टीकटॉक खरेदीच्या शर्यतीत आता आणखी एक कंपनी

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 18 August 2020

भारतात चीनविरुद्धच्या सीमावादामुळे टीकटॉकवर बंदी घालण्यात आल्यानंतर अनेक कंपन्या बाइट डान्सशी चर्चा करत आहेत.

वॉशिंग्टन - सॉफ्टवेअर क्षेत्रातील बलाढ्य अमेरिकी कंपनी ओरॅकलनेही टीकटॉक खरेदीदारांच्या शर्यतीत उडी घेतली आहे. प्रामुख्याने अमेरिकेतील व्यवहार मिळविण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. टीकटॉकची मालकी असलेल्या बाईटडान्स कंपनीत आधीच गुंतवणूक असलेल्या काही कंपन्यांच्या साथीत ओरॅकल प्रयत्नशील आहे. या गुंतवणूकदार कंपन्यांमध्ये जनरल अटलांटिक आणि सीकोया कॅपीटल यांचा समावेश आहे. या घडामोडींची कल्पना असलेल्या सूत्रांनुसार बाईटडान्सशी प्राथमिक चर्चा झाली असून गेल्या काही दिवसांत त्यात प्रगती झाली आहे.

फायनान्शियल टाईम्सनुसार अमेरिकेशिवाय कॅनडा आणि ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड येथील व्यवहारांची खरेदी करण्याचाही ओरॅकलचा प्रयत्न आहे. यासंदर्भात अधिकृत भाष्य करण्यास मात्र कोणत्याच कंपनीच्या प्रतिनिधींनी तयारी दर्शविली नाही. 

सोशल मिडीया अॅपमार्फत चिनी कंपन्या युझर्सची वैयक्तिक आणि गोपनीय माहिती चीन सरकारला पुरवीत असल्याचा दावा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केला आहे. त्यामुळे टीकटॉकवर बंदीचे फर्मान काढण्यात आले आहे. त्यानंतर मयक्रोसॉफ्टचे सीइओ सत्या नाडेला यांनी ट्रम्प यांची भेट घेतली होती. मायक्रोसॉफ्ट अमेरिकी सरकारच्या साथीतच करारासाठी प्रयत्नशील आहे. ओरॅकलचे सहसंस्थापक आणि कार्यकारी अध्यक्ष लॅरी एलिसन यांनीही ट्रम्प यांना पाठिंबा दर्शविला आहे. ट्रम्प यांच्या प्रचारासाठी एलिसन यांनी वर्षाच्या प्रारंभीच निधी उभारणी मोहीम राबविली होती.

हे वाचा -  खूशखबर! WhatsApp ने लाँच केलं नवं फीचर

ओरॅकलच्या आघाडीवर 
- ओरॅकलकडे सध्या नसलेला सोशल मिडीया किंवा व्हिडिओ उद्योगाचा ग्राहक वर्ग मिळणार 
- टीकटॉकने संकलित केलेली माहिती आणि आकेडवारी उपयुक्त 
- याचा वापर करून ओरॅकलला मार्केटींगची उत्पादनांत सुधारणा करण्याची संधी 
- क्लाउड कम्प्युटींगमध्ये अॅमेझॉन वेब सर्व्हिसेसचे वाढते वर्चस्व, त्याखालोखाल मायक्रोसॉफ्ट अझ्युअर व गुगल क्लाउडचा क्रमांक 
- या पार्श्वभूमीवर व्यवसायवृद्धीसाठी नवी क्षेत्र हेरण्यासाठी ओरॅकलचा संघर्ष 
- आर्थिक वर्षातील चौथ्या सत्रात ओरॅकलच्या महसुलात सहा टक्के घट 
- ही रक्कम 10.4 अब्ज डॉलर 
- कंपन्या, व्यापाराच्या खरेदीकडे कल असण्याचा ओरॅकलचा इतिहास 
- अलिकडे मात्र घसघशीत रकमेच्या करारांच्या प्रमाणात घट 

सायन्स आणि टेक्नॉलॉजीच्या बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा

मातब्बरांमध्ये चुरस 
सर्वांत आधी पुढाकार घेतलेल्या मायक्रोसॉफ्ट कॉर्पोरेशनचे पारडे जड आहे. प्रारंभी ठरावीक देशांमधील व्यवहारांचे संचलन करण्याचा प्रयत्न होता. आता मात्र युरोप तसेच भारतामधील हक्क विकत घेण्यात विशेष रस दाखवला जात आहे. भारतात चीनविरुद्धच्या सीमावादामुळे टीकटॉकवर बंदी घालण्यात आल्यानंतर अनेक कंपन्या बाइट डान्सशी चर्चा करत आहेत. ऑगस्टच्या प्रारंभी ट्विटरची बाईटडान्स कंपनीशी चर्चा झाल्याचे समजते. तसंच अमेरिकेतील व्यवहारांचे हक्क संपादन करण्यात रस असल्याचीही माहिती समोर येत आहे.

बाईटडान्सची भूमिका 
टीकटॉकची मालकी असलेली बाईटडान्स कंपनी अॅपच्या संपूर्ण विक्रीबाबत फारशी उत्साही नाही. केवळ अमेरिका, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांच्या पलीकडे व्यवहाराची व्याप्ती ठेवण्यास बाईटडान्स व्यवस्थापनाचा विरोध आहे. 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: oracle trying to acquire tiktok in us now talking with bytedance