कामाचा कंटाळा आला? रोबोला पाठवा! 

महेश बर्दापूरकर 
सोमवार, 6 मार्च 2017

आयझॅक असिमोव्ह यांनी 60 वर्षांपूर्वी लिहिलेल्या "रोबो' या कथासंग्रहात यंत्रमानवासंदर्भात वर्तवलेले सात अंदाज तंतोतंत जुळल्याचे समोर आले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजागी रोबोंना कामासाठी पाठविण्याचा पुढचा टप्पा आता गाठला जातो आहे. कॅलिफोर्नियातील कंपनीने कर्मचाऱ्यांच्या जागी "बीम'नावाचे रोबो पाठवून मोठा टप्पा गाठला आहे... 

आयझॅक असिमोव्ह यांनी 60 वर्षांपूर्वी लिहिलेल्या "रोबो' या कथासंग्रहात यंत्रमानवासंदर्भात वर्तवलेले सात अंदाज तंतोतंत जुळल्याचे समोर आले आहे. मात्र, कर्मचाऱ्यांनी त्यांच्याजागी रोबोंना कामासाठी पाठविण्याचा पुढचा टप्पा आता गाठला जातो आहे. कॅलिफोर्नियातील कंपनीने कर्मचाऱ्यांच्या जागी "बीम'नावाचे रोबो पाठवून मोठा टप्पा गाठला आहे... 

कामासाठी कार्यालयात जाणे, त्यासाठी ट्रॅफिकचा सामना करणे, खासगी आयुष्याचा त्याग करून ऑफिसमध्ये अधिक काळ काम करणे या गोष्टी बहुतांश अधिकारी व कर्मचाऱ्यांना आता नकोशा वाटू लागल्या आहेत. घरी बसून लॅपटॉपच्या मदतीने काम करण्यासारखे पर्याय काही कंपन्या कर्मचाऱ्यांना देत आहेत. मात्र, बहुतांश ठिकाणी मनुष्याची गरज ही भासतेच. यावर कॅलिफोर्नियामधील एका कंपनीने पर्याय शोधला असून, "बीम' हा रोबो तयार केला आहे. शहरातील एका शॉपमधील कर्मचारी घरी बसून त्यांचे रोबो (बीम) कामावर पाठवून देतात. हे बीम कर्मचाऱ्यांच्या आदेशांनुसार शॉपमध्ये काम करतात! 
बीमच्या मदतीने हे शॉप व्यवस्थित काम करते आहे. शॉप उघडणे, दिवे लावणे, तापमान नियंत्रित करणे, ग्राहकांच्या प्रश्‍नांना उत्तरे देणे व त्यांनी मागितलेली सेवा देण्याचे काम हे रोबो करतात. कर्मचारी घरी बसून माऊस व ऍरो कीच्या मदतीने "बीम' चालवतात व त्याच्या स्क्रीनवर संबंधित कर्मचाऱ्याचा चेहरा वेबकॅमेऱ्याच्या मदतीनं झळकत राहतो. शॉप फ्लोअरवर स्क्रीनवर मोठा चेहरा दाखवत खुरडत चालणारे रोबो विनोदी आणि थोडा भीतीदायकही दिसतात! "बीम'चे निर्माते असलेले सुटेबल टेक्‍नॉलॉजीचे स्कॉट हसन म्हणाले, ""कंपनीतील कर्मचाऱ्यांना आता या रोबोंची सवय झाली आहे. अनेकांच्या दृष्टीनं ही काळाच्या खूप पुढची गोष्ट असल्यानं त्यांना काय प्रतिक्रिया द्यावी हेच समजत नाही. या "कर्मचाऱ्यां'चं अस्तित्व इतर कर्मचाऱ्यांनी स्वीकारलं असून, ग्राहकही त्यांच्याशी संवाद साधू लागले आहेत. "रोबो'मागच्या कर्मचाऱ्यांशी त्यांची मैत्री होऊ लागली आहे. संवाद साधल्यावर त्यांच्यातील भावनिक दुरावाही कमी झाल्याचं आढळून आलं आहे.'' 
हसन यांनी या पूर्वी "गुगल'साठी काम केलं असून, "ई-ग्रुप' नावाची ई-मेल कंपनीही स्थापन केली होती. मात्र, व्हिडिओ कॉन्फरन्सिंग, मेल, चॅट यांसारख्या सुविधा असतानाही कर्मचाऱ्यांना घरात बसून काम का येत नाही, ही खंत त्यांना स्वस्थ बसू देत नव्हती. वरील प्रकारांत संवादामध्ये चूक होण्याची शक्‍यता होती व ती "बीम'ने भरून काढली असल्याचे त्यांचे मत आहे. "या तंत्रज्ञानामुळं जगातील कोणत्याही भागातील हुशार कर्मचारी कंपनीसाठी त्याच्या घरी बसून काम करू शकतील. त्यातून कंपन्यांचा पगारावरील खर्चही मोठ्या प्रमाणावर कमी होईल. अपंग कर्मचाऱ्यांना याचा सर्वांत मोठा फायदा होईल,' असाही हसन यांचा दावा आहे. ""ही कल्पना विकणं सध्या फारच जिकिरीचं आहे. मात्र, आपला बॉस घरात बसून रोबोच्या मदतीनं आपल्यावर नजर ठेवून आहे, हे समजल्यावर कर्मचारी खूप चांगलं काम करीत असल्याचंही दिसून आलं आहे. बॉसचा फोन, मेल, टेक्‍स्ट मेसेज कर्मचाऱ्यांना टाळता येतो, मात्र तो ऑफिसमध्ये "फिरत' असताना त्याला टाळणं अशक्‍यच आहे!'' 
बीमच्या स्पर्धेत आता "डबल रोबोटिक्‍स' व "ऍनिबॉट्‌स' या कंपन्याही उतरल्या असून, हे रोबो लवकर "उडत' काम करतील, असा दावा सगळ्याच कंपन्यांनी केला आहे. तंत्रज्ञान भविष्यातील असलं, तरी कधीतरी ते आपल्या दारात येणारच आहे... 
 

Web Title: lazy workers send robot