
Elon Musk : Elon Musk करतोय मार्क झुकरबर्गची चेष्टा, Twitter सारखे अॅप आणल्यावर म्हणाला, 'कॉपी कॅट '
Elon Musk : ट्विटरचे सीईओ एलोन मस्क यांनी नुकतीच मार्क झुकरबर्गची खिल्ली उडवली आहे. त्याने झुकेरबर्गला कॉपी कॅट म्हणत ट्रोल केलंय. हे प्रकरण Meta च्या आगामी सोशल मीडिया अॅपशी संबंधित आहे. हे ॲप लॉन्च झाल्यानंतर ट्विटरशी स्पर्धा करेल असं दिसतंय.
एलोन मस्कच्या या चेष्टेवरून असं दिसतंय की त्याला स्पर्धा न करता झुकेरबर्गला चिडवायचं आहे. काही काळापूर्वी त्याने डेव्हलपर्ससाठी Twitter चा फ्री API ॲक्सिस बंद केला होता. त्यासाठी आता कंपनीकडून पैसे आकारले जातात. इतकंच नाही तर ट्विटरची मालकी मिळाल्यानंतर एलॉन मस्कने त्याचा भारतीय स्पर्धक कू चं अकाऊंट देखील सस्पेंड केलं होतं. एवढंच नाही तर मास्टोडॉनचे अकाउंटही ट्विटरवरून सस्पेंड करण्यात आलं होतं. यानंतर, ट्विटरचे सीईओ आता मेटाच्या मागे लागलेत.
एलॉन मस्कच्या कॉपी कॅटच्या पोस्टला अनेक युजर्सने सडेतोड उत्तर दिलंय. एका यूजरने गंमतीत लिहिलय की, "फेसबुकने रॉकेट आणि इलेक्ट्रिक कार बनवायलाही सुरुवात करावी." एका रिपोर्टनुसार, मेटा टेक्स्ट-बेस्ड कंटेंट शेअर करण्यासाठी एक नवीन अॅप आणण्याची तयारी करत आहे. हे अॅप ट्विटरशी स्पर्धा करेल. हे अॅप ActivityPub च्या धर्तीवर विकसित केले जाईल.
मेटाच्या नवीन अॅपला P92 असं कोडनेम देण्यात आलंय. त्याचं Instagram अंतर्गत ब्रॅण्डिंग केलं जाईल. युजर्स इन्स्टाचे युजरनेम आणि पासवर्ड वापरून या अॅपमध्ये लॉग इन करू शकतील. मेटाच्या प्रवक्त्यानुसार, कंपनी कंटेंट अपडेट्स शेअर करण्यासाठी नवीन सोशल नेटवर्कवर काम करत आहे.
Meta चे P92 अॅप अद्याप सुरुवातीच्या टप्प्यात आहे. त्याची रिलीज डेट निश्चित केलेली नाही. अलीकडेच ट्विटरचे सह-संस्थापक आणि माजी सीईओ जॅक डोर्सी यांनी ट्विटरचे पर्यायी अॅप लॉन्च करून पुनरागमन केले आहे. ब्लूस्की असं या प्लॅटफॉर्मचं नाव आहे.