‘टिकटॉक’ला भारतीय पर्याय ‘चिंगारी’

chingari app
chingari app

सोशल मीडियाच्या जगात सध्या अनेक ॲप्सचा बोलबाला आहे. यातील अनेक ॲप लोकप्रिय असून, हे ॲप मोबाईल वापरकर्त्यांची गरज बनले आहेत. गेल्या काही दिवसांपासून भारत आणि चीन लष्करादरम्यान तणाव आहे. या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कठोर भूमिका घेत ५९ चिनी ॲपवर बंदी घातली आहे. यामध्ये भारतात लोकप्रिय असलेल्या ‘टिकटॉक’चाही समावेश आहे. अशा वेळी ‘टिकटॉक’ला प्रतिस्पर्धी असलेले भारतीय ॲप म्हणून ‘चिंगारी’ या ॲपला मोठ्या प्रमाणावर पसंती मिळत आहे. चिनी ॲप्सना पर्याय म्हणून गेल्या दोन महिन्यांमध्ये भारतात बनविलेले अनेक ॲप लाँच झाले आहेत, पण काही दिवसांपूर्वीच लाँच झालेले चिंगारी ॲप अल्पावधीत अतिशय लोकप्रिय झाले आहे.

भारतीय यूजर्सच्या आवडीचा विचार 
केंद्र सरकारने ‘टिकटॉक’वर बंदी घातल्यानंतर चिंगारी ॲप डाउनलोड करणाऱ्यांमध्ये मोठी वाढ झाली आहे. ‘चिंगारीचे’ सह- संस्थापक आणि चीफ प्रॉडक्‍ट ऑफिसर सुमित घोष यांनी दर तासाला एक लाख चिंगारी ॲप डाउनलोड होत असल्याची माहिती दिली आहे. ‘टिकटॉक’ला भारतीय पर्याय असलेले हे ॲप छत्तीसगडचे आयटी प्रोफेशनल्स आणि ओडिशा व कर्नाटकाच्या डेव्हलपर्सनी बनवले आहे. हे ॲप बनवण्यासाठी सुमारे दोन वर्षांचा कालावधी लागला. खास भारतीय यूजर्सच्या गरजा आणि आवड लक्षात घेऊन हे ॲप डिझाइन करण्यात आल्याचे सांगण्यात येते. 

‘टिकटॉक’वर बंदी घातल्यानंतर आतापर्यंत जवळपास तीस लाख लोकांनी चिंगारी ॲप डॉऊनलोड केले असून, प्रत्येक तासाला या ॲप्सला वीस लाख व्ह्यूज मिळत आहेत. भारतीयांनी ‘टिकटॉक’कडे पाठ फिरवत चिंगारी ॲप मोठ्या प्रमाणात मोबाईलमध्ये इन्स्टॉल केले आहे. गेल्या वर्षी बंगळूरचे प्रोग्रॅमर बिस्वत्मा नायक आणि सिद्धार्थ गौतम यांनी हे ॲप तयार केले होते, जे आता ‘गुगल प्ले स्टोअर’मध्ये अव्वल स्थानी आहे. चिंगारी ॲप नोव्हेंबर २०१८पासून ‘गुगल प्ले स्टोअर’वर अधिकृतपणे उपलब्ध आहे.

चिंगारी ॲपच्या वैशिष्ट्यांची नोंद घेताना हे वापरकर्त्यांना व्हिडिओ डाऊनलोड आणि अपलोड करण्यास, मित्रांसह गप्पा मारण्यास, माहिती शेअर करण्यास आणि फीड्‌सद्वारे ब्राउझ करण्याची परवानगी देत असल्याने लोकांनी त्याला पसंती दर्शवली आहे. ‘चिंगारी’ वापरकर्त्यांना व्हॉट्‌सॲप स्थिती, व्हिडिओ, ऑडिओ क्‍लिप्स, जीआयएफ स्टीकर आणि फोटोंसह क्रिएटिव्ह करण्याची संधी मिळते. चिंगारी ॲपद्वारे तुम्ही शॉर्ट व्हिडिओ बनवू शकता आणि तुमच्या मित्रांबरोबर शेअरही करू शकता. याशिवाय ॲपमध्ये ट्रेंडिंग न्यूज, मनोरंजन न्यूज, फनी व्हिडिओ, लव्ह स्टेटस, व्हिडिओ साँग अशी अनेक फीचर्स आहेत. ‘चिंगारी’वर शेअर केलेल्या पोस्टवर लाइक, कॉमेंट, शेअर करता येते. ‘व्हॉट्‌सॲप’वर शेअर करण्यासाठी वेगळा पर्याय आहे. एखाद्या यूजरला फॉलो करण्याचाही पर्याय यामध्ये देण्यात आला आहे.

हे ॲप इंग्रजी, हिंदी, बंगाली, गुजराती, मराठी, कन्नड, पंजाबी, मल्याळम, तमीळ आणि तेलुगू या भाषांमध्ये उपलब्ध आहे. कंटेट क्रिएटरचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘चिंगारी’ त्यांना पैसेदेखील देणार आहे. चिंगारी ॲपवर अपलोड केलेल्या प्रत्येक व्हिडिओवर वापरकर्त्याला व्ह्यूजनुसार पॉईंट मिळतात, हे पॉईंट नंतर पैशांत रूपांतरित केले जातात. चिंगारी ॲप ‘ॲपल ॲप स्टोअर’वरही उपलब्ध आहे.

    दृष्टिक्षेपात...
  मराठी, इंग्रजीसह अनेक भाषांमध्ये उपलब्ध.
  दर तासाला एक लाख चिंगारी ॲप डाउनलोड.
  प्रत्येक तासाला वीस लाख व्ह्यूज. 
  शॉर्ट व्हिडिओ बनवून शेअर करण्याची सुविधा.
  ट्रेंडिंग न्यूज, मनोरंजन न्यूज, फनी व्हिडिओ आदी अनेक फीचर्स. 
  व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ‘चिंगारी’कडून पैसे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com