चीनचे 'स्पेस स्टेशन' समुद्रात 

सम्राट कदम
सोमवार, 22 जुलै 2019

अवकाशात असलेले 'चीन'चे प्रायोगिक स्पेस स्टेशन (अंतरिक्ष स्थानक) 'तियानगोंग-2'ने नियंत्रित पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आहे. शुक्रवारी (ता. 18) वातावरणात प्रवेश केलेल्या यानाचा काही भाग 'दक्षिण प्रशांत महासागरा'त नियोजित पद्धतीने कोसळला आहे.

नवी दिल्ली : अवकाशात असलेले 'चीन'चे प्रायोगिक स्पेस स्टेशन (अंतरिक्ष स्थानक) 'तियानगोंग-2'ने नियंत्रित पद्धतीने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला आहे. शुक्रवारी (ता. 18) वातावरणात प्रवेश केलेल्या यानाचा काही भाग 'दक्षिण प्रशांत महासागरा'त नियोजित पद्धतीने कोसळला आहे. मागल्याच वर्षी एप्रिलमध्ये 'तियानगोंग-1' सुद्धा अशाच पद्धतीने दक्षिण प्रशांत महासागरात पाडण्यात आले होते. पण त्यावेळेस शास्त्रज्ञांचे स्थानकावरील नियंत्रण सुटले होते.

2022 पर्यंत अंतराळात स्थायी स्वरूपाचे स्थानक निर्माण करण्याचा चीनचा मानस आहे. त्यासाठीच या चाचण्या घेण्यात येत आहे. "तियानगोंग-2'चे डिसेंबर 2016 मध्ये प्रक्षेपण करण्यात आले होते. 8.6 टन वजनाचे असलेले हे स्थानक 10.4 मीटर लांब आहे. या स्थानकात अवकाशयानात इंधन भरण्याच्या प्रयोगाबरोबरच इतर अनेक प्रयोग करण्यात आले होते. त्याचा कार्यकाल संपला म्हणून त्याला नष्ट करण्यात आले. 

भारताचे 'अंतराळ स्थानक' 
नुकतीच इस्रोनेही अंतराळात स्वतःचे स्थानक निर्माण करण्याचे सूतोवाच केले आहे. भारताच्या 'गगनयान' या मानवमोहिमेनंतर याची सविस्तर घोषणा करण्यात येणार आहे. या अंतराळ स्थानकांमुळे अवकाशात गुरुत्वाकर्षणाशी निगडित छोटे-मोठे प्रयोग करण्यात येतात. तसेच परग्रहावर राहण्यासाठी आवश्‍यक असलेले प्रयोगही येथे करण्यात येतात. भारताचे अंतराळस्थानक पृथ्वीपासून 300 ते 400 किलोमीटर उंचीवर असेल. 

अंतराळातील कचरा 
पृथ्वीपासून सुमारे 300 ते 500 किलोमीटर अंतरावर मोठ्या प्रमाणावर उपग्रह फिरतात. नासाचे आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकही 408 किमी उंचावर आहे. नवीन उपग्रहांना लागणारी जागा उपलब्ध व्हावी तसेच अंतराळात कचरा होऊ नये म्हणून उपग्रह, अंतराळ स्थानके नष्ट करावी लागतात. त्यासाठी या उपग्रहांना त्यांचा कार्यकाल संपण्याच्या आधी पृथ्वीच्या वातावरणाच्या कक्षेत आणली जातात. वातावरणातील घर्षणामुळे उपग्रह पेटतात आणि त्यांचा उरलेले अवशेष महासागरात पाडण्यात येतात. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: China's 'Space Station' in the sea