणे काढणे व ती पुन्हा होणार नाहीत, यासाठी संबंधित विभागाने प्रयत्नशील राहणे आवश्‍यक आहे, तसेच नदीपात्रात कोणत्याही प्रकारे राडारोडा टाकला जाणार नाही, याकडेही लक्ष देण्याची गरज आहे. 

येरळा नदीत आजूबाजूच्या लोकांकडून झालेल्या अतिक्रमणामुळे नदीकाठच्या शेती-पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. या नुकसानीच्या पंचनाम्याची प्रक्रिया पूर्ण झाली असून, लवकरच येरळा नदीच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात येणार आहे. 
-गणेश बोबडे, तलाठी, पुसेगाव 

शासनाने येरळा नदीचे सीमांकन करून नदी अतिक्रमणमुक्त करावी. यामुळे नदीचा प्रवाह सुरळीत होऊन पुरामुळे शेतीची होणारी हानी टाळता येईल. 
-प्रकाश जाधव, शेतकरी, जलप्रेमी, यशदा (पुसेगाव) 

संपादन : बाळकृष्ण मधाळे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com