गडावरील जैवविविधता जोपासण्याची गरज; भुदरगडावर 319 प्रजाती

राजेंद्र घोरपडे 
शुक्रवार, 13 मार्च 2020

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे आवश्‍यक आहे. यासाठी वनस्पती तज्ज्ञ डॉ. व्ही. बी. शिंपले, डॉ. मानसिंगराज निंबाळकर, डॉ. पी. आर. क्षीरसागर, डॉ. सूरज उमडाळे, डॉ. नीलेश पवार यांनी भुदरगडावर आढळणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास केला.

कोल्हापूर - आपण अनेक गड - किल्ल्यांवर भटकंती करतो. त्यांचा इतिहास जाणून घेण्याचा प्रयत्न करतो. गड-किल्ल्यांच्या संवर्धनासाठी प्रयत्न करतो. त्या वास्तू आपणास नेहमीच प्रेरणा देत असतात. स्फूर्ती देत राहतात. याबरोबरच या किल्ल्यावरील जैवविविधताही जोपासणे तितकेच गरजेचे झाले आहे.

पर्यावरणाचा समतोल साधण्यासाठी हे आवश्‍यक आहे. यासाठी वनस्पती तज्ज्ञ डॉ. व्ही. बी. शिंपले, डॉ. मानसिंगराज निंबाळकर, डॉ. पी. आर. क्षीरसागर, डॉ. सूरज उमडाळे, डॉ. नीलेश पवार यांनी भुदरगडावर आढळणाऱ्या वनस्पतींचा अभ्यास केला. किल्ल्यावर आढळणाऱ्या वनस्पतींची मूलभूत माहिती उपलब्ध व्हावी, हा त्यामागचा त्यांचा उद्देश होता. या संदर्भातील त्यांचा शोधनिबंधही प्रकाशित झाला आहे. 

भुदरगड किल्ला हा 10 चौरस किलोमीटरमध्ये व्यापलेला आहे. किल्ल्याच्या परिसरात घनदाट जंगल आहे. संशोधकांनी या किल्ल्याची पाहणी केली व औषधी वनस्पतीसह मानवास उपयुक्त ठरणाऱ्या वनस्पतींचीही नोंद त्यांनी केली. संशोधनात 319 प्रजातींची नोंद त्यांनी केली, यात 75 कुळांतील तर 238 वर्गातील वनस्पतींचा समावेश आहे. तसेच किटक भक्षी वनस्पतीच्या 12 पेक्षा जास्त प्रजातींची नोंद त्यांनी केली आहे.

319 मध्ये 57 टक्के हे वृक्ष, 17 टक्के झुडपे, 11 टक्के औषधी वनस्पती तर 15 टक्के वेलीवर्गीय वनस्पतीं नोंदविण्यात आल्या. महत्त्वाचे म्हणजे कोल्हापूर जिल्ह्यात वेडेलिया गाऊका या वनस्पतीची नोंद प्रथमच केली आहे, तर अत्यंत दुर्मिळ अशी व्हिग्ना सह्याद्रिका ही वनस्पतीही त्यांना आढळली. पश्‍चिम घाटातील स्थानिक म्हणून ओळखली जाणारी कुकुमिस इंडिकस ही प्रजाती तर कॉनवोलऊलेसी वर्गातील आयपोमिया अल्बा ही दुर्मिळ प्रजाती संशोधकांना आढळली. गडाच्या परिसरात नरक्‍या अमृता ही वनस्पती मोठ्या प्रमाणात संशोधकांना पाहायला मिळाली. 

दुर्मिळ असलेल्या वनस्पतींची नोंद 

या अभ्यासात स्थानिक दुर्मिळ आणि नष्ट होण्याच्या मार्गावर असलेल्या काही वनस्पतींची नोंदही करण्यात आली. यामध्ये अडिनून इंडिकम, अलिसिकारपस बेलगमिनसिस, कुकुमिस सेटोसुस, इरिनोकारपस निम्मोनिल आदींचा समावेश आहे. 

गडाबरोबरच जैवविविधताही जपायला हवी 

संशोधकांनी केलेल्या पाहणीत सुमारे 300 हून अधिक प्रकारच्या प्रजातींची नोंद केली आहे. येथे आढळणाऱ्या काही वनस्पती या प्रदेशनिष्ठ आहेत. त्या अन्यत्र कोठेही पाहायला मिळत नाहीत. यातील काही वनस्पती दुर्मिळ आहेत. काही नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यासाठी या वनस्पतींचे संवर्धन गरजेचे आहे. याचाही विचार आता गड-किल्ल्यांच्या संवर्धनात होणे अपेक्षित आहे. कोणत्याही ऐतिहासिक गडाचे संवर्धन करताना वास्तूबरोबरच तेथील जैवविविधतेचा ठेवाही जपला तर यातून इतिहासाबरोबरच पर्यावरणाचेही संवर्धन होऊ शकेल. पर्यावरणाबाबत जनजागृतीही करणे सोपे होईल. याचा विचार करून तसा आराखडा तयार करण्याची गरज आहे. भावी पिढीला हे निश्‍चितच मार्गदर्शक ठरू शकेल. 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Need Of Conservation Of Biodiversity On Forts In Maharashtra