मोबाईलवर होणार क्षणात सिनेमा डाऊनलोड !

शुक्रवार, 13 ऑक्टोबर 2017

दहा गीगा बाईटस् प्रति सेकंद इतका अचाट वेग मोबाईलवर देऊ शकणारे इंटरनेट भारतात दाखल व्हायला आता फार काळ राहिलेला नाही. येत्या दोन वर्षांत, म्हणजे 2019 पर्यंत भारतात 5G सुरू होऊ शकेल आणि त्यानंतरच्या तीन वर्षांत म्हणजे 2020 पर्यंत भारत 5G मध्ये बदललेला असेल. गेल्या आठवडाभरात वेगवेगळे अहवाल, सरकारी अधिकारी, मोबाईल ऑपरेटर कंपन्यांच्या प्रमुखांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

दहा गीगा बाईटस् प्रति सेकंद इतका अचाट वेग मोबाईलवर देऊ शकणारे इंटरनेट भारतात दाखल व्हायला आता फार काळ राहिलेला नाही. येत्या दोन वर्षांत, म्हणजे 2019 पर्यंत भारतात 5G सुरू होऊ शकेल आणि त्यानंतरच्या तीन वर्षांत म्हणजे 2020 पर्यंत भारत 5G मध्ये बदललेला असेल. गेल्या आठवडाभरात वेगवेगळे अहवाल, सरकारी अधिकारी, मोबाईल ऑपरेटर कंपन्यांच्या प्रमुखांनी तसे स्पष्ट संकेत दिले आहेत. 

गेल्या वर्षभरात मोबाईलवर आवडता सिनेमा डाऊनलोड करण्याचे प्रमाण भारतातही वाढले आहे. 4G मध्ये एक जीबी फाईल साईजचा सिनेमा डाऊनलोड होण्यासाठी मुंबई, पुण्यासारख्या महानगरी भागातही अर्धा तास लागू शकतो. 5G मोबाईलवर हा सिनेमा फोटो क्लिक करण्याइतक्या कमी वेळात डाऊनलोड होऊ शकेल. 

सध्याचा भारतातील इंटरनेटचा वेग 12 मेगा बाईटस् प्रति सेकंद (12Mbps) इतका आहे. 5G तंत्रज्ञानाने हा वेग 1,00,000 Mbps किंवा 10 गीगा बाईटस् (10GB) इतका प्रचंड वाढणार आहे. आजघडीला भारतात सुरू असलेल्या इंटरनेट क्रांतीची पुढची पायरी 5G ने गाठली जाणार आहे. भारतातील तब्बल 28 टक्के मोबाईल ऑपरेटर कंपन्या पुढच्या वर्ष-दीड वर्षांत 5G सुरू करण्याच्या तयारीला लागल्या आहेत. 

भारतात ऑप्टीकल फायबर नेटवर्कचे जाळे विस्तारत आहे. ग्रामिण भागापर्यंत इंटरनेट पोहोचविण्याचा 2011 मध्ये सुरू झालेला कार्यक्रम धीम्या; पण कायम गतीने पुढे सरकत आहे. ऑप्टीकल फायबरच्या जोडीलाच मोबाईल इंटरनेटचा वेग वाढतो आहे. या वर्षात 4G इंटरनेट बहुतांश शहरी आणि निमशहरी भागापर्यंत पोहोचले आहे. 4G सर्वत्र पोहोचण्याच्या आधीच 5G इंटरनेटचे आगमन होईल, अशी चिन्हे आहेत. 

गेल्या आठवड्यात केंद्र सरकारने 5G ची तयारी करण्यासाठी एका स्वतंत्र समितीची स्थापना केली. सरकारी उद्देशानुसार, 2020 पर्यंत 5G सुरू होणे अपेक्षित आहे. शहरी भागांमध्ये 10GB आणि ग्रामिण भागामध्ये 1GB डेटा स्पीड मिळावा, अशी सरकारची अपेक्षा आहे. त्या आधीच मोबाईल ऑपरेटर्स स्वतःच्या खिशातून गुंतवणूक करून 5G लवकरात लवकर सुरू करण्यासाठी सरकारकडे घाई करतील, अशी सध्याची अवस्था आहे. 

केंद्र सरकारने आतापर्यंत 5G स्पेक्ट्रमचा लिलाव पुकारलेला नाही. मोबाईल ऑपरटेर कितपत प्रतिसाद देतील, याची चाचपणी सरकार करते आहे. 4G अद्याप देशात नवखे असताना 5G आले, तर नेमके काय होऊ शकेल, याचा अंदाज सरकारला आलेला नाही. मात्र, मोबाईल ऑपरेटर्स 5G साठी अत्यंत उत्साही असल्याचे चित्र गेल्या आठवडाभरात तयार झालेले आहे. मोबाईल कम्युनिकेशन क्षेत्रात काम करणाऱया इरिक्सन या स्वीडीश कंपनीने गुरूवारी प्रसिद्ध केलेल्या अहवालानुसार भारतातील कंपन्यांना 5G शक्य तितका लवकर हवा आहे, हे समोर आले आहे. 

