बुद्धिमत्तेची "कृत्रिम' फसवणूक... 

महेश बर्दापूरकर 
गुरुवार, 20 एप्रिल 2017

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चर्चेने सध्या जोर पकडला असून, संशोधक हे तंत्रज्ञान मानवी अस्तित्वाला कोठे घेऊन जाणार याबद्दलच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल चर्चा करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवन सुकर होताना निर्माण होणाऱ्या धोक्‍यांबद्दलही इशारे दिले जात असून, या बुद्धिमत्तेला "फसवणे' किती सोपे आहे आणि तसे केल्यास किती मोठे अपघात होऊ शकतात, याची उदाहरणे संशोधक देत आहेत. 

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या चर्चेने सध्या जोर पकडला असून, संशोधक हे तंत्रज्ञान मानवी अस्तित्वाला कोठे घेऊन जाणार याबद्दलच्या चांगल्या आणि वाईट गोष्टींबद्दल चर्चा करत आहेत. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे मानवी जीवन सुकर होताना निर्माण होणाऱ्या धोक्‍यांबद्दलही इशारे दिले जात असून, या बुद्धिमत्तेला "फसवणे' किती सोपे आहे आणि तसे केल्यास किती मोठे अपघात होऊ शकतात, याची उदाहरणे संशोधक देत आहेत. 

कृत्रिम बुद्धिमत्तेने मानवी जीवनातील अनेक गोष्टींवर राज्य सुरू केल्यानंतरच्या 2025 सालामध्ये तुम्ही आहात आणि तुमच्या "ड्रायव्हर लेस' मोटारीतून प्रवास करत आहात, अशी कल्पना करा. रस्त्याने वेगाने जात असताना समोरच्या चौकात लाल सिग्नल लागला आहे आणि आता तुमच्या मोटारीने थांबणे अपेक्षित आहे; मात्र तुमची ही "बुद्धिमान' मोटार सिग्नल तोडून पुढे जाते आणि मोठा अपघात होतो...हे घडण्याचे कारण? तुम्ही सिग्नलला पोचण्याआधीच एका हॅकरने तुमच्या नकळत सिग्नलवर एक स्टिकर प्लॅंट केले आहे. हे स्टिकर मानवी डोळ्यांना दिसत नसले, तर ते मशिनला वाचता आले. त्यातून न थांबण्याचा इशारा तुमच्या मोटारीला मिळाला आणि हा अपघात झाला. हा मोठा कल्पनाविलास वाटत असला, संशोधकांच्या मते कृत्रिम बुद्धिमत्तेला अशा प्रकारे फसविणे सहज शक्‍य आहे. असेच हल्ले रस्त्यांबरोबरच आर्थिक व्यवहार, आरोग्य सुविधा आदींवरही होऊ शकतात. त्यामुळे त्यांचा आधीच बीमोड करण्याचे आव्हान संगणक अभियंत्यांपुढे आहे. 
डॅनिअल लोव्ड या अभियंत्याच्या मते, ""कृत्रिम बुद्धिमत्तेवर चालणाऱ्या कोणत्याही मशिनमध्ये संगणकीय भाषा (अल्गोरिदम) वापरली जात असल्याने याचा गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. हॅकरने तुमचा ई-मेल ब्लॉक करणे आणि तुमच्या मोटारीला धडकवणे यात मोठा फरक आहे. मूल ज्याप्रमाणे अंक आणि अक्षरांची ओळख करून घेते, त्याचप्रमाणे मशिनलाही या गोष्टी शिकविल्या जातात. थोडक्‍यात, शब्दांचे आणि अक्षरांचे चित्र पाहूनच मशिन शिकतात; मात्र मानवी मेंदू त्यातील आणखी बारकावे शिकतो, जे मशिनला शक्‍य नसते. येथेच मशिनला फसवता येते. म्हणजेच, रंगीत हलणाऱ्या दोरीला मानवी मेंदू साप म्हणणार नाही; मात्र मशिन त्याला "फिचर्स'वरून साप समजते! मशिन अल्गोरिदमच्या याच कमतरतेचा उपयोग भविष्यात केला जाईल.'' 

सिग्नलवर स्टिकर प्लॅंट करून मोटारीला फसवणे, हे "हॅकिंग'चे भविष्यातील यातील आदर्श उदाहरण म्हणता येईल. हॅकर्सना मशिन अल्गोरिदमची फाइल मिळाल्यास ते तिच्यात बदल करून फसवणूक नक्कीच करू शकतील. याव्यतिरिक्त अनेक हातखंडे वापरून मशिनला फसविण्याचे मार्ग शोधले जातील, प्रश्‍न आहे त्यांना रोखण्याचा. पेनसिल्व्हानिया विद्यापीठातील प्रोफेसर पॅट्रिक मॅकडॅनिअल यांच्या मते, ""कृत्रिम बुद्धिमत्ता मानवानेच निर्माण केली असल्याने तिला फसविण्याचे कामही माणूसच करू शकेल. मशिन 99 टक्के वेळा अचूक काम करत असल्या, तरी त्यात त्रुटी आहेत आणि त्या दूर करण्याचे प्रयत्नही होत आहेत. संभाव्य हल्ल्यांचा आधीच विचार करून त्यांची माहिती मशिन लर्निंग अल्गोरिदमला देणे हा एक महत्त्वाचा पर्याय आहे. मशिनने केलेला अंदाज आणखी एखाद्या (उदा. "फेसबुक एम'सारखे खोट्या बातम्या शोधणारे ऍप.) व्यवस्थेकडून तपासून पाहणे व या प्रक्रियेत मानवी हस्तक्षेप टाळणे हाही पर्याय संशोधक सुचवत आहेत; मात्र न्यायव्यवस्थेसारख्या ठिकाणी कृत्रिम बुद्धिमत्ता वापरताना मनुष्याकडून त्याची फेरतपासणी गरजेची ठरेल. आपण जे सांगणार त्या आधारेच मशिन आपल्याला उत्तर देणार आहेत. त्यामुळे त्यांना "परफेक्‍शनिस्ट' कधीच म्हणता येणार नाही...'' 
 

Web Title: mahesh bardapurkar writes about artificial intelligence