Elon Musk : Elon Musk ने मध्यरात्री 2 वाजता कर्मचाऱ्यांना उठवून लावलं हे काम, नेटकरी भडकले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Elon Musk

Elon Musk : Elon Musk ने मध्यरात्री 2 वाजता कर्मचाऱ्यांना उठवून लावलं हे काम, नेटकरी भडकले

Elon Musk : ‘स्पेसएक्स’ आणि ‘टेस्ला’ कंपनीचे प्रमुख असलेल्या आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या एलॉन मस्क यांनी तब्बल ४४ अब्ज डॉलर्स देऊन ट्विटर या मायक्रोब्लॉगिंग कंपनी विकत घेेतली आहे. यानंतर कंपनीचे संचालक मंडळ बरखास्त केले, याशिवाय व्हेरिफिकेशन ब्ल्यू टिकबाबत बदल, हजारो कर्मचाऱ्यांना बडतर्फ करण्यापासून ते अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या ट्विटर वापसीपर्यंत अनेक निर्णय हे वादग्रस्त ठरले.

सध्या दिवसेंदिवस त्यांच्या लोकप्रियतेत घट होत असल्यानं खूप त्रस्त आहे. रिपोर्टनुसार, एलॉन मस्कनं आपल्या ट्विट्सचा रिच वाढवण्यासाठी कंपनीच्या कर्मचाऱ्यांना तातडीनं एक सिस्टम तयार करण्यास सांगितलं आहे. मस्कचा चुलत भाऊ जेम्स मस्कनं कथित पद्धतीनं ट्विटरवर एन्गेजमेंटच्या समस्येबाबत डेव्हलपर्सना सतर्क करण्यासाठी मध्यरात्री दोन वाजता मेसेज पाठवला होता. दरम्यान, मस्कनं हे आरोप फेटाळून लावले आहेत.

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन आणि इलॉन मस्क यांनी सुपर बाउल फुटबॉल सामन्याबाबत ट्विट केले होते. बायडन यांच्या ट्विटला मस्कच्या ट्विटपेक्षा जास्त लाईक्स मिळाले. द प्लॅटफॉर्मर वृत्तपत्राचा हवाला देत 'द चेनलॉ' रिपोर्टने दावा केला आहे की ज्यो बायडन यांच्या ट्विटपेक्षा मस्क यांच्या ट्विटला कमी पसंती मिळाल्याने मस्क खूप नाराज होते.

नोकरी गमावण्याची धमकी

ज्यो बायडन आणि एलॉन मस्क यांनी सुपर बाउल फुटबॉल सामन्यादरम्यान फिलाडेल्फिया ईगल्सच्या समर्थनार्थ ट्विट केलं. बायडन यांच्या ट्विटला २९ कोटी इंप्रेशन मिळाले, तर मस्कच्या ट्विटला (जे आता हटवले गेले आहे) फक्त ९१ लाख इंप्रेशन मिळाले होते. यानंतर मस्कने आपल्या इंजिनिअर्सना अल्टिमेटम दिला की, त्यांच्या ट्विटला अधिक इंप्रेशन मिळावेत, अन्यथा त्यांना काढून टाकण्यात येईल.

आरोप फेटाळले..

ट्विटरच्या सीईओ मस्कनं या आरोपांचं खंडन केलं आहे. प्लॅटफॉर्मर लेखाची माहिती देणारा हा असंतुष्ट कर्मचारी असून कंपनी माजी कर्मचाऱ्यावर कायदेशीर कारवाई करेल, असेही त्यांनी सांगितले.