esakal | ‘ॲप’निंग : देशी ॲप ‘इलेमेंट्‌स’
sakal

बोलून बातमी शोधा

Elyments

सोशल मीडियाच्या जगात असंख्य ॲप आहेत. त्यातील काही लोकप्रिय असून, ते मोबाईल वापरकर्त्यांची गरज बनले आहेत. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५९ चिनी ॲपवर बंदी घातली. त्यामुळे ‘वोकल टू लोकल’चा नारा देत अनेकांनी स्वदेशी ॲपचा शोध घ्यायला सुरुवात केली. अशा वेळी एक देशी ॲप सुरू करण्यात आले आहे.

‘ॲप’निंग : देशी ॲप ‘इलेमेंट्‌स’

sakal_logo
By
अशोक गव्हाणे

सोशल मीडियाच्या जगात असंख्य ॲप आहेत. त्यातील काही लोकप्रिय असून, ते मोबाईल वापरकर्त्यांची गरज बनले आहेत. भारत आणि चीन यांच्यातील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने ५९ चिनी ॲपवर बंदी घातली. त्यामुळे ‘वोकल टू लोकल’चा नारा देत अनेकांनी स्वदेशी ॲपचा शोध घ्यायला सुरुवात केली. अशा वेळी एक देशी ॲप सुरू करण्यात आले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिनी ॲपवर बंदी घातल्याच्या काही दिवसांनंतर, पाच जून रोजी हे देशातील पहिले अधिकृत सोशल मीडिया ॲप ‘इलेमेंट्‌स’ (Elyments) उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांच्या हस्ते सुरू करण्यात आले. देशातील एक हजारपेक्षा अधिक आयटी तज्ज्ञांनी हे स्वदेशी ॲप विकसित केले असून, ते सर्व श्री श्री रविशंकर यांच्या ‘आर्ट ऑफ लिव्हिंग’ संस्थेचे स्वयंसेवक आहेत, अशी माहिती त्यावेळी उपराष्ट्रपती नायडू यांनी दिली होती.

‘इलेमेंट्‌स’ या सोशल मीडिया ॲपमध्ये डेटा गोपनीयतेवर अधिक लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे. इलेमेंट्‌स ॲपमध्ये डेटा सुरक्षित राहणार असून कोणाच्याही परवानगीशिवाय तिसरी व्यक्ती डेटा घेऊ शकत नाही, असे सांगण्यात आले आहे. इलेमेंट्‌स ॲप हे ‘गुगल प्ले स्टोर’मधून डाऊनलोड करता येऊ शकते. हे ॲप आतापर्यंत अनेक लोकांनी डाउनलोड केले आहे.

सोशल मीडियाच्या जगात ‘फेसबुक’, ‘इंस्टाग्राम’ यांसारख्या ॲपना नवीन इलेमेंट्‌स ॲपमुळे आव्हान मिळणार असून, हे ॲप मराठी, इंग्रजी, हिंदी, गुजराती अशा जवळपास दहा भाषांमध्ये उपलब्ध आहे. यात ऑडियो-व्हिडिओ कॉन्फरन्स कॉलिंग, मेसेजिंग आणि ग्रुप चॅटिंग, सोशल कनेक्‍टिव्हिटी, न्यूज अपडेट्‌स, Elyments Pay या फीचरद्वारे सुरक्षित ई-पेमेंट पर्याय आणि भारतीय ब्रॅंड्‌ससाठी ई-कॉमर्स यांसारखे फीचर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. लाँचिंगआधी बरेच महिने या ॲपचा चाचणी सुरू होती. हे ॲप ‘ॲप स्टोअर’वरही उपलब्ध आहे. हे ॲप विकसीत करताना वापरणाऱ्यांच्या गोपनीयतेची विशेष काळजी घेण्यात आली असून, यात वापरकर्त्यांची माहिती सुरक्षित असल्याचा दावा ॲपच्या निर्मात्यांकडून करण्यात आला आहे. या ॲपला पासवर्ड देण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्याने हे ॲप अधिक सुरक्षित आहे.

उपलब्ध विविध पर्याय
१) इलेमेंट्‌स ॲपमध्ये हब नावाचा एक पर्याय असून, त्यामध्ये बातम्या, खेळ, क्रीडा, आरोग्य आणि जीवनशैली, बॉलिवूड, वस्त्रभूषण खरेदी, असे अनेक पर्याय आहेत.
२) याखेरीज सामाजिक असा पर्याय उपलब्ध असून, त्याचा वापर करून हे ॲप वापरणाऱ्या आपल्या मित्रांचा शोध घेता येतो. त्यातील (+) हे चिन्ह टॅप करून नवीन पोस्ट तयार करता येते. तसेच, ‘शोधा’ या पर्यायावर जाऊन लोकप्रिय लोकांचे अपडेट्‌स पाहता येतात.
३) चॅट नावाच्या पर्यायाद्वारे आपल्याला हव्या असलेल्या व्यक्तीशी संपर्क किंवा चॅट करता येते.
४) नोटिफिकेशन्स नावाच्या पर्यायाद्वारे संपर्कासाठीचे किंवा अन्य गोष्टींचे नोटिफिकेशन मिळते.
५) सेटिंग्ज या पर्यायाद्वारे अनेक गोष्टी ठरवता येतात. 

‘इलेमेंट्‌स’ वापराच्या पायऱ्या

  • ‘गुगल प्ले स्टोअर’मधून हे ॲप डाऊनलोड करावे.
  • दिलेल्या पर्यायी भाषांमधून आपल्याला हवी असलेली भाषा निवडावी.
  • आपला मोबाईल क्रमांक टाकावा.
  • आपल्या मोबाईल फोनवर चारअंकी ‘ओटीपी’ मिळतो. तो मागितलेल्या ठिकाणी टाईप करावा.
  • आपले नाव, आडनाव, पासवर्ड अशा महत्त्वाच्या गोष्टी भराव्यात.
  • आपली संपर्क यादी आपण ॲपमध्ये सिंक करू शकतो.

Edited By - Prashant Patil

loading image
go to top