शनि ग्रहाच्या 'त्या' चंद्रावर जीवसृष्टीची शक्‍यता...

शुक्रवार, 14 एप्रिल 2017

शनिच्या एका छोट्या चंद्रावर रासायनिक उर्जेचे आढळलेले अस्तित्व हे अवकाशामध्ये पृथ्वीपलीकडील वसतियोग्य ठिकाणांचा शोध घेण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील एक मोठे यश आहे

न्यूयॉर्क - इन्सेलॅड्‌स या शनि या ग्रहाच्या एका चंद्रावर जीवसृष्टीस पूरक असलेल्या रासायनिक उर्जेची लक्षणे दिसून आल्याचे निरीक्षण अमेरिकेची अवकाश संशोधन संस्था असलेल्या "नासा'ने नोंदविले आहे. या चंद्रावरील हिमाच्छादित सागरीपृष्ठामध्ये पाणी अतितप्त होऊन घडणाऱ्या वैज्ञानिक प्रक्रियेमुळे (हायड्रोथर्मल) हायड्रोजन वायु मिसळला जात आहे. पाण्यात मिसळलेला कर्बवायु व या हायड्रोजन वायुचा एकत्रित वापर करुन सुक्ष्म जीवांना अन्ननिर्मिती करणे शक्‍य असल्याचे नासाने म्हटले आहे.

पाणी, उर्जेचा स्त्रोत आणि कार्बन, हायड्रोजन, नायट्रोजन, ऑक्‍सिजन, फॉस्फरस व सल्फर या जीवसृष्टीसाठी आवश्‍यक असलेल्या सर्व घटकांची उपस्थिती इन्सेलॅड्‌सवर असण्याची दाट शक्‍यता आहे. या चंद्रावर पाणी व हायड्रोजन (उर्जास्त्रोत) असल्याचा पुरावा आहेच; याशिवाय इन्सेलॅड्‌सवर उर्वरित घटकही असण्याचा अंदाज शास्त्रज्ञांकडून वर्तविण्यात आला आहे.

"शनिच्या एका छोट्या चंद्रावर रासायनिक उर्जेचे आढळलेले अस्तित्व हे अवकाशामध्ये पृथ्वीपलीकडील वसतियोग्य ठिकाणांचा शोध घेण्याच्या आमच्या प्रयत्नांमधील एक मोठे यश आहे,'' असे नासाच्या "जेट प्रॉपल्शन लॅबोरेटरी'मधील ज्येष्ठ शास्त्रज्ञ लिंडा स्पालकर यांनी म्हटले आहे. कॅसिनी या नासाच्या अवकाशयानाने यासंदर्भातील पहिला पुरावा मिळविण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे. हे यान नासाने ऑक्‍टोबर 2015 मध्ये अवकाशामध्ये पाठविले होते.

इन्सेलॅड्‌स या चंद्राचे सूर्यापासूनचे अंतर तब्बल 88.7 कोटी मैल इतके आहे. किंबहुना, या प्रचंड अंतरामुळे येथे जीवसृष्टीची असलेली शक्‍यता अधिक महत्त्वपूर्ण व सुखद मानली जात आहे.

इन्सेलॅड्‌स हा शनि ग्रहाचा सहावा सर्वांत मोठा चंद्र आहे. ब्रिटीश खगोलशास्त्रज्ञ विल्यम हर्शेल यांनी 1789 मध्ये या चंद्राचा शोध लावला होता. या चंद्राचा व्यास सुमारे 310 मैल इतका असून पृथ्वीपासून तो सुमारे 79 कोटी मैल अंतरावर आहे.

या चंद्रावर द्रवावस्थेताल पाणी असल्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केल्यानंतर 2005 मध्ये यासंदर्भात संशोधन करण्यासाठी कॅसिनीने पृथ्वीवरुन उड्डाण केले होते. तेव्हापासून या यानाकडून पाठविण्यात आलेल्या माहितीचा शास्त्रज्ञांकडून अभ्यास करण्यात येत आहे. या अभ्यासामधून जीवसृष्टीस पूरक ठरणारे वातावरण या चंद्रावर असल्याचा काढण्यात आलेला निष्कर्ष शास्त्रज्ञांसाठी अत्यंत उत्साहवर्धक असल्याचे मानले जात आहे.