नऊ वर्षांच्या रिधीमाने मंत्र्यांना लावले कामाला

वृत्तसंस्था
मंगळवार, 4 एप्रिल 2017

विकास हे प्राथमिक उद्दिष्ट, तर पर्यावरण बदल हा 'पूरक फायदा' म्हणून ठरविले गेल्यामुळे तापमान बदलाच्या मुद्यावर सकारात्मक दृष्टीने काम न केल्याची जबाबदारी पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वीकारावी, असे म्हणणे मांडत तिने हरित लवादाकडे जनहित याचिका दाखल केली आहे.

नवी दिल्ली : उत्तराखंडमधील नऊ वर्षांच्या रिधीमा पांडे या मुलीने तापमान बदलाबाबत दाखल केलेल्या तक्रारीवरून राष्ट्रीय हरित लवादाने पर्यावरण मंत्रालय आणि केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावली आहे.

रिधीमाची आई वन विभागात काम करत असून, वडीलही पर्यावरण क्षेत्रातील सामाजिक कार्यकर्ते आहेत. त्यामुळे लहानपणापासूनच तिला वन्यजीवनाची ओळख आणि आवड आहे. बहर लवकरच येणे, अतिपाऊस पडणे, दुष्काळ पडणे, वनांमध्ये आग लागणे, अशा घटना पाहून आई-वडिलांच्या प्रोत्साहनाने तिने हवामान बदलाबाबत वाचण्यास सुरवात केली.

हवामान बदलाचा सामना करण्यासाठी जगातील इतर देशांनी केलेल्या उपायांचीही तिने माहिती घेतली. मात्र, पर्यावरण बदलाबाबतच्या राष्ट्रीय कृती समितीने 2008 मध्ये प्रसिद्ध केलेला अहवाल वाचून तिला धक्का बसला. यामध्ये विकास हे प्राथमिक उद्दिष्ट, तर पर्यावरण बदल हा 'पूरक फायदा' म्हणून ठरविले गेले आहे. त्यामुळे तापमान बदलाच्या मुद्यावर सकारात्मक दृष्टीने काम न केल्याची जबाबदारी पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाने स्वीकारावी, असे म्हणणे मांडत तिने हरित लवादाकडे जनहित याचिका दाखल केली आहे.

हरित लवादानेही या याचिकेची गांभीर्याने दखल घेतली असून, पर्यावरण मंत्रालय आणि प्रदूषण नियंत्रण मंडळाला नोटीस बजावत दोन आठवड्यांत आपले म्हणणे मांडण्याचा आदेश दिला आहे. या प्रकरणी पुढील सुनावणी 4 मे रोजी होणार आहे.

Web Title: nine year old ridhima shakens green tribunal