लॉकडाउनमध्ये 9 वीच्या विद्यार्थ्याने तयार केली मोबाइल गेम

सकाळ वृत्तसेवा
Monday, 24 August 2020

लॉकडाउनमध्ये अडकलेल्या मुलाला घरी जायचं आहे अशा थीमवर नववीच्या विद्यार्थ्याने मोबाइल गेम तयार केली आहे. युट्यूबवर व्हिडिओ आणि काही आर्टिकलचा अभ्यास करून तयार केलेली गेम रविवारी गुगल प्ले स्टोअरवर लाँच केली.

इंफाळ - सध्या कोरोनामुळे अनेक देशांमध्ये लॉकडाऊन करण्यात आलं आहे. भारतातही मार्च महिन्यापासून लॉकडाउन करण्यात आलं होतं. आता हळूहळू नियम शिथिल करून सर्व व्यवहार सुरळीत कऱण्याचे प्रयत्न केले जात आहे. दरम्यान, शाळा कॉलेज सुद्धा बंद ठेवण्यात आली होती. या काळात मणिपूरमधील एका नववीच्या विद्यार्थ्यांनं मोबाइल गेम तयार केली आहे. यामध्ये देशात लॉकडाउमुळे अडकलेला मुलगा घरी जाण्यासाठी धडपडतो. तसंच आदेशाचं उल्लंघन केल्यास गेममध्ये त्याच्यावर 5000 चा दंडही लागतो. 

गेम तयार करणाऱ्या मुलाचे नाव बलदीप निंगथूजम असं आहे. त्याने कोरोबोई (Coroboi) असं मोबाइल गेमचं नाव ठेवलं आहे. कोरोनाच्या काळात सरकारने जे काही नियम घातले आहेत त्याचाही वापर गेममध्ये करण्यात आला आहे. सर्व अँड्रॉइड युजर्सना ही गेम डाउनलोड करता येते. प्ले स्टोअरवर रविवारी ही गेम उपलब्ध झाली आहे. 

हे वाचा - यूजर्स नव्हे, तुम्ही-आम्ही कंपन्यांच्या हातातील बाहुलं!

गुगल प्ले स्टोअरवर दिलेल्या माहितीनुसार, मणिपूरमधील एक मुलगा लॉकडाऊमध्ये अडकला असून तो घरी जात आहे. गेममध्ये लेइरूम पी (मणिपूरचे पारंपरिक कापड मानेभोवती गुंडाळून) आणि एक मास्क घालून तो घरी परत जाण्यासाठी धावतो. यावेळी तो अनेक पॉइंट मिळवू शकतो. मात्र त्याचवेळी पोलिसांनी त्याला पकडलं तर 5000 पॉइंट कमी होतील.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: manipur 9th class student make mobile game based on covid