आता अवकाशात करता येणार रक्षा विसर्जन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 19 मे 2017

आपल्या प्रिय व्यक्तीची रक्षा अवकाशात विसर्जित करण्याची इच्छा बाळगून असलेल्या कुटुंबीयांना ही सेवा उपलब्ध करून देणे, ही आमच्यासाठी सन्मानजनक बाब आहे.
- थॉमस सिव्हीट, इलिझिअम कंपनीचे सीईओ

कॅलिफॉर्निया - सॅन फ्रान्सिस्कोस्थित इलिझिअम स्पेस या कंपनीच्या एका योजनेनुसार, आता आपल्या प्रिय व्यक्तीची रक्षा अवकाशात विसर्जित करणे शक्‍य होणार आहे.

नासाचे माजी अधिकारी व अन्य तज्ज्ञ व्यक्तींनी एकत्र येत सुरू केलेल्या कंपनीच्या स्टार्टअपअंतर्गत कोणत्याही व्यक्तीला याचा लाभ घेता येईल, त्यासाठी 2490 डॉलर आकारले जाणार आहेत. हा व्यवसाय मृत्यू आणि खगोलशास्त्राची परिभाषा बदलणारा ठरेल, असे कंपनीने म्हटले आहे. बुकिंगनंतर प्रत्येक ग्राहकाला एक किट मिळणार असून, त्यात एक कॅप्सूल असेल. या कॅप्सूलमध्ये मृत व्यक्तीची रक्षा भरून ती परत कंपनीला पाठवावी लागणार आहे. नंतर ही रक्षा स्पेसक्राफ्टद्वारे अवकाशात नेऊन तिचे विसर्जन केले जाईल, अशी माहिती संबंधितांनी दिली.

रक्षा घेऊन गेलेले "इलॉन मस्क'चे स्पेस एक्‍स फाल्कन- 9 हे रॉकेट अवकाशात भ्रमण केल्यानंतर दोन वर्षांनंतर पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश करेल. त्यानंतर प्रदूषण टाळण्यासाठी ते नष्ट करण्यात येईल. रॉकेटच्या प्रक्षेपणाची तारीख अद्याप निश्‍चित करण्यात आली नसून, त्याचे प्रक्षेपण वॅन्डनबर्ग येथील वायुदलाच्या तळावरून होणार असल्याचे सांगण्यात आले.

आपल्या प्रिय व्यक्तीची रक्षा अवकाशात विसर्जित करण्याची इच्छा बाळगून असलेल्या कुटुंबीयांना ही सेवा उपलब्ध करून देणे, ही आमच्यासाठी सन्मानजनक बाब आहे.
- थॉमस सिव्हीट, इलिझिअम कंपनीचे सीईओ

अवकाशभ्रमणाबरोबर विश्वप्रदक्षिणा
रक्षा घेऊन निघालेले रॉकेट जगातील प्रमुख ठिकाणांवरून मार्गक्रमण करेल, याची खबरदारी कंपनी घेणार आहे. यासाठी उपलब्ध करून दिलेल्या एका ऍपद्वारे संबंधित कुटुंबीयांना या रॉकेटचे नेमके स्थान ट्रॅक करता येणार असल्याची माहिती कंपनीने दिली.

शंभर कुटुंबांनी केले बुकिंग
कंपनीच्या नियोजित "स्टार-2' मोहिमेअंतर्गत मृत व्यक्तींची रक्षा अवकाशात विसर्जित करण्यासाठी शंभर कुटुंबीयांनी त्यांच्या नावाची नोंदणी केल्याची माहिती कंपनीने दिली. यात लष्करातील निवृत्त अधिकारी, तसेच अवकाशविषयक कुतूहल असलेल्या कुटुंबांचा समावेश आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Elysium Space offers memorial services