इंटरनेटचे मायाजाल : 70% युवकांकडून 8 तास वापर

इंटरनेटचे मायाजाल : 70% युवकांकडून 8 तास वापर

ठाणे : माहिती तंत्रज्ञानाच्या आजच्या युगात प्रत्येकाच्या दिवसाची सुरवात इलेक्‍ट्रॉनिक गॅझेट आणि इंटरनेटने होत असून दिवसभर याचा वापर करून जगभराची मुशाफिरी केली जाते. या सवईमुळे अनेक जण दिवसभरातील चार ते आठ तास इंटरनेटच्या सहवासात घालवत असल्याचे स्पष्ट झाले आहे.

यात तरुणांची संख्या सर्वाधिक असून सुमारे 70 टक्के तरुण चार ते आठ तासांपेक्षा जास्त काळ इंटरनेटवर असतात. त्याखालोखाल मध्यवयीन आणि ज्येष्ठांची संख्या 57 टक्के इतकी आहे; तर लहान शाळकरी मुलांचाही अधिक काळ इंटरनेट वापराचा टक्का मोठा असून 56 टक्के मुले दिवसभरात इंटरनेटवर बराच वेळ व्यतीत करतात. 'आहान फाऊंडेशन'च्या माध्यमातून राज्यातील सुमारे दोन हजार 500 जणांचे 'रिस्पॉन्सिबल नेटीझन चळवळी'तर्फे सर्वेक्षण झाले. त्यातून ही माहिती उघड झाली आहे.


सुरक्षित इंटरनेटच्या वापराविषयी जागृती करण्यासाठी सुरू झालेल्या 'रिस्पान्सिबल नेटीझन' उपक्रमाच्या 2016-17 या आर्थिक वर्षामधील उपक्रमाची सांगता नुकतीच झाली. या वेळी या संस्थेने केलेल्या कार्याची माहिती देण्यात आली. अॅन्ड्राईड फोनमुळे आता सगळ्यांनाच इंटरनेट सहज मिळाल्याने ते वापरणाऱ्या विद्यार्थी आणि तरुणांचा टक्का सुमारे 66 इतका मोठा आहे; तर वयस्कर मंडळींची संख्या 30 टक्के इतकी आहे. शहरातील मोफत वायफायच्या वापरातही शाळकरी विद्यार्थी पुढे असून सुमारे 90 टक्के शाळकरी मोफत वायफायवरून इंटरनेट वापरतात; तर 60 टक्के युवक आणि 23 टक्के मध्यमवयीन मोफत वायफायचा वापर करतात, हे सर्वेक्षणातून स्पष्ट झाले आहे.

असुरक्षित इंटरनेट वापर...
इंटरनेट वापरत असताना 55 टक्के विद्यार्थी, 58 टक्के युवक आणि 56 टक्के मध्यम व ज्येष्ठ नागरिक सुरक्षेची कोणतीच काळजी घेत नाहीत. यापैकी सुमारे 20 टक्के विद्यार्थी, 29 टक्के युवक आणि 23 टक्के इतर मध्यमवयीनांना इंटरनेटवरून धोका निर्माण झाल्याचे या सर्वेक्षणातून समोर आले आहे. तर यापैकी 50 टक्के लहान मुलांना, 52 टक्के युवकांना आणि 48 टक्के मध्यमवयीन व ज्येष्ठांना इंटरनेटच्या सुरक्षेबद्दल काहीच माहिती नसल्याचे दिसून आले. कॅशलेसच्या काळात इंटरनेट बॅंकिंगचा वापर करताना सरासरी 64 टक्के व्यक्ती असुरक्षितपणे बॅंकिंगचा वापर करत असल्याचे स्पष्ट झाल्याचे, या उपक्रमाचे सल्लागार उन्मेश जोशी यांनी सांगितले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com