बदलत्या जीवनशैलीचा मेंदूवर परिणाम

गुरुवार, 8 डिसेंबर 2016

बदलत्या जीवनशैलीमुळे मेंदूवर गंभीर परिणाम होत असल्याची भीती मेंदूविकार तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. कोलकता येथे मेंदूविकार या विषयावर दोन दिवसांचे चर्चासत्र झाले. यामध्ये तज्ज्ञांनी मेंदूविकाराला बदलती जीवनशैली कारणीभूत असल्याचे स्पष्ट केले आहे. कोलकता मेडिकल रिसर्च इन्स्टिट्यूटमधील वरिष्ठ सल्लागार डॉ. जी. के. प्रुस्टी यांनी सांगितले, ""मानवाच्या दैनंदिन व्यवहारात कमालीचे बदल होत आहेत. या बदलांचा आरोग्याप्रमाणे मेंदूवरही परिणाम होत आहे. विशेषतः शहरी भागात हे प्रमाण अधिक आहे. कमी वयात अर्धांगवायूचा झटका येणे, मेंदूचे कार्य मंदावणे आदी लक्षणे दिसून येतात. कामाचा व्याप, अतिताणामुळे अनेक वेळा किरकोळ दुखण्यांकडे दुर्लक्ष होते, त्याचा परिणामही मेंदूवर होतो. कायमस्वरूपी ताण घेत काम केल्याने मेंदू शिणला जातो, विशिष्ट परिस्थितीनंतर मेंदूचे कार्य मंदावते. याबाबत नागरिकांमध्ये जागृती होण्याची आवश्‍यकता आहे. किरकोळ दुखण्यांकडे फार काळ दुर्लक्ष केल्यास कोणत्या प्रकारचे धोके निर्माण होऊ शकतात, याची माहिती तज्ज्ञांमार्फत नागरिकांपर्यंत पोचवली पाहिजे.''