5G रेडिनेस सर्व्हे 2017 या शीर्षकाखाली इरिक्सनने प्रकाशित केलेल्या अहवालात म्हटले आहे, की मोबाईल ऑपरेटर्सनी 5G नजरेसमोर ठेवून व्यवसाय विकसित केला आहे. केवळ ग्राहकसंख्या वाढविणे या मर्यादित उद्दीष्टाहून वेगळे असे नव्या उद्योगांमध्ये भागीदारीचे नवे मॉडेल ऑपरेटर्स सुरू करतील, अशी शक्यता आहे. 

'या आधी 2016 मध्ये आम्ही 5G साठी सर्वेक्षण केले होते. तेव्हा 90 टक्के मोबाईल ऑपरेटर्स फक्त ग्राहक संख्येवर लक्ष केंद्रीत करणारे होते. मात्र, गेल्या वर्षभरात मोबाईल उद्योगाने व्यवसायाची नवी क्षेत्रे शोधली आहेत. 5G मध्ये केवळ ग्राहकसंख्या वाढवून उपयोगाचे नाही, तर नव्या उद्योगांमध्ये भागीदारी करावी लागेल, हे मोबाईल ऑपरेटर्सना समजले आहे आणि तशी तयारीही त्यांनी केली आहे,' असे इरिक्सनच्या 5G कमर्शियलायझेशन विभागाचे प्रमुख थॉमस नोरेन यांनी म्हटले आहे. 

ग्राहक संख्येची बाजारपेठ भारतात आणखी वाढू शकणार नाही. त्यामुळे, औद्योगिक आणि व्यावसायिक गरजांसाठी 5G सेवा पुरवण्याचा विचार मोबाईल ऑपरेटर्स करत आहेत, असे सर्वेक्षणात समोर आले आहे. 

5G मुळे हे 5 बदल घडतील...

  1. इंटरनेटचा स्पीड वाढल्याने बहुतांश सेवा इंटरनेट माध्यमामार्फत पुरवण्यावर भर दिला जाईल.
  2. मीडिया आणि मनोरंजन या दोन क्षेत्रांमधील बहुतांश सेवा इंटरनेटद्वारे पुरवल्या जातील.
  3. स्वयंचलित (ऑटोमोटिव्ह) क्षेत्राला अफाट चालना मिळेल. 
  4. इंटरनेट ऑफ थिंग्ज (आयओटी) चा सर्व क्षेत्रात विस्तार होईल.
  5. आर्थिक व्यवहार मोबाईलवर जास्तीत जास्त होतील.

हे माहिती आहे का?
आपल्या मोबाईल स्क्रिनवर 2G, 3G, 4G असे लहान अक्षरात उजव्या किंवा डाव्या कोपऱयात दिसते. 1G कधी दिसले नाही; कारण तसे नावही तेव्हा दिले गेले नव्हते. यातील G म्हणजे जनरेशन. प्रत्येक 'जनरेशन'ने मोबाईल तंत्रज्ञानात बदल घडवला आहे. 

  • 1G: 2G सुरू झाल्यानंतर आधीच्या जनरेशनला मोबाईल तंत्रज्ञान क्षेत्रात 1G म्हणायला सुरूवात झाली. 1G मोबाईल म्हणजे फक्त कॉल करण्याचे साधन होते. 
  • 2G: या मोबाईलमध्ये कॉलिंगच्या जोडीला एसएमएस सेवा आली. शिवाय, मोबाईल वापरायला सोपा झाला. 
  • 3G: मोबाईलमधील वायरलेस टेक्नॉलॉजीला खऱया अर्थाने सुरूवात झाली. ब्राऊजिंग, इमेल, व्हिडिओ कॉलिंग, फोटो शेअरिंग आदी मोबाईलमध्ये आले आणि साधा मोबाईल स्मार्ट फोन बनला. मोबाईलमधील इंटरनेटचा वेग होता 2 मेगा बाईटस् प्रति सेकंद (2Mbps).
  • 4G: अगदी काटेकोर बोलायचे, तर या जनरेशनच्या मोबाईलवर इंटरनेटचा वेग हवा 100 मेगा बाईटस् प्रति सेकंद किंवा 1 गीगा बाईट प्रति सेकंद. मात्र, तसे घडत नाहीय. तरीही आधीपेक्षा इंटरनेटचा स्पीड विलक्षण वाढल्याचे स्पष्ट दिसते आहे. भारतासारख्या विशाल देशात अजून सर्वत्र ही सेवा पोहोचलेली नाही. 
  • 5G: शब्दशः जग मुठीत येईल, इतका प्रचंड म्हणजे 10 गीगा बाईटस् प्रति सेकंद असा इंटरनेटचा वेग असेल. ही सेवा अजून कोणत्याच देशात व्यावसायिक तत्वावर सुरू झालेली नाही. मात्र, अमेरिका आणि जपानमध्ये त्याची चाचणी घेतली जात आहे.
Web Title: Marathi news technology news in marathi 5G in India