टेक्नोहंटः कोरोना चाचणी मोबाईल अ‍ॅपवर

नेमकी कशी केली जाणार ही चाचणी, त्याबाबतच थोडक्यात...
Vocalis Check app
Vocalis Check appsocial media

ऋषिराज तायडे

सध्या महाराष्ट्रासह देशभरात कोरोनाची दुसरी लाट वेगाने पसरत आहे. रुग्णांचे निदान तातडीने होण्यासाठी प्रशासनाकडून अधिकाधिक चाचण्या करण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी आरटी-पीसीआर आणि अँटिजन चाचण्यांचा वापर केला जातो. आरटी-पीसीआर चाचण्यांना किमान 24 तासांचा आणि अॅंटिजन चाचण्यांना 20 मिनिटांचा अवधी लागतो. मात्र, आता कोरोना चाचणी चक्क घरबसल्या आणि मोबाईल अॅपवरच होणार आहे. नेमकी कशी केली जाणार ही चाचणी, त्याबाबतच थोडक्यात...

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील परिस्थिती आता गंभीर वळणावर येऊन ठेपली आहे. त्यामुळे राज्य सरकारकडूनही विविध उपाययोजना केल्या जात आहे. कोरोनाचा एखादा रुग्ण सापडल्यास त्याच्या संपर्कातील किमान 20 जणांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला जात आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग आणि अधिकाधिक चाचण्यांवर भर दिला जात आहे. परिणामी राज्यातील प्रयोगशाळांवर चाचण्यांचा भार वाढल्याने अनेक ठिकाणी अहवाल येण्यास विलंब होत आहे, त्यामुळे संसर्ग तर वाढतोच शिवाय उपचारासही उशीर होताना दिसत आहे. यासारख्या अडचणी लक्षात घेता आता कोरोना चाचणी घरबसल्या आणि तेही आपल्या मोबाईलमधील एका अॅपवर करता येणार आहे. वाचून तुम्हाला आश्चर्य वाटले असेल, पण हे खरे आहे. ‘व्होकॅलिस हेल्थ’ नावाच्या एका इस्रायली कंपनीने ‘व्होकॅलिस चेक’ नावाचे एक अॅप विकसित केले आहे. त्यात केवळ तुमच्या आवाजावरून कळणार की तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह. विशेष म्हणजे, हे अॅप अॅण्ड्रॉईड आणि आयफोन अशा दोन्ही प्रकारच्या मोबाईलवर चालू शकेल. सध्या या अॅपची चाचणी सुरू असून प्रशासनासह आरोग्य यंत्रणेच्या मान्यतेनंतरच हे अॅप वापरण्यासाठी खुले केले जाणार आहे.

कशी केली जाणार चाचणी?

- ‘व्होकॅलिस अॅप’ सुरू करून त्यावर 50 ते 70 हे आकडे मोठ्या आवाजात म्हणायचे आहे.

- आपल्या आवाज अॅपमध्ये रेकॉर्ड झाल्यावर तो स्पेक्ट्रोग्राममध्ये रूपांतरित होतो.

- अॅपच्या सर्व्हरमध्ये पूर्वी रेकॉर्ड केलेल्या आवाजाच्या स्पेक्ट्रोग्रामशी त्याची तुलना केली जाते.

- त्यानुसार तुम्ही कोरोना पॉझिटिव्ह आहात की निगेटिव्ह हे सांगितले जाते.

- या संपूर्ण प्रक्रियेसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्यात आला आहे.

मुंबईतही क्लिनिकल स्टडी

सध्या ‘व्होकॅलिस चेक’ या अॅपची भारतातही चाचणी सुरू आहे. त्याशिवाय काही महिन्यांपूर्वी ‘व्होकॅलिस हेल्थ’ कंपनीने मुंबई महापालिकेच्या मदतीने नेस्को कोव्हिड केअर सेंटर येथे याप्रकारच्या चाचण्यांची क्लिनिकल स्टडी केली होती. त्यात सहभागी झालेल्या दोन हजार व्यक्तींचे मराठी, हिंदी, इंग्रजी आणि गुजराती भाषेत त्यांच्या आवाजाचे नमुने रेकॉर्ड करण्यात आले. त्यावेळी केलेल्या चाचण्यांच्या अचूकतेचे प्रमाण 81.2 टक्के असल्याचे सांगण्यात आले.

काय आहेत मर्यादा?

‘व्होकॅलिस चेक’ अॅपद्वारे चाचणी करताना 50 ते 70 हे आकडे मोठ्याने आवाजात म्हटल्यानंतर संबंधित व्यक्तीच्या आवाजाचा नमुना क्लाऊड बेस्ड अॅनालिटिक्ससाठी सर्व्हरवर अपलोड केला जातो. त्याचा निष्कर्ष काही मिनिटांमध्ये प्राप्त होतो. कंपनीच्या डेटाबेसमध्ये 10 लाखांहून अधिक आवाजाचे नमुने साठवले आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवरील अल्गोरिदमचा वापर करून आवाजाच्या नमुन्यातून 512 प्रकारची वैशिष्ट्ये निश्चित केली आहे, ती डेटाबेसमधील माहितीशी पडताळली जाते. त्या माहितीशी तुलना करून हा अॅप निष्कर्ष काढत असल्याचे ‘व्होकॅलिस हेल्थ’ कंपनीने सांगितले. केवळ आवाज हेच कोरोनाचे लक्षण नसल्याने कोरोनाच्या अचूक निदानासाठी अॅपमधील अल्गोरिदमकडून रुग्णाला श्वास लागणे, खोकला आणि ताप आदी किमान लक्षणे ओळखली जाणे गरजेचे असल्याने हे अॅप लगेचच वापरता येणार नाही.

संपादन- स्वाती वेमूल

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com