भारतात आयफोनच्या निर्मितीला सुरवात

वृत्तसंस्था
बुधवार, 17 मे 2017

भारतीय बाजारपेठेत या मॉडेलची नेमकी किंमत काय असेल हे स्पष्ट झालेले नाही. सध्या काही भारतीय रिसेलर्सकडून या मॉडेलची 320 डॉलरला विक्री केली जाते. मात्र, कंपनीने या किंमतीपेक्षा किमान 100 डॉलरने स्वस्त असावी अशी इच्छा भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

नवी दिल्ली - अॅपलने भारतात आयफोनचे प्रायोगिक तत्त्वावर उत्पादन सुरु केले असून लवकरच कंपनी देशातील ग्राहकांसाठी ही उत्पादने सादर करणार आहे, असे वृत्त वॉल स्ट्रीट जर्नल या वर्तमानपत्रात प्रसिद्ध झाले आहे.  

या वृत्तानुसार, महिन्याच्या सुरुवातीला आयफोनचे सर्वात स्वस्त मॉडेल असणाऱ्या 'द एसई'ची चाचणी घेण्यात आली. तैवानच्या विस्ट्रन कॉर्पने आपल्या बंगळूर येथील जुळणी प्रकल्पात ही चाचणी घेतली आहे. विस्ट्रन कंपनी बंगळुरु येथील पीन्या या औद्योगिक क्षेत्रात स्थापन होणाऱ्या जुळणी प्रकल्पाचे व्यवस्थापन करणार आहे. या प्रकल्पातील उत्पादने आठवडाभरात भारतीय ग्राहकांसाठी उपलब्ध होतील, असे सूत्रांनी सांगितले. परंतू कंपनीने याविषयी कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला आहे.  

भारतीय बाजारपेठेत या मॉडेलची नेमकी किंमत काय असेल हे स्पष्ट झालेले नाही. सध्या काही भारतीय रिसेलर्सकडून या मॉडेलची 320 डॉलरला विक्री केली जाते. मात्र, कंपनीने या किंमतीपेक्षा किमान 100 डॉलरने स्वस्त असावी अशी इच्छा भारतीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे. 

चीनमधील व्यवसाय मंदावल्यानंतर अॅपल आता भारतात आपला विस्तार वाढवू पाहत आहे. कंपनीने भारतात प्रकल्प स्थापन करण्यासाठी सरकारकडे करसवलतींची मागणी केली आहे. अॅपलने उत्पादन आणि दुरुस्ती प्रकल्प, स्मार्टफोन्समधील सुट्या भागांवर 15 वर्षांच्या कालावधीसाठी विविध शुल्कातून सूट देण्याची मागणी केली होती. याअंतर्गत आयात व उत्पादन शुल्कात विशेष सवलत देण्याची मागणी करण्यात आली आहे.

Web Title: Apple Assembles First iPhone in India