फेसबुक व्हिडिओंमध्ये जाहिराती! 

महेश बर्दापूरकर 
शुक्रवार, 27 जानेवारी 2017

जाहिरातींच्या विश्‍वाकडे कला म्हणून पाहिले जात असले, तरी तिचा "खडा' तुम्हाला अनेकदा लागत असणार. दूरचित्रवाहिनीवरील आवडती मालिका पाहताना ऐन मोक्‍याच्या क्षणी येणाऱ्या जाहिराती तुमचा रसभंग करीत असतील. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रसारानंतर हीच जाहिरात तुमच्या सर्चच्या दरम्यान, आवडता व्हिडिओ पाहताना येऊ लागली. यूृ-ट्यूबवरील आवडते व्हिडिओ पाहताना येणाऱ्या जाहिरातींमुळेही रसभंग होऊ लागला आहे. अर्थात, अनेकांसाठी यू-ट्यूबवरील जाहिराती हे उत्पन्नाचे मोठे साधन ठरले आहे.

जाहिरातींच्या विश्‍वाकडे कला म्हणून पाहिले जात असले, तरी तिचा "खडा' तुम्हाला अनेकदा लागत असणार. दूरचित्रवाहिनीवरील आवडती मालिका पाहताना ऐन मोक्‍याच्या क्षणी येणाऱ्या जाहिराती तुमचा रसभंग करीत असतील. सोशल मीडियाच्या वाढत्या प्रसारानंतर हीच जाहिरात तुमच्या सर्चच्या दरम्यान, आवडता व्हिडिओ पाहताना येऊ लागली. यूृ-ट्यूबवरील आवडते व्हिडिओ पाहताना येणाऱ्या जाहिरातींमुळेही रसभंग होऊ लागला आहे. अर्थात, अनेकांसाठी यू-ट्यूबवरील जाहिराती हे उत्पन्नाचे मोठे साधन ठरले आहे. सोशल मीडिया विश्‍वामध्ये गेली अनेक वर्षे पाय रोवून असलेल्या फेसबुकनेही व्हिडिओंच्या दरम्यान जाहिराती दाखविण्यासंदर्भात हालचाली सुरू केल्या असून, येथून पुढे फेसबुकवर व्हिडिओ पाहताना तुम्हाला जाहिरातींचा मारा सहन करावा लागणार आहे. अर्थात, "व्हायरल' झालेल्या व्हिडिओंच्या मूळ मालकांना कमाईची संधीही उपलब्ध होणार आहे. 
कंपनीने सुरू केलेल्या "फेसबुक लाइव्ह' या सेवेला मोठा प्रतिसाद मिळत असून, या लाइव्ह व्हिडिओदरम्यान जाहिराती दाखविण्याची चाचणी सध्या सुरू आहे. ही चाचणी यशस्वी झाल्यानंतर नेहमीच्या पोस्ट होणाऱ्या व्हिडिओमध्येही जाहिराती दाखवण्याचे नियोजन करण्यात आले आहे. फेसबुकच्या व्हिडिओमधील जाहिराती 90 सेकंदांपेक्षा अधिक कालावधीच्या व्हिडिओ क्‍लीपसाठीच असतील व ही जाहिरात पहिले वीस सेकंद पूर्ण झाल्यानंतरच दाखविली जाईल, असे स्पष्ट करण्यात आले आहे. यू-ट्यूबप्रमाणेच व्हिडिओच्या निर्माणकर्त्याला जाहिरातीतील उत्पन्नातील 55 टक्के हिस्सा दिला जाणार आहे. व्हिडिओमधील जाहिरातींचा कालावधी 15 सेकंदांपेक्षा अधिक असणार नाही, असेही सांगितले जात आहे. या शक्‍यतेनंतर अनेक व्हिडिओ पब्लिशर्सनी फेसबुकसाठी व्हिडिओची निर्मिती सुरू केली असली, तरी फेसबुकच्या बिझनेस मॉडेलबद्दलची पूर्ण माहिती नसल्याने त्याचे प्रमाण कमीच आहे. फेसुबकने यू-ट्यूबप्रमाणे "प्री-रोल' जाहिराती देणार नसल्याचे सूतोवाच केल्याने व्हिडिओ पब्लिशर्स संभ्रमात आहेत. फेसबुकने या आधी सुरू केलेल्या "सजेस्टेड व्हिडिओ' या जाहिरातींसह असलेल्या व्हिडिओ सेवेला थंडा प्रतिसाद मिळाला होता. लाइव्ह नसलेल्या व्हिडिओच्या दरम्यान जाहिराती टाकण्यास कंपनीचा तत्त्वतः विरोध असल्याचे बोलले जात होते. मात्र अशा प्रकारच्या जाहिरातींमधून उत्पन्न मिळत असल्यास तसे करून पाहण्याची तयारी कंपनीने या वर्षीच्या सुरवातीलाच केली आहे. कोणत्या प्रकारच्या व्हिडिओंमध्ये जाहिराती द्यायच्या या संदर्भातही कंपनीने विचार केला असून, खेळ, विनोद या प्रकारच्या व्हिडिओंना सर्वाधिक प्राधान्य देण्यात येणार आहे. सामाजिक प्रश्‍नांशी संबंधित व अपघात किंवा दुर्घटनेसारख्या प्रसंगांच्या व्हिडिओमध्ये जाहिराती न देण्याचेही कंपनीने निश्‍चित केले आहे. 

फेसबुकच्या व्हिडिओंवर जाहिराती प्रसिद्ध होण्यास सुरवात झाल्यानंतर ही सेवा अधिक फुलणार की युजर्सचा नकारात्मक प्रतिसाद मिळणार, हे काळच ठरवणार आहे. मात्र, यू-ट्यूबप्रमाणे फेसबुकही उत्पन्नाचे साधन ठरल्यास युजर्स खूष होणार, हेही नक्की! 

 

Web Title: Facebook Adverties video