फेसबुक मेसेंजर ऍपच्या होम स्क्रिनवर जाहिराती

टीम ई सकाळ
गुरुवार, 13 जुलै 2017

युजर्सच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनाला जगभरातील त्याच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचविण्याकरिता लोकप्रिय ठरलेल्या फेसबुकने आपल्या मेसेंजर ऍपवर जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील फेसबुक मेसेंजर ऍपच्या होम स्क्रिनवर जाहिराती दिसू लागल्या आहेत.

मेन्लो पार्क (कॅलिफोर्निया) - युजर्सच्या खाजगी आणि सार्वजनिक जीवनाला जगभरातील त्याच्या मित्र-मैत्रिणींपर्यंत पोहोचविण्याकरिता लोकप्रिय ठरलेल्या फेसबुकने आपल्या मेसेंजर ऍपवर जाहिराती देण्यास सुरुवात केली आहे. जगभरातील फेसबुक मेसेंजर ऍपच्या होम स्क्रिनवर जाहिराती दिसू लागल्या आहेत.

फेसबुकने मंगळवारी याबाबत माहिती दिली आहे. जगभरातील 1.2 अब्ज युजर्स मेसेंजर ऍप वापरत असल्याचा दावा फेसबुकने केला आहे. या लोकप्रियतेचा व्यावसायिक लाभ घेण्याच्या दृष्टिकोनातून फेसबुकने मेसेंजर ऍपवर जाहिराती प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. मेसेंजर ऍपच्या होम स्क्रिनवर दिसणाऱ्या जाहिरातीवर जर युजरने क्‍लिक केले तर युजर संबंधित जाहिरातदाराच्या संकेतस्थळावर जाईल किंवा संबंधित कंपनीशी मेसेंजरद्वारे थेट संवाद साधू शकेल. यापूर्वी एखादी कंपनी त्यांच्या युजर्सना मेसेंजरद्वारे थेट संवाद साधू शकत होती.

फेसबुकने मेसेंजरवर जाहिरात देण्याबाबतची चाचणी जानेवारी महिन्यात थायलंड आणि ऑस्ट्रेलियात केली होती. ती यशस्वीरित्या पूर्ण झाल्याने मेसेंजरवर जाहिराती दाखविण्यास फेसबुकने सुरुवात केली आहे. फेसबुकच्या एकूण उत्पन्नापैकी 85 टक्के उत्पन्न हे मोबाईलवर देण्यात येणाऱ्या जाहिरातींच्या माध्यमातून मिळते. मात्र, चालू वर्षात फेसबुकच्या मुख्य ऍपद्वारे उत्पन्न कमी होणार आहे. म्हणजेच मेसेंजर, इन्स्टाग्राम इत्यादी अन्य स्त्रोतातील उत्पन्न वाढविण्यावर फेसबुक भर देणार आहे. फेसबुकच्या मालकीच्या केवळ व्हॉटसऍप मेसेंजर ऍपवर सध्या जाहिराती दिसत नाहीत.

Web Title: facebook news marathi news sakal news facebook messanger app