विश्‍वाची सफर घडवणारे ऍप्स

google earth
google earth

मानवी जीवनाची गती जशी दिवसेंदिवस वाढू लागली आहे, तसे हे संबंध जग वरचेवर अधिकाधिक जवळ येऊ लागले आहे. इंटरनेटमुळे पृथ्वीतलावरील बौद्धिक अंतर नाहीसे होत असताना दळणवळणाची गती वाढल्याने एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जाणेदेखील सहजशक्‍य झाले आहे. मानवी मनाचे क्षितिज आज सर्वार्थाने विस्तारत असून, क्षितिजापलीकडील गोष्टींचे प्रत्येकालाच वेध लागले आहेत. मनाच्या गतीला काही सीमा नसते. केवळ पृथ्वीचीच नव्हे, तर अवघ्या विश्‍वाची सफर करायची म्हटले, तरी मनाला ते अगदी क्षणार्धात शक्‍य होते. मनाच्या या गतीला स्मार्टफोनवरील काही ऍप्सची जोड दिली, तर घरबसल्या आपण अवघे विश्‍व पालथे घालू शकतो. अशाच काही ऍप्सची माहिती आज आपण घेणार आहोत. 

गुगल अर्थ (Google Earth) 

"गुगल अर्थ' हे ऍप गुगल प्ले स्टोअरमधून आपल्या स्मार्टफोनवर घेता येते. ऍप उघडल्यानंतर आपल्यासमोर पृथ्वीची एक प्रतिकृती दिसते, जी आपण आपल्या बोटाने हवी तशी गोलाकार फिरवू शकतो. पृथ्वीतलावरील कोणताही खंड, देश वा प्रदेश धुंडाळायचा झाल्यास त्यासाठी वरील बाजूस "सर्च' हा पर्याय देण्यात आलेला आहे. केवळ कुतूहल म्हणून कोणताही एखादा प्रदेश पाहायचा असेल, तर दोन बोटांचा वापर करून पृथ्वीची प्रतिकृती कोणत्याही विशिष्ट ठिकाणी "झूम' करता येते. अशाप्रकारे एखादे ठिकाण आपण अगदी जवळून बघू शकतो. या ऍपद्वारे एखाद्या प्रदेशाची केवळ द्विमितीय नव्हे, तर त्रिमितीय रचनाही पाहता येते. 

गुगल अर्थमध्ये "व्होएजर' (Voyager) नावाचा एक पर्याय आहे. या पर्यायाद्वारे जगभरातील निवडक प्रसिद्ध ठिकाणांची आभासी सफर करता येते. त्या दृष्टीने या ऍपमध्ये निरनिराळ्या प्रसिद्ध ठिकाणांची वर्गवारी करण्यात आलेली आहे. "स्ट्रीट व्ह्यू' (Street View) हे यातील आणखी एक उत्कृष्ट वैशिष्ट्य आहे. एखाद्या ठिकाणी गेल्यानंतर प्रत्यक्ष रस्त्यावर उभे राहून भोवतालचा परिसर चारी बाजूंनी जसा दिसेल, तसा तो आपणास "स्ट्रीट व्ह्यू'द्वारे दिसतो. स्ट्रीट व्ह्यूमुळे अगदी स्वतः त्या ठिकाणी गेल्याचा आभास निर्माण होतो. 

इतिहास, भूगोल अशा विषयांचा अभ्यास करायचा असेल, एखाद्या ठिकाणी सहल काढायची असेल किंवा सहज कुतूहल म्हणून एखादा प्रदेश पाहायचा असेल, तर त्या दृष्टीने गुगल अर्थ हे सर्वोत्तम ऍप आहे. 

स्काय मॅप (Sky Map) 

अगदी पुरातन काळापासून माणसाला वर पसरलेल्या अथांग तारकाविश्‍वाचे आकर्षण वाटत आलेले आहे. रात्रीच्या शांत वातावरणात मानवी मन अवकाशातील ग्रह-ताऱ्यांमध्ये नकळत हरवून जाते. अनेकदा आपण पाहत आहोत त्या ग्रहगोलाबाबत आपल्याला कुतूहल असते; पण त्याबाबत काहीही माहिती नसते. याउलट कधी कधी हवा तो ग्रह-तारा आपणास विस्तृतशा अवकाशात नेमका सापडत नाही. अशावेळी "स्काय मॅप' नावाचे ऍप आपणास मार्गदर्शक ठरू शकते. या ऍपच्या साह्याने अवघ्या आसमंताचा नकाशा स्मार्टफोनवर सहजा-सहजी उपलब्ध होतो. 

आपल्या स्मार्टफोनमधील जीपीएसच्या साह्याने "स्काय मॅप' सर्वप्रथम पृथ्वीतलावरील आपले ठिकाण निर्धारित करते. अशाने त्या वेळी त्या ठिकाणाहून दिसणारी अवकाशाची स्थिती आपणास स्मार्टफोनवर दिसू लागते. आपण आपला स्मार्टफोन ज्या दिशेने धरला असेल, त्या दिशेचे अवकाश स्मार्टफोनच्या स्क्रीनवर दिसते. यामुळे निरनिराळे ग्रहगोल अगदी सहज सापडतात. या ऍपमधील "गॅलरी' (Gallery) हा पर्याय वापरून सूर्यमालेतील ग्रह तसेच अवकाशातील इतर काही खगोलीय पिंड आपणास अगदी सहजगत्या शोधता येतात. स्काय मॅपमध्ये "टाईम ट्रॅव्हल' (Time Travel) नावाचा एक पर्याय आहे. या पर्यायाच्या साह्याने आपण भविष्यातील किंवा भूतकाळातील एखाद्या विशिष्ट तारखेला, विशिष्ट वेळी असलेली अवकाशाची स्थिती पाहू शकतो. अभ्यासकांच्या दृष्टीने हा पर्याय विशेष उपयुक्त आहे. 

"हे विश्‍वची माझे घर' ही भावना उरी बाळगत असताना पृथ्वीतलावरील आपले नेमके स्थान व भोवतालच्या जगाचे पक्के भान असणे अगत्याचे ठरते. अशाने जगाकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन अधिक व्यापक बनतो. या दृष्टीने वर नमूद केलेल्या ऍपचा प्रत्येकाने वापर करून पाहायला हवा. विशेष म्हणजे, घरातील लहान मुलांना शिकवत असताना या ऍपचा खूप चांगला उपयोग होऊ शकतो. 

लेखक- रोहन जे. 

ईमेल- marathiinternet@gmail.com 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com