
यावर्षीच्या फिजिक्स विषयातील नोबेल पुरस्काराची घोषणा झाली आहे. रॉयल स्वीडिश अकॅडमी ऑफ सायन्सेस या संस्थेकडून याबाबत घोषणा करण्यात आली. पिएरे अगॉस्टिनी, फेरेंक क्राउस्झ आणि अॅनी एल हुल्लिएर या तीन वैज्ञानिकांना हा पुरस्कार मिळाला आहे.
एखाद्या मॅटरमधील इलेक्ट्रॉन डायनॅमिक्सच्या अभ्यासासाठी प्रकाशाच्या अॅटोसेकंद पल्सेस जनरेट करणाऱ्या पद्धतींच्या शोधासाठी या तीन वैज्ञानिकांना हा पुरस्कार मिळाला आहे.
यातील पिएरे अगॉस्टिनी हे अमेरिकेतील ओहायो स्टेट युनिवर्सिटीमध्ये प्राध्यापक आहेत. फेरेंक क्राउस्झ हे जर्मनीतील मॅक्स प्लँक इनस्टिट्यूट ऑफ क्वांटम ऑप्टिक्स याठिकाणी कार्यरत आहेत. तर अॅनी या स्वीडनमधील लँड विद्यापीठात प्राध्यापिका आहेत.
यापूर्वी 2 ऑक्टोबर रोजी वैद्यकीय क्षेत्रातील नोबेल पुरस्कारांची घोषणा झाली होती. आता उद्या (4 ऑक्टोबर) केमिस्ट्री, म्हणजेच रसायनशास्त्र विषयातील नोबेल पुरस्काराची घोषणा होणार आहे.
या तीन वैज्ञानिकांनी मिळून अशा प्रकारची उपकरणं विकसित केली आहेत, ज्यामुळे आपल्याला इलेक्ट्रॉन्सचं जग हे अॅटोसेकंदांच्या वेगाने पाहता येईल. एक अॅटोसेकंद म्हणजे एका सेकंदाचा 1/1,000,000,000,000,000,000 एवढा भाग. जगाची उत्पत्ती कशी झाली, इलेक्ट्रॉन्सच्या जगात वेगाने काय बदल घडतात या गोष्टींची माहिती मिळवण्यासाठी या रिसर्चचा उपयोग होणार आहे.
अॅनी यांनी 1987 साली सुरू असलेल्या एका संशोधनात पाहिलं, की जेव्हा एखाद्या नोबेल वायूमधून इन्फ्रारेड लेझर लाईट पाठवली जाते, तेव्हा प्रकाशाचे कित्येक ओव्हरटोन दिसतात. या प्रत्येक ओव्हरटोनची एकसारखी नव्हे तर वेगवेगळी सायकल असते. याला कारण म्हणजे, जेव्हा या वायूचे अॅटम प्रकाशाला धडकतात, तेव्हा अॅटममधील इलेक्ट्रॉन्सना उर्जा मिळाते. यानंतर तो प्रकाशित होतो.
यानंतर 2001 साली पिएरे यांनी एक प्रयोग केला होता, ज्यामध्ये त्यांनी प्रकाशांचे कित्येक पल्सेस सातत्याने चालवले. प्रत्येक पल्स 250 अॅटोसेकंद एवढी होती. याच दरम्यान फेरेंक यांना प्रकाशाचा एक पल्स 650 अॅटोसेकंद एवढा ठेवण्यात आला आहे. अशा प्रकारचा प्रयोग यापूर्वी कधीही झाला नव्हता. यांच्या अभ्यासामुळेच इलेक्ट्रॉन्सचं जग समजून घेणं आता शक्य होणार आहे.