
Price Hike On Cars : BS6 फेज-2 मुळे वाहनांच्या किंमतीत होणार वाढ, आता एवढे पैसे जास्त मोजावे लागतील
Price Hike On Cars : BS6 फेज 2 (नवीन RDE मानदंड) भारतात 1 एप्रिलपासून सुरू होणार आहे. माहितीनुसार, नवीन RDE नियम लागू केल्यामुळे, कार उत्पादक त्यांच्या वाहनांच्या किमती 2-4 टक्के वाढवण्याच्या तयारीत आहेत. म्हणजेच वेगवेगळ्या वाहनांच्या निर्मिती आणि मॉडेलनुसार ते 15,000-20,000 वाढीव किंमतीत नवीव कार बाजारात तुम्हाला बघायला मिळेल.
तर दुसरीकडे मारुती, महिंद्रा अँड महिंद्रा, होंडा, एमजी, किया या सर्व ऑटोमोबाईल कंपन्या लवकरच त्यांच्या वाहनांच्या वाढीव किमतीची घोषणा करू शकतात. त्याच वेळी, व्यावसायिक वाहन उत्पादकांनी त्यांच्या वाहनांवर 5% पर्यंत वाढ करण्याची घोषणा करण्यास सुरुवात केली आहे.
गाड्या होऊ लागल्या महागड्या
टाईम्स ऑफ इंडियाच्या बातमीनुसार, वाहन उत्पादक लवकरच त्यांच्या BS6 अपडेट केलेल्या वाहनांच्या वाढलेल्या किमती जाहीर करू शकतात. टाटा आणि किया सारख्या कंपन्यांनी त्याला सुरुवात देखील केली आहे. Kia ने RDE नॉर्म्स आणि E20 इंधनावर आधारित वाहनांवर 2.5 टक्के वाढीची घोषणा केली आहे, ज्यात Kia च्या तिन्ही (सेल्टोस, सोनेट आणि केरेन्स) वाहनांचा समावेश आहे.
इतर कंपन्याही वाढवणार किंमती
मिळालेल्या माहितीनुसार, महिंद्रा अँड महिंद्राने स्वतः आपल्या वाहनांच्या किंमती 20,000 पर्यंत वाढवण्याचे संकेत दिले आहेत. त्याचबरोबर मारुतीनेही आपली काही वाहने अपडेट केली आहेत. याशिवाय होंडाने नुकतीच आपली नवीन होंडा सिटी लाँच केली आहे, परंतु याशिवाय एप्रिलपासून इतर वाहनांच्या किमतीत वाढ होणार आहे.
टाटा कंपनी 5% किंमती वाढवणार
टाटा मोटर्सने त्यांच्या व्यावसायिक वाहनांच्या किमतीत 5% पर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे, तर टाटा ने फेब्रुवारीमध्येच नवीन RDE नियमांनुसार त्यांची प्रवासी वाहने अपडेट केली आहेत. वाहनांच्या अपडेशननंतर बदललेल्या भागांनुसार, कंपनीने आधीच 1.2 टक्के वाढ जाहीर केली आहे, ज्यात आणखी बदल केले जाऊ शकते.
अनेक लक्झरी वाहने आधीच BS6 इंजिनसह येतात, परंतु फॉरेक्स आणि इनपुट कॉस्टमुळे कंपन्या किमती किंचित वाढवू शकतात. यामुळे मर्सिडीज बेंझने आपल्या वाहनांच्या किमती 5% ने वाढवण्याची घोषणा केली आहे. तर लेक्सससारख्या कंपन्या परिस्थितीनुसार निर्णय घेण्याची वाट पाहत आहेत.