राजापुरात जांभ्यामध्ये नव्या फूल वनस्पतीचा शोध

राजेंद्र बाईत
गुरुवार, 27 जून 2019

राजापूर तालुक्‍यातील समुद्र किनाऱ्यावरील जांभ्या दगडाच्या पठारावर फुलणाऱ्या गुलाबी रंगाची आणि आकर्षक दिसणाऱ्या छोट्याचणीच्या ‘लेपिडागॅस्थिस श्रीरंगी’ या नव्या फूल वनस्पतीचा शोध लागला आहे. जागतिक दर्जाची ही फूल वनस्पती तालुक्‍यातील कशेळी समुद्र किनाऱ्यावरील श्री कनकादित्य मंदिर आणि किनारा परिसरातील जांभ्या खडकाच्या पठार परिसरामध्ये उगवते. 

राजापूर - राजापूर तालुक्‍यातील समुद्र किनाऱ्यावरील जांभ्या दगडाच्या पठारावर फुलणाऱ्या गुलाबी रंगाची आणि आकर्षक दिसणाऱ्या छोट्याचणीच्या ‘लेपिडागॅस्थिस श्रीरंगी’ या नव्या फूल वनस्पतीचा शोध लागला आहे. जागतिक दर्जाची ही फूल वनस्पती तालुक्‍यातील कशेळी समुद्र किनाऱ्यावरील श्री कनकादित्य मंदिर आणि किनारा परिसरातील जांभ्या खडकाच्या पठार परिसरामध्ये उगवते. 

प्रा. डॉ. एस. आर. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली आबासाहेब मराठे महाविद्यालयाचे प्रा.डॉ. अरुण चांदोरे, प्रतीक नाटेकर, देवीदास बोरुडे, डॉ. शरद कांबळे या संशोधकांनी वर्षभराच्या संशोधनाअंती ही नवी फूल वनस्पती जगासमोर आणली आहे. तालुक्‍याच्या कातळ परिसरामध्ये फिरत असताना नावीन्यपूर्ण भासणारी ही वनस्पती डॉ. चांदोरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या नजरेस पडली. त्याच्याविषयी माहिती जाणून घेतली असता ही नवीन प्रजाती असल्याचे निदर्शनास आले. त्यातून, या वनस्पतीवर संशोधन केले. 

खडकावर जानेवारी-फेब्रुवारीमध्ये फुलणारी आणि सदाबहार व टवटवीत राहत साऱ्यांचे लक्ष वेधून घेणाऱ्या ‘लेपिडागॅस्थिस श्रीरंगी (lepidagathis shrirangi) या फुलवनस्पतीची संशोधित वनस्पती म्हणून जागतिक स्तरावर ६ जून २०१९ ला न्यूझीलंड येथून प्रकाशित होणाऱ्या ‘फायटोटॅक्‍सा’ (PHYTOTAXA) या जागतिक दर्जाच्या या नियतकालिकाच्या माध्यमातून नोंद झाली. या संशोधनामध्ये प्राचार्य डॉ. पी. जी. पवार, प्रा. संतोष मेंगाळ, प्रा. नंदकुमार साळुंके, नीलेश माधव, निरंजन चव्हाण, अक्षय मांडवकर, प्रणव नलावडे आदींचे सहकार्य लाभल्याचे प्रा. चांदोरे यांनी सांगितले. 

कोचवर्गीय वनस्पती
‘लेपिडागॅस्थिस’ या प्रजातीच्या सुमारे ११० जाती आहेत. भारतामध्ये त्यापैकी ३१ प्रजाती आढळतात. त्यापैकी २० प्रजाती प्रदेशनिष्ठ प्रकारात मोडतात. या वनस्पतीच्या इतर प्रजाती या प्रामुख्याने पठारावर तसे मैदानी प्रदेशामध्ये आढळतात. मात्र, नव्याने संशोधित झोलेली प्रजाती समुद्र किनाऱ्यावरील जांभ्या खडकाच्या पठारावर आढळते. ही वनस्पती जमिनीच्या पृष्ठभागावर वाढत असल्यामुळे त्याच पानांचे रूपांतर काट्यामध्ये झालेले असल्याने स्थानिक भाषेमध्ये त्याला ‘कोच’ (कोचवर्गीय वनस्पती) असेही म्हणतात.

असे झाले नामकरण
वनस्पतीचे नामकरणही या संशोधकांनी केले. विविध प्रकारच्या जागतिक दर्जाच्या सुमारे ७५ वनस्पतींचा शोध लावणारे आणि कोल्हापूर येथील डॉ. श्रीरंग रामचंद्र यादव यांच्या नावाचा समावेश असलेले ‘लेपिडागॅस्थिस श्रीरंगी’ हे नाव देण्यात आल्याची माहिती चांदोरे यांनी दिली. या वनस्पतीला जागतिक स्तरावर नव्या नावाने ओळखले जाणार आहे. 

अशी आहे ‘लेपिडागॅस्थिस श्रीरंगी’ 

  •   फुलाची १ ते १.३ सेंमी लांबी
  •   गुलाबी फिक्कट रंग
  •   वनस्पतीचे खोड गोलाकार
  •   पाने जाडी गुच्छांचे भाग १०-१५
  •   वनस्पतीची रुजवात डिसेंबरमध्ये
  •   फुलांचा हंगाम जानेवारी ते फेब्रुवारी 
  •   अडुळसा कुळातील वनस्पती
     

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Lepidagathis Shrirangi New flowering plant research in Rajapur