सावधान...यंदाचे वर्षे हॅकिंगचे...

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

यंदाचं वर्ष हॅकर्सनी भलतेच गाजवले. अत्यंत गंभीर स्वरूपाचे शेकडो सायबर हल्ले जगभरात झाले. काही कुख्यात हल्ल्यांच्या कथा टेक्नॉलॉजीला वाहिलेल्या 'Cnet' वेबसाईटने प्रसिद्ध केल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष जगणे आणि हॉरर चित्रपट यांच्यातील फरकच यंदाच्या सायबर हल्ल्यांनी मिटवत आणला. 

अनोळखी व्यक्ती खासगी इ मेल्स वाचत आहेत...कामाच्या महत्वाच्या फाईल्स खंडणीसाठी हॅकर्सनी व्हर्च्युअली पळवून नेल्या आहेत...एका पाठोपाठ एक लाईट स्विच ऑफ व्हावा, तसे इंटरनेट बंद होत आहे...सायबर हल्ल्यांच्या अशा घटना जगभरात अनेक ठिकाणी घडल्या. यंदाचं वर्ष हॅकर्सनी भलतेच गाजवले. अत्यंत गंभीर स्वरूपाचे शेकडो सायबर हल्ले जगभरात झाले. काही कुख्यात हल्ल्यांच्या कथा टेक्नॉलॉजीला वाहिलेल्या 'Cnet' वेबसाईटने प्रसिद्ध केल्या. त्यांच्या म्हणण्यानुसार, प्रत्यक्ष जगणे आणि हॉरर चित्रपट यांच्यातील फरकच यंदाच्या सायबर हल्ल्यांनी मिटवत आणला. 

खंडणी बहाद्दर हॅकर्स
रॅन्समवेअर काही काळ सायबर विश्वात वावरत आहेत; मात्र या वर्षी लॉस एंजेलिसमधील हॉस्पिटलच्या कॉम्प्युटर सिस्टिमला हॅकर्सनी सर्वात मोठा दणका दिला. हॅकर्सनी सर्व फाईल्स ताब्यात घेतल्या आणि परत देण्यासाठी हॉस्पिटल प्रशासनाकडे 34 लाख डॉलर्सची खंडणी मागितली. हॉलीवूड प्रेस्बेटेरियन मेडिकल सेंटरचा डेटा तीन आठवडे हॅकर्सनी ताब्यात ठेवला. सतरा हजार डॉलर्सची खंडणी दिल्यावरच हॅकर्सनी डेटा परत दिला. अशा तब्बल 14 हॉस्पिटल्सवर वर्षभरात सायबर हल्ले झाले. 
'टेकन' या हॉलीवूड थ्रिलरसारख्या या घटना आहेत. सायबर हल्ला परतवण्याची क्षमता नसेल, तर खंडणी देण्याशिवाय संबंधितांकडे काही पर्याय उरले नाहीत, असे या घटनांमधून समोर आले. केवळ हॉस्पिटलच नव्हे, तर चर्च, शाळा आणि पॉर्न साईटस् पाहणाऱया व्यक्तींच्या वैयक्तिक डेटाचीही चोरी हॅकर्सनी केली, असे इन्स्टिट्यूट ऑफ क्रिटिकल इन्फ्रास्ट्रक्चर टेक्नॉलॉजी संस्थेचे म्हणणे आहे. पॉर्न साईटस् या मुळात हॅकर्सचे आवडते लक्ष्य असते. या साईटवरून वैयक्तिक कॉप्युटरमध्ये हॅकर्स सहज उतरू शकतात. 

रॅन्समवेअरला रोखण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे वेळोवेळी बॅकअप घेऊन ठेवणे. विशेषतः जी हार्ड डिस्क अथवा कॉम्प्युटर शक्यतो ऑनलाईन नसतो, अशा डिव्हाईसवर बॅकअप घेऊन ठेवणे हा सुरक्षित पर्याय आहे. 

सेक्स टॉय झाले हॅक
या वर्षी हॅक झालेले सर्वात लक्षणीय उत्पादन म्हणजे We-Vibe4 Plus व्हायब्रेटर नावाचे सेक्स टॉय. स्टॅन्डर्ड इनोव्हेशन कंपनीचे हे उत्पादन ब्ल्यू टूथद्वारे स्मार्ट फोनशी जोडले जाते आणि फोनवरून व्हायब्रेशन्स कुठूनही नियंत्रित करता येतात. दोन हॅकर्सनी या व्हायब्रेटरवर नियंत्रण मिळवून कंपनीला रडकुंडीला आणले. कंपनी वापरकर्त्यांच्या नकळत अनेक प्रकारचा वैयक्तिक डेटा गोळा करत होती. ती गोष्ट हॅकर्सनी उघडकीला आणून कंपनीची चांगलीच नाचक्की केली. त्यानंतर कंपनीने वापरकर्त्यांचा डेटा मिळविणे सोडून दिले.

राजकीय हॅकिंग
अमेरिकेच्या राजकारणावर यावर्षी हॅकिंगचा मोठा प्रभाव आहे. डेमॉक्रॅटिक नॅशनल कमिटी आणि डेमॉक्रॅटिक क्राँग्रेशनल कँपेन कमिटीचे इ मेल्स हॅकर्सनी जगजाहीर केल्याने मोठी खळबळ उडाली. संबंधित संस्थांनी आणि अमेरिकेच्या गुप्तचर विभागाने हॅकिंगचे खापर रशियावर फोडले आणि अमेरिकेच्या अध्यक्षपदाची निवडणूक गोत्यात आणण्यासाठी रशियाने हा उद्योग केल्याचा आरोप केला. 

हॅकिंगचे प्रकरण केवळ इ मेल्सपुरते मर्यादित राहण्याची शक्यता नाही. सर्वात मोठा धोका आहे, तो हॅकर्स मतदानात फेरफार घडवू शकतील याचा. हॅकर्स बनावट मतदान घडवून आणतील, अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. हा धोका टाळण्यासाठी अमेरिकी गुप्तचर यंत्रणांची सारी बुद्धीमत्ता या निवडणुकीत पणाला लागली आहे. 

याहू हॅकिंग
तब्बल पन्नास कोटी युजर्सचा डेटा हॅक झाल्याची गंभीर घोषणा याहू कंपनीने सप्टेंबरमध्ये केली. नेमक्या याच काळात याहू कंपनी 4.8 अब्ज डॉलर्सना विकत घेण्याची तयारी व्हेरिझोन कंपनीने दर्शविली होती. आतापर्यंत झालेल्या डेटा चोरीपेक्षा हा प्रकार सर्वात मोठा आहे. न्यू यॉर्क टाईम्सने यासंदर्भात केलेल्या वार्तांकनात याहूने युजर्सच्या डेटा सुरक्षित ठेवण्यासाठी पुरेशी तरतूद केली नसल्याचे उघड झाले आहे.

Web Title: Cyber Crime and hacking.. the biggest threats this year