घ्या! गुगलचे सीईओच वापरतात अ‍ॅपल अन् सॅमसंगचे फोन; स्वतःच केलं मान्य | Google CEO Sundar Pichai admits using iPhone and Samsung Phones in YouTube interview | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Sundar Pichai

घ्या! गुगलचे सीईओच वापरतात अ‍ॅपल अन् सॅमसंगचे फोन; स्वतःच केलं मान्य

अँड्रॉईड फोन चांगला की आयफोन या प्रश्नावरून टेक जगतात कायमच वाद सुरू राहिला आहे. मात्र, आता कदाचित या प्रश्नाचं उत्तर लोकांना मिळू शकेल. कारण, चक्क गुगलचे सीईओ सुंदर पिचाई (Sundar Pichai) यांनीच आपण अ‍ॅपल आणि सॅमसंगचे फोन वापरत असल्याचे कबूल केले आहे.

अँड्रॉईड ही गुगलची ऑपरेटिंग सिस्टीम (Google OS) आहे, आणि गुगलचा स्वतःदेखील स्मार्टफोन तयार करते. अशातच पिचाई यांच्या कबूलीमुळे सर्वांच्याच भुवया उंचावल्या आहेत.

सध्या वापरतात पिक्सल फोन

यूट्यूबर अरुण मैनी यांना दिलेल्या एका मुलाखतीत सुंदर पिचाईंनी स्मार्टफोन्सबद्दल गप्पा मारल्या. अरुण यांच्या Mrwhosetheboss या यूट्यूब चॅनलवर ही मुलाखत उपलब्ध आहे. यावेळी पिचाईंनी सांगितलं, की सध्या ते पिक्सलचा नवीन फोल्डेबल स्मार्टफोन (Google pixel fold) वापरत आहेत.

गुगलने काही दिवसांपूर्वीच आपला पिक्सल फोल्ड स्मार्टफोन लाँच केला होता. या फोनच्या टेस्टिंगसाठी पिचाई तो वापरत आहेत. याव्यतिरिक्त प्रायमरी डिव्हाईस म्हणून आपण पिक्सल ७ प्रो (Google pixel 7 pro) हा स्मार्टफोन वापरत असल्याचे त्यांनी सांगितले.

सॅमसंग आणि अ‍ॅपलला पसंती

आपले सेकंडरी डिव्हाईस म्हणून कधी-कधी पिक्सल फोल्ड ऐवजी सॅमसंग गॅलेक्सी किंवा आयफोन देखील वापरत असल्याचे (Google CEO Sundar Pichai admits using iPhone and Samsung Phones) पिचाई यांनी यावेळी सांगितले. आपल्याकडे एकाहून अधिक फोन नंबर आहेत, असंही ते म्हणाले.

एआय आणि स्मार्टफोन

यावेळी बोलताना पिचाई यांनी स्मार्टफोन आणि एआयच्या भविष्याबाबत चर्चा केली. ते म्हणाले, की एआयमुळे स्मार्टफोनसोबत आपण कसं इंटरॅक्ट करतो आहोत त्या पद्धतीत आमूलाग्र बदल होणार आहे. "आपण आतापर्यंत मानवाला संगणकाशी जुळवून घेत आलो आहोत, मात्र एआयच्या आगमनानंतर आता संगणक माणसांशी जुळवून घेताना दिसत आहे", असंही ते म्हणाले.

स्मार्टफोनमध्ये काय आवडतं?

या मुलाखतीवेळी पिचाई यांनी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. त्यांनी सांगितलं, की चांगल्या बॅटरी ऐवजी चांगला कॅमेरा असलेल्या फोनला ते अधिक प्राधान्य देतील. तसेच, त्यांना स्मार्टफोनमध्ये वायरलेस चार्जिंग अधिक पसंत असल्याचं त्यांनी सांगितलं.