"सस्पेन्शन' आता चाकातच 

गुरुवार, 1 मार्च 2018

पुणे - एखाद्या खड्ड्यात जोरात आपटल्यानंतर सायकल किंवा दुचाकीचे "सस्पेन्शन' खराब झाल्याचे तुम्हाला आठवते? हे "सस्पेन्शन' खराब झाल्यामुळे होणारा पाठदुखीचा त्रास वेगळाच; पण आता या दोन्हीपासून तुमची सुटका होणार आहे. तुमच्या सायकल, दुचाकीला असलेले "सस्पेन्शन' काढून ते चाकात "स्पोक'च्या जागी लावण्याचे नवसंशोधन शहरातील अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यामुळे वाहनाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच इंधनाचा वापर कमी झाल्याचे त्यांच्या प्रयोगात दिसले आहे. 

पुणे - एखाद्या खड्ड्यात जोरात आपटल्यानंतर सायकल किंवा दुचाकीचे "सस्पेन्शन' खराब झाल्याचे तुम्हाला आठवते? हे "सस्पेन्शन' खराब झाल्यामुळे होणारा पाठदुखीचा त्रास वेगळाच; पण आता या दोन्हीपासून तुमची सुटका होणार आहे. तुमच्या सायकल, दुचाकीला असलेले "सस्पेन्शन' काढून ते चाकात "स्पोक'च्या जागी लावण्याचे नवसंशोधन शहरातील अभियांत्रिकीच्या चार विद्यार्थ्यांनी केले आहे. त्यामुळे वाहनाची कार्यक्षमता वाढण्याबरोबरच इंधनाचा वापर कमी झाल्याचे त्यांच्या प्रयोगात दिसले आहे. 

मितेश रसाळ, शुभम सुतार, सूरज इत्तम आणि स्वप्नील इथापे अशी नवसंशोधकाची नावे आहेत. मितेश याने "मराठवाडा मित्र मंडळ कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'मधून तर अन्य तिघांनी "झील कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग'मधून मेकॅनिकल शाखेचे अभियांत्रिकी शिक्षण नुकतेच पूर्ण केले आहे. चाकातील "सस्पेन्शन'च्या या नवसंशोधनाबद्दल त्यांना विविध महाविद्यालयीन स्पर्धांमध्ये पुरस्कार मिळाले. पेटंटसाठी अर्ज प्रक्रियाही त्यांनी पूर्ण केली आहे. 

पराभवातून अभिनव कल्पना 
कुसरो वाडिया महाविद्यालयात डिप्लोमा अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांच्या एका कार्यक्रमानिमित्त या चौघांची भेट झाली. त्या वेळी महाविद्यालयाने त्यांना "हायब्रीड व्हेईकल' बनविण्याची जबाबदारी दिली होती. या प्रकल्पावर काम करत असताना साखळी निसटण्यापासून ते सस्पेन्शन खराब होण्यापर्यंत त्यांनी अनेक अडचणींचा सामना केला. त्या स्पर्धेत त्यांचा पराभव झाला; पण त्यातून त्यांना सुचली एक अभिनव संकल्पना. सर्वसामान्य नागरिकांना होणाऱ्या पाठदुखीची कारणे आणि त्यामुळे त्यांच्या कार्यक्षमतेत घट होत असल्याचे निरीक्षणही त्यांनी नोंदविले. यापुढे "सस्पेन्शन'वरच काम करायचे आणि नवउद्योजक व्हायचे स्वप्न त्यांनी पाहिले. त्यासाठी मार्गदर्शक म्हणून शास्त्रज्ञ डॉ. विकास नाडकर्णी आणि "झील'चे कार्यकारी संचालक जयेश काटकर हे काम करत आहेत. 

अपयशाने खचलो नाही 
मितेश म्हणाला, ""संकल्पनेला प्रत्यक्षात उतरविण्यासाठी आम्ही 2016 मध्ये काम सुरू केले. सस्पेन्शन बनविण्यासाठी कोणते मटेरिअल वापरता येईल याचा अभ्यास सुरू केला. त्यानंतर विविध प्रयोग करत राहिलो; पण पाच ते सहा वेळा अपयश आले. मात्र, निराश न होता आम्ही पुन्हा अभ्यास करून नव्या उत्साहाने नवीन प्रयोगासाठी तयार होत होतो. अखेर आम्हाला यश मिळाले.'' 

याचे फायदे 
- चाकातील "स्पोक्‍स'च्या जागेवर अंडाकृतीच्या तीन "लूप' लावण्यात आले आहेत. 
- या "लूप'चे स्वरूप लवचिक असल्याने गाडी आपटली तरी हे "लूप' आकुंचन आणि विस्तारण्याचे काम करतात. 
- चालकाला हादरा बसत नाही आणि "लूप'च्या विशिष्ट रचनेमुळे वाहनाची कार्यक्षमता वाढते आणि इंधन कमी लागेल. 

सध्या आम्ही या उत्पादनाचा वापर सायकलींसाठी करण्याचे ठरविले आहे. देशात तीन हजार कोटी रुपयांची उलाढाल असलेल्या सायकल बाजारपेठेत आम्हाला मोठी संधी आहे. त्यात यश आल्यानंतर दुचाकींसाठीचे उत्पादन बाजारात आणू. उत्पादनाचे पेटंट मिळविण्याची प्रक्रिया गेल्या वर्षीच सुरू केली असून लवकरच ती पूर्ण होईल. 
- मितेश रसाळ, नवसंशोधक 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: marathi news Suspension salil urunkar article