Car Tips : अचानक ब्रेक फेल झाल्यावर काय कराल? या टिप्स वाचवतील तुमचा जीव | Automobile tips How to stop your car in case of break fail | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Car Break Fail Tips

Car Tips : अचानक ब्रेक फेल झाल्यावर काय कराल? या टिप्स वाचवतील तुमचा जीव

सध्या ऑटोमोबाईल कंपन्या नवनवीन तंत्रज्ञान असलेल्या गाड्या लाँच करत आहेत. कारमध्ये असलेल्या लोकांना अधिकाधिक सुरक्षा प्रदान करणारे फीचर्स यात देण्याचा कंपन्यांचा प्रयत्न असतो. मात्र, तरीही आपण अपघाताच्या कित्येक घटनांबाबत रोज ऐकत असतो. बहुतेक वेळा कारचा ब्रेक फेल झाल्यामुळे अपघात होतात. त्यामुळे, अशा वेळी काय करता येईल याबाबत आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

पॅनिक होऊ नका

कार चालवत असताना ब्रेक फेल झाला, तर स्वाभाविकपणे तुम्हाला टेन्शन येईल. मात्र, अशा वेळी पॅनिक न होता मन शांत ठेवणं गरजेचं आहे. घाबरून एखादा चुकीचा निर्णय घेण्याऐवजी शांत राहून आता काय करता येईल याचा विचार (Car Tips) करा.

कारला साईड लेनमध्ये घ्या

अशा वेळी सगळ्यात आधी इंडिकेटर देऊन कार एका बाजूला घेण्याचा प्रयत्न करा. मागून एखादी गाडी येत आहे का हे पाहायला विसरू नका. हळू-हळू कार साईड लेनमध्ये घेतल्याने तुम्ही इतर गाड्यांना धडकण्याची शक्यता कमी होते. (How to stop your car in case of break fail)

डाऊनशिफ्ट टेक्निक

जर तुम्ही मॅन्युअल गिअरबॉक्स असलेली कार चालवत असाल, तर डाऊनशिफ्ट टेक्निकचा वापर करून गाडीचा वेग लवकर कमी करू शकता. यासाठी तुम्हाला गाडीचे गिअर एक-एक करून कमी करावे लागतात. म्हणजेच, तर तुम्ही पाचव्या गिअरमध्ये गाडी चालवत आहात, तर चौथा-तिसरा-दुसरा-पहिला असं टप्प्या-टप्प्याने गिअर कमी करावे लागतील. एकदम पहिल्या किंवा दुसऱ्या गिअरवर गेल्यास ही टेक्निक काम करणार नाही.

ब्रेक दाबत रहा

ब्रेक फेल झाला आहे हे लक्षात आल्यानंतर कित्येक लोक तिथून पाय काढून घेतात. हे न करता, वेगाने सारखं सारखं ब्रेक दाबत राहणं गरजेचं आहे. असं केल्याने हायड्रॉलिक प्रेशर तयार होऊन काही प्रमाणात ब्रेक काम करण्याची शक्यता निर्माण होते. अशात मग तुम्ही हळू-हळू गाडीचा वेग कमी करून ती थांबवू शकता.

हँडब्रेकचा वापर करा

बऱ्याच वेळा लोक ब्रेक फेल झाल्यानंतर पॅनिक होऊन लगेच हँडब्रेक ओढतात. मात्र, असं करणं खूप रिस्की असतं. त्यामुळे वर सांगितल्याप्रमाणे आधी गाडी बाजूला घेऊन, तिचा वेग कमी करून मगच हँडब्रेकचा वापर करावा.

टॅग्स :carcarsTips