तुमच्या जवळ कोरोना रुग्ण आहे? तुम्ही सुरक्षित आहात? सरकारचे ऍप सांगणार माहिती

टीम ई-सकाळ
सोमवार, 6 एप्रिल 2020

आपल्या सोसायटीमधील, परिसरातील, शहरातील किती लोक कोरोना संक्रमित व किती लोकांना होम क्वारांटाईन (घरी विलगीकरण) करून ठेवले आहे याची माहिती मिळणार आहे.

Coronavirus : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे केंद्र सरकारकडून लोकांवर लक्ष ठेवण्यासाठी आता नवनवीन प्रयोग केले जात आहे. अशातच कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून ‘आरोग्य सेतू ऍप’ विकसित केले गेले आहे. या ऍपद्वारे केंद्र सरकारला सर्व कोरोनाग्रस्त रुग्ण, संशयित व ज्यांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे अश्या सर्व लोकांवर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच सर्व सामान्य भारतीयांना सुद्धा आपल्या परिसरातील माहिती मिळणार असल्यामुळे त्यांना सुरक्षित राहण्यास याचा फायदा होणार आहे.

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कधी लाँच केले ऍप?
भारतात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या वाढत चालली आहे. कोरोनावर नियंत्रण ठेवता यावे यासाठी राज्य सरकार सोबतच केंद्र सरकारकडून अनेक पावले उचलली जात आहेत. नवनवीन तंत्रज्ञानाचा उपयोग करून सर्वांचे अथक प्रयत्न सुरू आहेत. याच प्रयत्नांचा भाग म्हणून आपल्या देशातील कोरोना बाधित, संशयित लोकांची पूर्ण माहिती केंद्र सरकारला मिळावी व लोकांना सुरक्षित राहण्यासाठी त्यांच्या परिसरातील माहिती मिळावी तसेच कोरोना विषयी अनेक महत्वाची माहिती मिळावी यासाठी गुरुवारी २ एप्रिलला केंद्र सरकारने ‘आरोग्य सेतू ऍप’ लाँच केले आहे.

आणखी वाचा - कोरोनाला हद्दपार करण्यासाठी हे ऐका!

कसे काम करेल ऍप?
आपल्या मोबाईलमध्ये आपल्याला हे ऍप डाऊनलोड करता येणार असून आपल्या मोबाईलच्या ब्ल्यूटूथ व जीपीएस तंत्रज्ञानाच्या आधारे हे ऍप काम करणार आहे. कोरोना रुग्ण, संशयित व ऍप डाऊनलोड करणाऱ्या प्रत्येक व्यक्तीच्या हालचालींवर हे ऍप लक्ष ठेवून त्याची माहिती केंद्र सरकारला देणार आहे. या माहितीच्या आधारे रुग्ण किंवा संशयित किती लोकांच्या संपर्कात आला व कोणत्या परिसरात प्रादुर्भाव वाढू शकतो व तिथे कोरोनाचे संक्रमण होण्याची किती संभावना आहे हि सर्व माहिती केंद्र सरकारला कळणार आहे. ऍपद्वारे हि माहिती क्लाउड मध्ये जमा करण्यात येणार असून भविष्याच्या दृष्टीने सुद्धा हि माहिती वापरता येणार आहे. या माहितीचा उपयोग इतर कोणत्याही गोष्टींसाठी केला जाणार नाही असे केंद्र सरकारकडून स्पष्ट करण्यात आले आहे. या ऍपद्वारे आपल्या दूरध्वनी क्रमांकावर शासनाला माहिती, सूचना सुद्धा पाठवता येणार आहे.

आणखी वाचा - तीन महिन्यांत काय घडलं? तेलाचे भाव निचांकी पातळीवर!

ऍपमध्ये काय?
केंद्र सरकारकडून ‘आरोग्य सेतू ऍप’ तयार करण्यात आले आहे. या ऍपमध्ये अनेक महत्वाची माहिती आहे. व याचा फायदा ऍपच्या वापरकर्त्याला होणार आहे. आपल्या आसपास कोणाला कोरोना सदृश्य लक्षणे दिसत असल्यास त्याची माहिती शासनापर्यंत पोचविण्यासाठी व आपल्याला कोरोनाविषयी कोणतीही माहिती हवी असल्यास राज्यनिहाय मदत करण्यासाठी दूरध्वनी क्रमांक या ऍपवर उपलब्ध आहे. त्यासोबतच या ऍपमध्ये कोरोनाविषयी आत्मपरीक्षण करण्यासाठी एक ‘सेल्फ एसेसमेंट टेस्ट’ सुद्धा तयार करण्यात आली आहे. या टेस्ट मध्ये वैयक्तिक माहिती सोबतच कोरोनाचा संसर्ग तपासण्यासाठी काही प्रश्न तयार करण्यात आली आहेत. या प्रश्नाची अचूक उत्तरे दिल्यास आपल्याला कोरोना होण्याचा कितपत धोका आहे व आपण किती सुरक्षित आहोत हे ऍपद्वारे सांगण्यात येते. यासोबतच वापरकर्त्याला आपल्या परिसरातील, शहरातील रुग्णांच्या आकड्याविषयी सुद्धा माहिती मिळणार आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे एक मोलाचे ऍप ठरणार असून याचा कोरोनावर मात करण्यासाठी नक्कीच खूप फायदा होऊ शकतो.

Fight with coronavirus 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: coronavirus india central government setu mobile app information marathi