गॅजेटचे चार्जिंग आता जिवाणूंच्या मदतीने!

वृत्तसंस्था
शुक्रवार, 23 डिसेंबर 2016

सूक्ष्म जिवाणू पेपर बॅटरी चालवू शकत असल्याने आम्ही खूप उत्साही झालो आहोत. जिवाणूंची त्यांची निर्मिती अगदी घाणेरड्या पाण्यामध्येही होत असल्याने ते सहज उपलब्ध होईल. अशा प्रकारच्या "पेपर बायोबॅटरी' भविष्यातील ऊर्जेचा महत्त्वाचा स्रोत असेल.
- शॉन चोई, बॅटरीचे संशोधक

नवी दिल्ली : इलेक्‍ट्रॉनिक वस्तू आणि गॅजेटचे चार्जिंग करण्यासाठी लागणाऱ्या बॅटरी आता चक्क जिवाणूंच्या मदतीने चालणार असून, पेपरच्या स्वरूपातील या बॅटरी तुम्हाला "रीम'च्या स्वरूपात विकत घेता येणार आहेत! बिंगहॅम्पटन विद्यापीठातील संशोधकांनीही जिवाणूंच्या मदतीने चालणाऱ्या बॅटरीची निर्मिती केली असून, त्यांच्या निर्मितीचा कालावधी आणि किंमत खूपच कमी असेल. त्याचबरोबर दुर्गम भागात व धोकादायक ठिकाणी त्यांचा उपयोग निर्धोकपणे करता येईल, असे संशोधकांनी म्हटले आहे.

"पेपरट्रॉनिक्‍स' या तंत्राने वैद्यकीय उपकरणे सहज आणि कमी खर्चात चालविणे शक्‍य झाले आहे. यातून दुर्गम भागांतील रुग्णांचे प्राण वाचविणे शक्‍य झाले आहे. या पद्धतीमध्ये क्रोमोग्राफी पेपरच्या एका भागावर मेणाचा थर देऊन त्याखाली सिल्व्हर नायट्रेटची पट्टी ठेवण्यात येते. यातून बॅटरीच्या कॅथोडची निर्मिती होते. पेपरच्या दुसऱ्या भागावर सुवाहक पॉलिमरचा थर देण्यात येतो व हा भाग ऍनोडचे कार्य करतो. या पेपरची घडी घालून त्यामध्ये जिवाणूंनी भरलेल्या द्रव्याचे काही थेंब टाकताच जिवाणूंमधील पेशींच्या श्‍वासोच्छ्वासामुळे बॅटरीला शक्ती मिळते,'' अशी माहिती संशोधक शॉन चोई यांनी दिली.

""या बॅटरीची निर्मिती हातानेच करावी लागते व त्यामध्ये हाताळणी नीट न होणे, पेपरचे थर नीट न बसणे, थरांमध्ये रिकामी जागा राहणे या त्रुटी राहू शकतात. त्यामुळे बॅटरीची शक्ती कमी होते. थर देण्याच्या विविध पद्धतींवर सध्या संशोधक काम करीत असून, त्यातून बॅटरीची क्षमता भविष्यात वाढू शकेल. संशोधकांनी 31 कागदांपासून 51 मायक्रोवॉट विजेची निर्मिती करण्यात यश मिळवले आहे. मात्र, या पद्धतीतून 40 वॉटचा बल्ब प्रकाशमान करण्यासाठी लाखो पेपर बॅटरींची गरज पडेल. तरीही आणीबाणीच्या परिस्थितीत त्यांचा चांगला उपयोग होईल. त्याचबरोबर मधुमेहाच्या रुग्णांच्या शरीरातील साखरेचे प्रमाण मोजणारे बायोसेन्सर चालविण्यासाठी किंवा इतर काही जीव वाचविणाऱ्या उपकरणांमध्ये त्यांचा उपयोग होईल,'' असे चोई यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: bacteria to charge gadgets

टॅग्स